YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 16:1-15

प्रेषितांची कृत्ये 16:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग तो दर्बे व लुस्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणाऱ्या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता, त्याचा पिता हेल्लेणी होता. त्यास लुस्रांतले व इकुन्यातले बंधू नावाजीत होते. त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती; तेव्हा त्याठिकाणी जे यहूदी होते त्यांच्याखातर त्याने त्यास घेऊन त्यांची सुंता केली; कारण त्याचा पिता ग्रीक आहे हे सर्वांना ठाऊक होते. तेव्हा त्यांनी नगरांमधून जाता जाता यरूशलेम शहरातील प्रेषित व वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळावयास नेमून दिले. ह्यावरून मंडळया विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस वाढत चालल्या. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतीबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतामधून गेले. आणि मुसिया प्रांतापर्यंत आल्यावर बिथुनिया प्रांतास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोवस शहरास खाली गेले. तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की, मासेदोनियात कोणीएक मनुष्य उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हास साहाय्य कर.” त्यास असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांस सुवार्ता सांगावयास देवाने आम्हास बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस बेटाला गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस शहरास गेलो. तेथून फीलिप्पै शहरास गेलो; ते मासेदोनियाचे या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमन लोंकाची वसाहत आहे त्या नगरात आम्ही काही दिवस राहीलो. मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हास वाटले तेथे जाऊन बसलो; आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे; ती देवाची उपासना करणारी होती, तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहात तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहास्तव ती विंनती आम्हास मान्य करावी लागली.

प्रेषितांची कृत्ये 16:1-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

पौल दर्बे आणि नंतर लुस्त्र येथे आला, तेथे तीमथ्य नावाचा एक शिष्य राहत होता, त्याची आई यहूदी असून विश्वासणारी होती परंतु त्याचे वडील ग्रीक होते. लुस्त्र व इकुन्या येथील विश्वासणारे त्याच्याबद्दल चांगली साक्ष देत होते. पौलाला त्याला आपल्याबरोबर फेरीत सामील करावयाचे असल्यामुळे, पौलाने निघण्यापूर्वी तीमथ्याची सुंता करविली, कारण त्या भागातील सर्व यहूदीयांना त्याचे वडील ग्रीक असल्याचे माहीत होते. गावागावातून प्रवास करीत असताना, त्यांनी यरुशलेममधील प्रेषित व वडीलजन यांनी जे निर्णय ठरविले होते त्याचे पालन लोकांनी करावे, असे सांगितले. म्हणून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व त्यांच्या संख्येत दररोज वाढ होत गेली. त्यानंतर पौल आणि त्याचे सहकारी यांनी फ्रुगिया आणि गलातीया प्रांतातून सगळीकडे प्रवास केला, कारण आशिया प्रांतात जाऊन परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करू नये असे पवित्र आत्म्याकडून त्यांना सांगण्यात आले होते. मुसियाच्या सरहद्दीवर आल्यानंतर, ते बिथुनिया प्रांतामध्ये प्रवेश करावयास निघाले, तेव्हा येशूंच्या आत्म्याने त्यांना तशी परवानगी दिली नाही. म्हणून ते मुसिया प्रांतातून खाली त्रोवास येथे गेले. रात्रीच्या वेळी पौलाने दृष्टांतात असे पाहिले की मासेदोनियातील माणूस उभा राहून गयावया होऊन विनंती करीत आहे की, “मासेदोनियात या व आम्हास मदत करा.” पौलाने हा दृष्टांत पाहिल्यानंतर, आपल्याला परमेश्वराने यांच्यामध्ये शुभवार्ता प्रचार करावयास बोलावले आहे, असे समजून लगेच आम्ही मासेदोनियास जाण्याची तयारी केली. आम्ही त्रोवास येथून जहाजात चढलो व सरळ समथ्राकेस व दुसर्‍या दिवशी नियापुलीस येथे गेलो. तेथून आम्ही प्रवास करून फिलिप्पै, जे रोमी वसाहतीत असून मासेदोनियाच्या शहरामधील एक महत्वाचे नगर होते तेथे गेलो. तेथे आम्ही बरेच दिवस राहिलो. मग शब्बाथ दिवशी आम्ही शहराच्या द्वारातून बाहेर नदीकाठी गेलो, तेथे प्रार्थनेसाठी ठिकाण असेल अशी आमची अपेक्षा होती. आम्ही तेथे बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या, त्यांच्याबरोबर बोलण्यास सुरुवात केली. त्या ऐकणार्‍या स्त्रियांमध्ये थुवतीरा शहराची लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती जांभळ्या वस्त्रांचा व्यवसाय करीत असे, ती परमेश्वराची उपासना करणारी होती. पौलाच्या संदेशाचा स्वीकार करण्यासाठी प्रभुने तिचे हृदय उघडले. मग तिचा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचा बाप्तिस्मा झाला, व तिने आम्हाला तिच्या घरी बोलावले. “मी प्रभुवर विश्वास ठेवणारी आहे, असे जर तुम्ही मान्य करीत असाल तर,” ती म्हणाली “या आणि माझ्या घरी राहा.” तिच्या आग्रहामुळे आम्हाला ते मान्य करावे लागले.

