प्रेषितांची कृत्ये 18:18-28
प्रेषितांची कृत्ये 18:18-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला, नंतर तो निघाला व सिरीया प्रांताला समुद्रमार्गे गेला आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विला ही दोघे होती, पौलाने किंख्रिया शहरात आपल्या डोक्याचे मुंडण केले, कारण त्याने नवस केला होता. मग ते इफिस येथे आले, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विला यांना तेथे सोडले, तो सभास्थानात गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला. जेव्हा त्यांनी त्यास तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले, तेव्हा तो कबूल झाला नाही. परंतु जाता जाता तो म्हणाला, “देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन” मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला. जेव्हा पौल कैसरीया येथे आला, तेव्हा तो तेथून वर यरूशलेम शहरास गेला आणि मंडळीला भेटला, मग तो खाली अंत्युखियाला गेला. तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला, त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले. अपुल्लो नावाचा एक यहूदी होता, तो आलेक्सांद्र शहरात जन्मला होता, तो उच्च शिक्षित होता, तो इफिस येथे आला, त्यास शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते. परमेश्वराच्या मार्गाचे शिक्षण त्यास देण्यात आले होते, तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे व बोलत असे, तरी त्यास फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रस्किला व अक्विला ह्यांनी त्यांचे भाषण ऐकूण त्यास जवळ बोलावून घेतले व त्यास देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला. अपुल्लोला अखया देशाला जायचे होते, तेव्हा बंधुंनी त्यास उत्तेजन दिले आणि तेथील येशूच्या शिष्यांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले, जेव्हा तो पोहोंचला, तेव्हा ज्यांनी कृपेमुळे विश्वास ठेवला होता, त्यांना त्याने खूप मदत केली. जाहीर वादविवादात त्याने यहूदी लोकांस फार जोरदारपणे पराभूत केले आणि पवित्र शास्त्रलेखाच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले.
प्रेषितांची कृत्ये 18:18-28 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पौल करिंथ येथे काही काळ राहिला. नंतर त्याने तेथील विश्वासणार्या बंधू व भगिनींचा निरोप घेतला आणि प्रिस्किल्ला व अक्विला यांना बरोबर घेऊन तो सीरियाला जाण्यासाठी जलप्रवासास निघाला. परंतु या प्रवासाला निघण्याआधी, किंख्रिया या ठिकाणी पौलाने आपल्या डोक्याचे मुंडण करून घेतले, कारण त्याने नवस केलेला होता. इफिस येथे पोहोचल्यावर, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विला यांना तेथेच सोडले. तो स्वतः तेथील सभागृहामध्ये गेला आणि त्याने तेथील यहूदी लोकांबरोबर युक्तिवाद गेला. जेव्हा त्यांनी पौलाला विनंती केली की, त्याने त्यांच्याबरोबर अधिक वेळ घालवावा, परंतु पौलाने ते नाकारले. परंतु निघताना मात्र त्याने त्यांना वचन दिले की, “परमेश्वराची इच्छा असेल, तर मी पुन्हा येईन.” मग इफिस सोडून जलमार्गाने तो निघाला. जेव्हा तो कैसरीया येथे पोहोचला, तेव्हा तेथून तो वर यरुशलेमकडे आला आणि तेथील मंडळीला अभिवादन करून तो अंत्युखियास गेला. अंत्युखियामध्ये थोडा काळ घालविल्यानंतर, तेथून पौल बाहेर पडला आणि गलातीया व फ्रुगिया या प्रांतामधून ठिकठिकाणी प्रवास करीत तेथील सर्व शिष्यांना त्याने प्रोत्साहित केले. त्याचवेळी अपुल्लोस नावाचा यहूदी, आलेक्सांद्रियाचा रहिवासी, इफिस येथे आलेला होता. तो एक विद्वान माणूस होता आणि त्याला धर्मग्रंथाचे सखोल ज्ञान होते. प्रभुच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आलेले होते आणि तो आवेशाने बोलत होता, जरी त्याला फक्त योहानाच्या बाप्तिस्म्याबद्दल माहिती होती, तरी येशूंबद्दल अचूक शिक्षण देत होता. तो धैर्याने सभागृहामध्ये बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विला यांनी त्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्यांनी त्याला त्यांच्या घरी आमंत्रित केले आणि परमेश्वराचा मार्ग त्याला अधिक स्पष्टपणे समजावून सांगितला. जेव्हा अपुल्लोस याला अखया येथे जायचे होते, तेव्हा बंधू व भगिनींनी त्याला उत्तेजन दिले व अखया येथील शिष्यांनी त्याचे स्वागत करावे असे विनंती पत्र त्याच्या हाती देऊन त्याचा निरोप घेतला. जेव्हा तो तेथे आला, तेव्हा कृपेद्वारे ज्यांनी विश्वास ठेवला होता त्यांना त्याची फार मोठी मदत झाली. कारण सार्वजनिक वाद करून त्याने अतिशय सशक्तपणे यहूदीयांच्या सर्व वादांचे खंडण केले आणि शास्त्राच्या आधाराने त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, येशू हेच ख्रिस्त आहेत.
