प्रेषितांची कृत्ये 18:1-17
प्रेषितांची कृत्ये 18:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर पौलाने अथेनै शहर सोडले व करिंथ शहरास गेला. करिंथमध्ये पौल एका यहूदी मनुष्यास भेटला ज्याचे नाव अक्विला असे होते, तो पंत प्रांतातील रहिवासी होता, आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता, कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्याने काढला होता, पौल त्यांना भेटावयास गेला. पौलासारखेच ते तंबू बनवणारे होते, तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला. प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे, आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे. जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल यहूदी लोकांस उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला, येशू हाच ख्रिस्त आहे. अशी साक्ष देऊ लागला. परंतु यहूदी लोकांनी पौलाला विरोध केला, त्यास यहूदी लोक वाईट रीतीने बोलले, तेव्हा आपला निषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले, तो यहूदी लोकांस म्हणाला, “जर तुमचे तारण झाले नाही, तर तो तुमचा दोष असेल! तुमचे रक्त तुमच्याच माथी असो! मी निर्दोष आहे, येथून पुढे मी परराष्ट्रीय लोकांकडेच जाईन.” पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाचा देवाचा उपासक याच्या घरी गेला. त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता, क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला. एके रात्री, प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, “घाबरु नको, बोलत राहा, शांत राहू नको. मी तुझ्याबरोबर आहे, कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.” म्हणून पौल तेथे दीड वर्षे देवाचे वचन त्या लोकांस शिकवीत राहिला. जेव्हा गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहूदी पौलविरुद्ध एकत्र आले आणि त्यास न्यायासनापुढे उभे केले. यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशा रीतीने लोकांस देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.” पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहूदी लोकांस म्हणाला, “एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते. परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे, त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा, अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो.” मग गल्लियोने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिले. मग त्या सर्वांनी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस याला न्यायासनासमोर मारहाण केली, पण गल्लियोने त्याकडे लक्ष दिले नाही.
प्रेषितांची कृत्ये 18:1-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यानंतर, पौलाने ॲथेन्स सोडले व तो करिंथ येथे गेला. तेथे त्याला पोनतस गावाचा, अक्विला नावाचा एक यहूदी भेटला, तो त्याची बायको प्रिस्किल्ला हिला घेऊन इटली देशातून काही दिवसांपूर्वीच तेथे आलेला होता. कारण रोममधून सर्व यहूदी लोकांनी निघून जावे, अशी क्लौडियस सीझरने आज्ञा केली होती. पौल त्यांच्या भेटीला गेला, जसे ते तंबू तयार करणारे होते तसेच तो देखील होता, मग त्यांच्याबरोबर राहून त्याने काम केले. प्रत्येक शब्बाथ दिवशी सभागृहात यहूदी आणि ग्रीक यांची खात्री करून देण्यासाठी तो प्रयत्न करीत असे. जेव्हा मासेदोनियाहून सीला व तीमथ्य आले, तेव्हा येशू हेच ख्रिस्त आहेत असा प्रचार आणि साक्ष केवळ यहूदीयांनाच सांगण्यासाठी पौलाने स्वतःचे समर्पण केले होते. परंतु जेव्हा ते पौलाला विरोध करून शिवीगाळ करू लागले, तेव्हा पौलाने याच्या निषेधार्थ त्याचे वस्त्र झटकून टाकले आणि म्हणाला, “तुमच्या विनाशासाठी तुम्हीच जबाबदार आहात! मी निर्दोष आहे. येथून पुढे मी गैरयहूदीयांकडे जाईन.” नंतर पौल सभागृह सोडून तीतुस यूस्त नावाच्या माणसाचे घरी गेला. तो परमेश्वराचा उपासक होता आणि सभागृहा शेजारीच राहत असे. त्या सभागृहाचा प्रमुख क्रिस्प आणि त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांनी प्रभुवर विश्वास ठेवला आणि करिंथमधील अनेकांनी पौलाचे ऐकून विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला. एके रात्री प्रभू पौलाशी दृष्टांतात बोलला: “भिऊ नकोस; बोलत राहा, गप्प राहू नकोस. मी तुझ्याबरोबर आहे आणि कोणीही तुझ्यावर हल्ला व तुला इजा करणार नाही, कारण या शहरात माझे अनेक लोक आहेत.” तेव्हा पौल त्यांना करिंथ येथे दीड वर्ष परमेश्वराचे वचन शिकवीत राहिला. गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल झाला तेव्हा पौलाला तेथून घालवून द्यावे म्हणून करिंथ येथील यहूद्यांनी एकजूट होऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला न्यायालयात आणले. त्यांनी पौलावर असा आरोप केला की, “हा माणूस, आमच्या नियमशास्त्राविरुद्ध परमेश्वराची उपासना करण्यासाठी लोकांची मने वळवित आहे.” पौल आता बोलणार होता इतक्यातच, गल्लियो त्यांना म्हणाला, “जर तुम्ही यहूदी गंभीर गुन्हा किंवा दुराचार याची तक्रार करीत असाल, तर तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी काहीतरी कारण असते. परंतु ज्याअर्थी हा वाद निव्वळ शब्दांचा आणि नावांचा आणि तुमच्या नियमशास्त्राबद्दलचा आहे, त्याअर्थी तुम्हीच हे प्रकरण मिटवा. अशा प्रकारच्या वादांचा न्यायनिवाडा करण्याचे मी साफ नाकारतो.” असे म्हणून त्याने त्यांना न्यायालयासमोरुन घालवून दिले. त्यानंतर जमावाने सोस्थनेस या सभागृहाच्या पुढार्यास पकडले आणि न्यायालयासमोरच त्याला मार दिला; परंतु गल्लियोने तिकडे अजिबात लक्ष दिले नाही.
