YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 13:26-52

प्रेषितांची कृत्ये 13:26-52 MARVBSI

अहो बंधुजनहो, अब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो, व तुमच्यापैकी देवाचे भय बाळगणार्‍यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. कारण यरुशलेमवासीयांनी व त्यांच्या अधिकार्‍यांनी त्याला न ओळखता आणि दर शब्बाथ दिवशी वाचून दाखवण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून ते शब्द पूर्ण केले. आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली. मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्वकाही पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले. त्याच्याबरोबर जे गालीलाहून यरुशलेमेत आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे; ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत. आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्याआमच्या मुलाबाळांकरता पूर्ण केले आहे; स्तोत्र दुसरे ह्यातही असे लिहिले आहे की, ‘तू माझा पुत्र आहेस; आज मी तुला जन्म दिला आहे.’ शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्याला मेलेल्यांतून उठवले; ह्याविषयी त्याने असे म्हटले आहे की, ‘दाविदाला दिलेले जे पवित्र व विश्वसनीय दान ते तुम्हांला’ देईन. म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, ‘तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’ कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला, आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला; परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असो की, ह्याच्या द्वारे तुम्हांला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे; आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो. म्हणून सावध राहा, नाहीतर संदेष्ट्याच्या ग्रंथात जे सांगितलेले आहे ते तुमच्यावर येईल : ‘अहो धिक्कार करणार्‍यांनो, पाहा, आश्‍चर्य करा व नाहीसे व्हा; कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हांला कोणी सविस्तर सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणारच नाही.”’ ते बाहेर जात असता लोकांनी विनंती केली की, आम्हांला पुढल्या शब्बाथ दिवशी ह्या गोष्टी सांगाव्यात. आणि सभा उठल्यावर, यहूद्यांतील व भक्तिमान यहूदीयमतानुसारी ह्यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा ह्यांच्यामागे गेले; त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांचे मन वळवले. पुढल्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले. पण लोकसमुदायांना पाहून यहूदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. तेव्हा पौल व बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगण्याचे अगत्य होते; तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्या अर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो. कारण प्रभूने आम्हांला आज्ञा दिली आहे की, ‘मी तुला परराष्ट्रीयांसाठी प्रकाश करून ठेवले आहे, ह्यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस.”’ हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णन केला; तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला. आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले. तेव्हा यहूदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्यास गेले. इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.

प्रेषितांची कृत्ये 13:26-52 साठी चलचित्र