प्रेषितांची कृत्ये 13:26-52
प्रेषितांची कृत्ये 13:26-52 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या बंधुनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हास सांगितली गेली. यरूशलेम शहरामध्ये राहतात ते यहूदी व त्यांचे अधिकारी यांनी त्यास ओळखले नाही, येशू हा तारणारा होता, येशूविषयी जे शब्द संदेष्ट्यानी लिहिले ते यहूदी लोकांसाठी प्रत्येक शब्बाथाच्या वारी वाचले गेले, परंतु त्यांना ते समजले नाही, यहूदी लोकांनी येशूला दोषी ठरवल्याने त्यांनी ते भविष्यावाद्यांचे शब्द खरे ठरवले. येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत, पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्यास जिवे मारावे. शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते, ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले, मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले व त्यास कबरेत ठेवले. पण देवाने त्यास मरणातून उठवले. यानंतर, पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते, त्यांना गालील प्रांतापासून यरूशलेम शहरापर्यंत येशूने दर्शन दिले, ते लोक आता त्याचे साक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत. आम्ही तुम्हास देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो. आम्ही त्यांची लेकरे आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले, देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याद्वारे केले, आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्येसुद्धा वाचतोः ‘तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.’ शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्यास मरणातून उठवले, याविषयी त्याने असे सांगितले आहे की, ‘दाविदाला देण्यात आलेली पवित्र व निश्चित आशीर्वाद तुम्हास देईन.’ म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतोः ‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’ कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून मरण पावला, आपल्या वाडवडिलांशेजारी त्यास पुरले आणि कबरेत त्याचे शरीर कुजले. पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठवले, त्यास कुजण्याचा अनुभव आला नाही. बंधुनो, आम्ही जी घोषणा करीत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हास मिळू शकते. मोशेचे नियमशास्त्र तुम्हास तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही, पण प्रत्येक व्यक्ती जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याद्वारे त्या सर्वांविषयी न्यायी ठरविली जाते. संदेष्टयांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा! या गोष्टी तुमच्याबाबत होऊ नयेत म्हणून जपा. अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळामध्ये मी एक कार्य करतो, ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.” जेव्हा पौल व बर्णबा जाऊ लागले, तेव्हा लोक म्हणाले की, पुढील शब्बाथाच्या दिवशी परत या आणि आम्हास याविषयी अधिक सांगा. सभास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले, पौल व बर्णबा यांनी त्या लोकांस देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंती केली. पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी एकत्र जमले. यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले, त्यामुळे यहूदी लोकांस मत्सर वाटू लागला, तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला. पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले, ते म्हणाले, “देवाचे वचन तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हास सांगितलेच पाहिजे, पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात, तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील परराष्ट्रीय लोकांकडे जाऊ. प्रभूने आम्हास आज्ञा दिली आहे की, ‘परराष्ट्रीयांसाठी मी तुम्हास प्रकाश असे केले यासाठी की, तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांस तारणाचा मार्ग दाखवू शकाल.’ जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, परमेश्वराच्या वचनाला त्यांनी गौरव दिले आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी वचनावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते. आणि परमेश्वराचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला.” तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धार्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले, त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले. मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली व ते इकुन्या शहराला गेले. इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
