YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 12:5-11

प्रेषितांची कृत्ये 12:5-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून पेत्राला तुंरूगात ठेवण्यात आले, पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती. पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. तेव्हा पाहा, अचानक परमेश्वराचा दूत तेथे उभा राहिला, तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला, देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्यास उठवले, देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल,” मग पेत्राने कपडे घातले, मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये.” मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्यामागे चालला, पेत्राला कळत नव्हते की, हे खरोखर काय करीत आहे, त्यास वाटले आपण दृष्टांत पाहत आहोत. पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी दाराजवळ येऊन पोहोचले, ते त्यांच्यासाठी आपोआप उघडले, पेत्र व देवदूत दरवाजामधून बाहेर पडले, त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला. पेत्राला मग कळले की नक्की काय घडले आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने खरोखर त्याचा दूत माझ्याकडे पाठविला व त्याने मला हेरोदाच्या हातातून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”

प्रेषितांची कृत्ये 12:5-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले होते, परंतु मंडळी त्याच्यासाठी परमेश्वराकडे एकाग्रतेने प्रार्थना करत होती. हेरोद त्याला चौकशीसाठी बाहेर आणणार होता त्या आधीच्या रात्री, पेत्र दोन बेड्या घातलेला असा दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता आणि पहारेकरी प्रवेशद्वारापुढे रक्षण करीत उभे होते. तेव्हा अकस्मात तुरुंगाच्या खोलीत प्रकाश पडला आणि पाहा, प्रभुचा दूत पेत्राजवळ प्रकट झाला. त्या दूताने पेत्रावर हात ठेऊन त्याला जागे केले व म्हटले, “लवकर, ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील बेड्या गळून पडल्या. मग देवदूताने त्याला सांगितले, “कपडे घाल आणि पायात जोडे घाल.” तेव्हा पेत्राने त्याप्रमाणे केले. मग देवदूताने त्याला आज्ञा केली, “आता तुझा अंगरखा लपेट आणि माझ्यामागे ये.” पेत्र तुरुंगातून निघून त्‍याच्यामागे चालू लागला, परंतु देवदूत जे करीत होता ते सर्व खरोखर घडत होते याची त्याला कल्पना नव्हती; तो एक दृष्टांत पाहत आहे असे त्याला वाटले. त्यांनी पहिल्या व दुसर्‍या पहारेकर्‍यांना ओलांडले आणि ते शहरात जाण्याच्या लोखंडी द्वारापर्यंत पोहोचले. त्यावेळी तो दरवाजा त्यांच्यासाठी आपोआपच उघडला गेला आणि ते त्यातून बाहेर पडले. जेव्हा पुढे एका रस्त्याइतके अंतर ते चालून गेल्यानंतर अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला. पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला निःसंशय कळून आले की प्रभुने त्याचा देवदूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोक ज्या गोष्टींची अपेक्षा करीत होते त्यापासून मला सोडविले आहे.”

प्रेषितांची कृत्ये 12:5-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहार्‍यात होता; परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोन शिपायांच्या मध्ये निजला होता, आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पाहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला; त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, “लवकर ऊठ.” तेव्हा त्याच्या हातांतील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, “कंबर बांध व पायांत वहाणा घाल;” त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, “तू आपले वस्त्र पांघरून माझ्यामागे ये.” तो निघून त्याच्यामागे गेला; तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना; आपण दृष्टान्त पाहत आहोत असेच त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर, तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला; आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले, तेव्हा लगेच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”

प्रेषितांची कृत्ये 12:5-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता. मात्र त्याच्याकरिता देवाजवळ ख्रिस्तमंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. हेरोद त्याला बाहेर लोकांसमोर आणणार होता, त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये झोपला होता. पहारेकरी तुरुंगाच्या दरवाजापुढे पहारा करत होते. अचानक, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड पडला. त्याने पेत्राच्या खांद्यावर थापटून त्याला जागे करून म्हटले, “लवकर उठ.” तत्क्षणी त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. देवदूत त्याला म्हणाला, “तयार हो व पायांत वाहाणा घाल.” त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, “तू आपला झगा घालून माझ्यामागे ये.” तो निघून त्याच्यामागे गेला. तरी देवदूताने जे केले ते खरोखर घडत आहे, यावर त्याचा विश्वास बसेना. आपण दृष्टान्त पाहत आहोत, असे त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते शहरात जाण्याऱ्या लोखंडी दरवाज्याजवळ आल्यावर तो त्यांच्यासाठी आपोआप उघडला गेला. ते बाहेर पडून पुढे एका रस्त्यावरून चालून गेले, तोच देवदूत पेत्रला सोडून गेला. पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले आहे की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदच्या तावडीतून यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”