YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 18

18
करिंथ येथे पौल
1त्यानंतर तो अथेनै सोडून करिंथास गेला.
2तेव्हा पंत येथील अक्‍विल्ला नावाचा कोणीएक यहूदी त्याला आढळला. सर्व यहूद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता; त्यांच्याकडे तो गेला.
3आणि त्यांचा व ह्याचा व्यवसाय एकच असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला; त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता.
4तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहूद्यांची व हेल्लेण्यांची खातरी करून देत असे.
5सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले, तेव्हा पौल आत्म्याने प्रेरित होऊन ‘येशू हाच ख्रिस्त आहे,’ अशी यहूद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात गढून गेला होता.
6परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, “तुमचे रक्त तुमच्याच माथ्यावर; मी निर्दोष आहे; आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार.”
7मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला.
8तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला, आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला.
9तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टान्तात म्हटले, “भिऊ नकोस; बोलत जा, उगा राहू नकोस.
10कारण मी तुझ्याबरोबर आहे, आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही; कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.”
11तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवत दीड वर्ष राहिला.
गल्लियो आणि पौल
12नंतर गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असता, यहूद्यांनी एकोपा करून पौलावर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले,
13“हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाला भजायला चिथवतो.”
14तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गल्लियोने यहूद्यांना म्हटले, “अहो यहूद्यांनो, हे प्रकरण गैरशिस्त वर्तनाचे अथवा दुष्कृत्याचे असते तर मला तुमचे म्हणणे मनावर घेण्यास कारण झाले असते;
15परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे तर तुमचे तुम्हीच पाहून घ्या; ह्या गोष्टींची पंचाईत मला नको.”
16असे म्हणून त्याने त्यांना न्यायासनापुढून हाकून लावले.
17तेव्हा सर्व हेल्लेणी लोकांनी सभास्थानाचा अधिकारी सोस्थनेस ह्याला धरून न्यायासनासमोर मार दिला, पण गल्लियोने ह्यांपैकी कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही.
पौल सूरियास परत येतो
18ह्यानंतर पौल तेथे बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सूरिया देशात गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्‍विल्ला हे गेले. त्याचा नवस होता म्हणून त्याने किंख्रियात आपल्या डोक्याचे केस कातरून घेतले.
19मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यांना तेथे सोडले; आणि स्वत: सभास्थानात जाऊन यहूद्यांबरोबर वादविवाद केला.
20नंतर त्याने आणखी काही दिवस राहावे अशी ते विनंती करत असताही तो कबूल झाला नाही;
21तर त्यांचा निरोप घेताना, “देवाची इच्छा असल्यास [येणार्‍या सणात यरुशलेमेत] मी तुमच्याकडे पुन्हा येईन” असे म्हणून तो तारवात बसून इफिसाहून निघाला.
22मग कैसरीयास पोहचल्यावर तो वरती गेला, आणि मंडळीचा निरोप घेऊन अंत्युखियास खाली गेला.
23तेथे काही दिवस राहून तो निघाला, आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत व फ्रुगिया ह्यांतील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला.
इफिसमध्ये अपुल्लो
24तेव्हा अपुल्लो नावाचा एक मोठा वक्ता व शास्त्रपारंगत आलेक्सांद्रियाकर यहूदी इफिसास आला.
25त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते; आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे; तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता.
26तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला व अक्‍विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला.
27नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला, तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले; तो तेथे पोहचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले.
28कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष यहूद्यांचे खंडण करत असे.

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन

प्रेषितांची कृत्ये 18 साठी चलचित्र