प्रेषितांची कृत्ये 13:26-52 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“अब्राहामाची संतान, माझ्या प्रिय भावांनो आणि परमेश्वराचे भय धरणार्या गैरयहूदीयांनो, तारणाचा संदेश आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे. यरुशलेममधील लोकांनी व त्यांच्या शासकांनी येशूंना ओळखले नाही, त्यांना दोषी ठरवून संदेष्ट्यांच्या त्या शब्दांची पूर्तता केली, ज्या शब्दांचे वाचन प्रत्येक शब्बाथ दिवशी त्यांच्यामध्ये केले जात होते. त्यांना जिवे मारण्यासाठी एकही योग्य पुरावा त्यांना सापडला नाही, तरी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी पिलाताकडे केली. त्यांच्याबद्दलची सर्व भविष्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांना क्रूसावरून खाली उतरवले व कबरेत ठेवले. परंतु परमेश्वराने त्यांना मृतांतून उठविले, जे गालीलाहून प्रवास करीत यरुशलेमला त्यांच्याबरोबर आले होते, त्यांना पुष्कळ दिवस ते प्रकट झाले. तेच आता आपल्या लोकांस त्यांचे साक्षीदार आहेत. “यासाठी, आम्ही तुम्हाला शुभवार्ता सांगतो की: परमेश्वराने ते वचन त्यांनी येशूंना मरणातून उठवून आमच्यासाठी म्हणजे त्यांच्या संतानासाठी पूर्ण केले आहे. त्याप्रमाणे दुसर्या स्तोत्रसंहितेमध्ये असे लिहिले आहे: “ ‘तू माझा पुत्र आहे आज मी तुझा पिता झालो आहे.’ त्यांना कुजण्याचा अनुभव कधीही येऊ नये म्हणून परमेश्वराने त्यांना मरणातून जिवंत केले. परमेश्वर असे म्हणाले, “ ‘दावीद राजाला पवित्र व निश्चित आशीर्वाद देण्याचे वचन मी दिले होते.’ म्हणून दुसर्या एका ठिकाणी सुद्धा असे लिहिले आहे, “ ‘तू तुझ्या पवित्र जनाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’ “दावीदाने परमेश्वराच्या उद्देशाप्रमाणे आपल्या पिढीची सेवा केल्यानंतर, तो मरण पावला; त्याला त्याच्या पूर्वजांबरोबर पुरले आणि त्याचे शरीर कुजले. परंतु ज्याला परमेश्वराने मृतातून उठविले आणि त्याचे शरीर कुजले नाही. “यासाठी माझ्या मित्रांनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, येशूंच्याद्वारे पापक्षमेची घोषणा ही तुमच्यासाठी केली आहे. जो प्रत्येकजण विश्वास ठेवतो, तो त्यांच्याद्वारे सर्व पापांपासून मुक्त होतो, मोशेच्या नियमशास्त्राच्या आधारे ही गोष्ट पटवून देणे तुम्हाला शक्य झाले नव्हते. यास्तव सावध राहा, संदेष्ट्यांनी जे सांगितले ते तुमच्या संदर्भात होऊ नये: “ ‘निंदा करणार्यांनो, पाहा, विस्मित होऊन नष्ट व्हा, कारण तुमच्या काळात मी जे काही कार्य करणार आहे, त्याबद्दल तुम्हाला कोणी सांगितले तरी त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.’” पौल व बर्णबा सभागृह सोडून जात होते त्यावेळी पुढील शब्बाथ दिवशी या गोष्टींबद्दल त्यांनी अधिक माहिती द्यावी, अशी लोकांनी त्यांना विनंती केली. मग सभा संपल्यावर, अनेक यहूदी आणि यहूद्यांच्या संस्कृतीप्रमाणे धर्मांतर करून आलेले भक्त पौल व बर्णबा यांच्यामागे गेले, त्यांनी त्यांच्याबरोबर बोलणे केले तेव्हा त्यांनी परमेश्वराच्या कृपेमध्ये सतत वाढत राहावे, असे पौल आणि बर्णबा यांनी त्यांना उत्तेजन दिले. पुढील शब्बाथाच्या दिवशी जवळजवळ संपूर्ण शहरातील लोक प्रभुचे वचन ऐकण्यासाठी एकत्रित झाले. परंतु यहूद्यांनी समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना हेवा वाटला आणि पौल जे बोलत होता त्याला विरोध करून त्यांनी त्याची निंदानालस्ती केली. मग पौल आणि बर्णबा हे निर्भयपणे बोलले: “हे परमेश्वराचे वचन प्रथम तुम्हाला देण्याचे अगत्य होते. ज्याअर्थी तुम्ही ते नाकारले आहे आणि सार्वकालिक जीवनाकरीता तुम्ही स्वतः योग्य नाहीत, असे दाखविले आहे, त्याअर्थी आम्ही गैरयहूदीयांकडे वळतो. यासाठी प्रभुने आम्हाला ही आज्ञा दिली आहे की: “ ‘पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुमच्याद्वारे मिळणारे तारण लाभावे, म्हणून मी तुला गैरयहूदीयांसाठी प्रकाश असे केले आहे.’ ” गैरयहूदीयांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते आनंदित झाले आणि त्यांनी प्रभुच्या वचनाचा सन्मान केला व त्यावर विश्वास ठेवला. प्रभुचे वचन सर्व प्रांतात पसरले. परंतु यहूदी पुढार्यांनी शहरातील उच्च वर्गातील धार्मिक स्त्रियांना व प्रमुख व्यक्तिंना चिथवीले. त्यांनी पौल व बर्णबा यांचा छळ करून त्यांना त्यांच्या प्रांतातून हाकलून दिले. तेव्हा त्यांनी इशारा म्हणून त्या शहराची धूळ तेथेच झटकून टाकली आणि ते इकुन्यास गेले. आणि शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले.