प्रेषितांची कृत्ये 18:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यानंतर तो अथेनै सोडून करिंथास गेला. तेव्हा पंत येथील अक्विल्ला नावाचा कोणीएक यहूदी त्याला आढळला. सर्व यहूद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता; त्यांच्याकडे तो गेला. आणि त्यांचा व ह्याचा व्यवसाय एकच असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला; त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहूद्यांची व हेल्लेण्यांची खातरी करून देत असे. सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले, तेव्हा पौल आत्म्याने प्रेरित होऊन ‘येशू हाच ख्रिस्त आहे,’ अशी यहूद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात गढून गेला होता. परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, “तुमचे रक्त तुमच्याच माथ्यावर; मी निर्दोष आहे; आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार.” मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला. तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला, आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला. तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टान्तात म्हटले, “भिऊ नकोस; बोलत जा, उगा राहू नकोस. कारण मी तुझ्याबरोबर आहे, आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही; कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.” तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवत दीड वर्ष राहिला. नंतर गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असता, यहूद्यांनी एकोपा करून पौलावर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले, “हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाला भजायला चिथवतो.” तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गल्लियोने यहूद्यांना म्हटले, “अहो यहूद्यांनो, हे प्रकरण गैरशिस्त वर्तनाचे अथवा दुष्कृत्याचे असते तर मला तुमचे म्हणणे मनावर घेण्यास कारण झाले असते; परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे तर तुमचे तुम्हीच पाहून घ्या; ह्या गोष्टींची पंचाईत मला नको.” असे म्हणून त्याने त्यांना न्यायासनापुढून हाकून लावले. तेव्हा सर्व हेल्लेणी लोकांनी सभास्थानाचा अधिकारी सोस्थनेस ह्याला धरून न्यायासनासमोर मार दिला, पण गल्लियोने ह्यांपैकी कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही.
प्रेषितांची कृत्ये 18:1-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर पौल अथेनै सोडून करिंथ येथे गेला. तेव्हा पंथ येथील अक्विला नावाचा एक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुदी लोकांनी रोम शहर सोडून जावे अशी सम्राट क्लौद्य ह्यांनी आज्ञा केल्यामुळे तो त्याची पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह इटालीहून नुकताच आला होता, पौल त्यांच्याकडे गेला. त्यांचा व ह्याचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला. त्यांनी मिळून तो व्यवसाय चालविला, त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. पौल दर साबाथ दिवशी प्रार्थनामंदिरात वादविवाद करून यहुदी व ग्रीक लोकांना आपली शिकवण पटवून देत असे. सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले, तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे, अशी यहुदी लोकांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पौल गढून गेला होता. परंतु ऐकणारे त्याला अडवून अपशब्द बोलू लागले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, “तुमचे तारण झाले नाही तर त्याचा दोष तुमच्या माथ्यावर, मी निर्दोष आहे, आत्तापासून मी यहुदीतरांकडे जाणार.” मग तेथून निघून तो तीत युस्त नावाच्या देवभक्ताच्या घरी गेला. त्याचे घर सभास्थानाच्या जवळ होते. तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने त्याच्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला. पुष्कळ करिंथकरांनी देखील देवाचे वचन ऐकून विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला. त्या रात्री प्रभूने पौलला दृष्टान्तात म्हटले, “भिऊ नकोस, बोलत जा, तुझे सेवाकार्य मध्येच सोडून देऊ नकोस; कारण मी तुझ्याबरोबर आहे. कोणी तुला अपाय करू शकणार नाही. ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.” त्यामुळे तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवीत दीड वर्ष राहिला. गल्लियो हा अखया प्रांताचा राज्यपाल असता, यहुदी लोकांनी एकजूट करून पौलवर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले, “हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाची आराधना करावयास चिथवतो.” तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गल्लियोने यहुदी लोकांना म्हटले, “अहो यहुदी लोकांनो, हे प्रकरण दुष्ट गुन्हेगारीचे अथवा दुष्कृत्याचे असते, तर मला तुम्हांला समजून घेणे सयुक्तिक ठरले असते. परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे म्हणून तुमचे तुम्हीच पाहून घ्या. अशा गोष्टींचा न्याय करणे मी नाकारतो!” असे म्हणून त्याने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिले. तेव्हा सर्वांनी सभास्थानाचा अधिकारी सोस्थनेस ह्याला धरून न्यायासनासमोर मार दिला, पण गल्लियोने ह्या गोष्टीची पर्वा केली नाही.