प्रेषितांची कृत्ये 18:18-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यानंतर पौल तेथे बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सूरिया देशात गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विल्ला हे गेले. त्याचा नवस होता म्हणून त्याने किंख्रियात आपल्या डोक्याचे केस कातरून घेतले. मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यांना तेथे सोडले; आणि स्वत: सभास्थानात जाऊन यहूद्यांबरोबर वादविवाद केला. नंतर त्याने आणखी काही दिवस राहावे अशी ते विनंती करत असताही तो कबूल झाला नाही; तर त्यांचा निरोप घेताना, “देवाची इच्छा असल्यास [येणार्या सणात यरुशलेमेत] मी तुमच्याकडे पुन्हा येईन” असे म्हणून तो तारवात बसून इफिसाहून निघाला. मग कैसरीयास पोहचल्यावर तो वरती गेला, आणि मंडळीचा निरोप घेऊन अंत्युखियास खाली गेला. तेथे काही दिवस राहून तो निघाला, आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत व फ्रुगिया ह्यांतील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला. तेव्हा अपुल्लो नावाचा एक मोठा वक्ता व शास्त्रपारंगत आलेक्सांद्रियाकर यहूदी इफिसास आला. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते; आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे; तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला व अक्विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला. नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला, तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले; तो तेथे पोहचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले. कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष यहूद्यांचे खंडण करत असे.
प्रेषितांची कृत्ये 18:18-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्यानंतर पौल तेथे आणखी बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सूरिया देशास गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विल्ला ही दोघे गेली. पौलाचा नवस होता म्हणून त्याने किंख्रिया येथे आपल्या डोक्याचे मुंडन केले. इफिस नगरात आल्यावर पौलाने प्रिस्किल्ला व अक्विल्ला ह्यांना तेथे सोडले आणि स्वतः सभास्थानात जाऊन त्याने यहुदी लोकांबरोबर चर्चा केली. त्याने आणखी काही दिवस राहावे, अशी विनंती लोक करत असताही, तो तेथे राहण्यास तयार झाला नाही. उलट त्यांचा निरोप घेताना, “देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे मी पुन्हा येईन”, असे सांगून तो तारवात बसून इफिस येथून निघाला. कैसरिया येथे पोहचल्यावर तो यरुशलेम येथे जाऊन ख्रिस्तमंडळीस भेटला व नंतर अंत्युखियास गेला. तेथे काही दिवस राहून तो तेथून निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया व फ्रुगिया प्रदेशांतील सर्व शिष्यांना प्रोत्साहन देत फिरला. आलेक्सांद्रिया येथे जन्मलेला अपुल्लो नावाचा महान वक्ता व धर्मशास्त्रपारंगत असलेला एक यहुदी मनुष्य इफिस येथे आला. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते. तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी उचित प्रकारे सांगून शिकवण देत असे, तरी त्याला केवळ योहानचा बाप्तिस्मा ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला व अक्विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला त्यांच्या घरी बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला. नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला. बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी तेथल्या शिष्यांना लिहिले. तो तेथे पोहचल्यावर ज्यांनी प्रभूच्या कृपेमुळे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले; कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे धर्मशास्त्रामधून दाखवून तो अत्यंत प्रभावीपणे सर्वांसमक्ष यहुदी लोकांचे म्हणणे खोडून काढीत असे.