प्रेषितांची कृत्ये 16:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणार्‍या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता; पण त्याचा बाप हेल्लेणी होता. त्याला लुस्त्रातले व इकुन्यातले बंधू नावाजत होते. त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती; तेव्हा त्या ठिकाणी जे यहूदी होते त्यांच्याखातर त्याने त्याला घेऊन त्याची सुंता केली; कारण त्याचा बाप हेल्लेणी आहे हे सर्वांना ठाऊक होते. तेव्हा त्यांनी नगरांमधून जाता जाता यरुशलेमेतील प्रेषित व वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळण्यास नेमून दिले. ह्यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतांमधून गेले. आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही; मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोवसाला खाली गेले. तेथे रात्री पौलाला असा दृष्टान्त झाला की, मासेदोनियाचा कोणीएक माणूस उभा राहून आपणाला विनंती करत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हांला साहाय्य कर.” त्याला असा दृष्टान्त झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगण्यास देवाने आम्हांला बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लगेच विचार केला. तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस गेलो व दुसर्‍या दिवशी नियापुलीस गेलो; तेथून फिलिप्पैस गेलो; ते मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हांला वाटले तेथे जाऊन बसलो; आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे; ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंत:करण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानत आहात तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हांला मान्य करावी लागली.

प्रेषितांची कृत्ये 16:1-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

पौल दर्बे व लुस्त्र येथे आला. तेथे तीमथ्य नावाचा एक शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता. मात्र त्याचे वडील ग्रीक होते. लुस्त्र व इकुन्य येथील बंधू त्याचा आदर करत होते. त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलची इच्छा होती, त्या ठिकाणी जे यहुदी होते, त्यांच्याखातर त्याने त्याला घेऊन त्याची सुंता केली, कारण त्याचा बाप ग्रीक आहे, हे सर्वांना ठाऊक होते. त्यांनी नगरांमधून जाताना यरुशलेममधील प्रेषित व वडीलजन ह्यांनी जे ठराव केले होते, ते त्यांना पाळावयास सांगितले. अशा प्रकारे ख्रिस्तमंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत गेली. आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रदेशांतून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. म्हणून ते मुसियाजवळून त्रोवस येथे गेले. तेथे रात्री पौलाला असा दृष्टान्त झाला की, मासेदोनियाचा एक माणूस उभा राहून त्याला विनंती करत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हांला साहाय्य कर.” त्याला असा दृष्टान्त झाल्यावर त्या लोकांना शुभवर्तमान सांगावयास देवाने आम्हांला बोलावले आहे, असे समजून आम्ही मासेदोनियात जाण्याचा निर्णय लगेच घेतला. त्रोवस पासून हाकारून आम्ही सरळ समथ्राकेस येथे गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस नगरास पोहोचलो. तेथून फिलिप्पै या ठिकाणी गेलो. ते मासेदोनिया ह्या प्रमुख जिल्ह्यातील शहर होते व तेथे रोमन लोकांची वसाहत होती. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. तेथे साबाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हांला वाटले, तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची एक स्त्री होती. ती थुवतीरा नगरची होती व जांभळी वस्त्रे विकत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. तिने व तिच्या घराण्याने बाप्तिस्मा घेतल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी खरोखर प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानत असाल, तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहामुळे ती विनंती आम्हांला मान्य करावी लागली.