प्रेषितांची कृत्ये 13:26-52 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहो बंधुजनहो, अब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो, व तुमच्यापैकी देवाचे भय बाळगणार्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. कारण यरुशलेमवासीयांनी व त्यांच्या अधिकार्यांनी त्याला न ओळखता आणि दर शब्बाथ दिवशी वाचून दाखवण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून ते शब्द पूर्ण केले. आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली. मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्वकाही पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले. त्याच्याबरोबर जे गालीलाहून यरुशलेमेत आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे; ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत. आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्याआमच्या मुलाबाळांकरता पूर्ण केले आहे; स्तोत्र दुसरे ह्यातही असे लिहिले आहे की, ‘तू माझा पुत्र आहेस; आज मी तुला जन्म दिला आहे.’ शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्याला मेलेल्यांतून उठवले; ह्याविषयी त्याने असे म्हटले आहे की, ‘दाविदाला दिलेले जे पवित्र व विश्वसनीय दान ते तुम्हांला’ देईन. म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, ‘तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’ कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला, आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला; परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असो की, ह्याच्या द्वारे तुम्हांला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे; आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो. म्हणून सावध राहा, नाहीतर संदेष्ट्याच्या ग्रंथात जे सांगितलेले आहे ते तुमच्यावर येईल : ‘अहो धिक्कार करणार्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा; कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हांला कोणी सविस्तर सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणारच नाही.”’ ते बाहेर जात असता लोकांनी विनंती केली की, आम्हांला पुढल्या शब्बाथ दिवशी ह्या गोष्टी सांगाव्यात. आणि सभा उठल्यावर, यहूद्यांतील व भक्तिमान यहूदीयमतानुसारी ह्यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा ह्यांच्यामागे गेले; त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांचे मन वळवले. पुढल्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले. पण लोकसमुदायांना पाहून यहूदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. तेव्हा पौल व बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगण्याचे अगत्य होते; तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्या अर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो. कारण प्रभूने आम्हांला आज्ञा दिली आहे की, ‘मी तुला परराष्ट्रीयांसाठी प्रकाश करून ठेवले आहे, ह्यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस.”’ हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णन केला; तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला. आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले. तेव्हा यहूदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्यास गेले. इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
प्रेषितांची कृत्ये 13:26-52 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अहो बंधुजनहो, अब्राहामच्या वंशांतील पुत्रांनो व देवाचे भय बाळगणाऱ्या यहुदीतरांनो, आपल्याला ह्या तारणाचे वर्तमान पाठवलेले आहे! कारण यरुशलेमवासीयांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी येशूला न ओळखता आणि दर साबाथ दिवशी वाचून दाखविण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून त्यांनी संदेष्ट्यांचे शब्द पूर्ण केले आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा, अशी विनंती त्यांनी पिलातला केली. त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला क्रुसावरून खाली काढून कबरीमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मरणातून उठवले. त्याच्याबरोबर जे गालीलहून यरुशलेम येथे आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे, ते आता इस्राएली लोकांसाठी त्याचे साक्षीदार आहेत. आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते, त्याचे शुभवर्तमान आम्ही तुम्हांला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून त्याचे वचन आपल्याकरता पूर्ण केले आहे. दुसऱ्या स्तोत्रात असे लिहिले आहे, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले, ह्याविषयी त्याने असे म्हटले आहे, दावीदला जे वचन दिले होते त्यानुसार मी तुम्हांला पवित्र व निश्चित असा आशीर्वाद देईन. म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, तू आपल्या पवित्र सेवकाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. कारण दावीद त्याच्या स्वतःच्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून निधन पावला आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याचा मृतदेह कुजला. परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असावे की, ह्याच्याद्वारे तुमच्या पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. ज्याविषयी मोशेच्या नियमशास्रानुसार तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो. म्हणून सावध राहा, नाहीतर संदेष्ट्यांच्या ग्रंथात जे सांगितले आहे ते तुमच्यावर ओढवेल, अहो उपहास करणाऱ्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हांला कोणी स्पष्टीकरण देऊन सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पौल व बर्णबा बाहेर जात असता लोकांनी विनंती केली, “आम्हांला पुढल्या साबाथ दिवशी ह्याविषयी अधिक ऐकायला आवडेल.” सभा संपल्यावर यहुदी लोकांमधील व परिवर्तित यहुदी मतानुसारी ह्यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा ह्यांच्या मागे गेले. त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्याकरिता त्यांना प्रोत्साहन दिले. पुढच्या साबाथ दिवशी जवळ जवळ सर्व नगर, देवाचे वचन ऐकावयाला जमले. पण लोकसमुदायाला पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. परंतु पौल आणि बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगणे अगत्याचे होते, तरी ज्याअर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांस शाश्वत जीवनाकरता अयोग्य ठरवता, त्याअर्थी आम्ही यहुदीतरांकडे वळतो; कारण प्रभूने आम्हांला अशी आज्ञा दिली आहे, मी तुला यहुदीतरांसाठी प्रकाश असे करून ठेवले आहे. ह्यासाठी की, सर्व जगाचे तारण व्हावे.” हे ऐकून यहुदीतर आनंदित झाले, त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला आणि जितके शाश्वत जीवनासाठी निवडलेले होते, तितक्यांनी विश्वास ठेवला. प्रभूचे वचन त्या सर्व प्रदेशात पसरत गेले. यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील प्रतिष्ठित पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या प्रदेशाबाहेर घालवून लावले. प्रेषित त्यांचा विरोध दर्शवीत पायांची धूळ झटकून तेथून इकुन्य येथे गेले. अंत्युखियामधील श्रद्धावंत आनंदाने व पवित्र आत्म्याने भरून गेले.