प्रेषित 12
12
पेत्राची तुरुंगातून चमत्कारिक सुटका
1त्याच सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही लोकांना छळावे म्हणून बंदिस्त केले. 2त्याने योहानाचा भाऊ याकोब, याचा तलवारीने वध करविला. 3या कृत्याने यहूदी प्रसन्न झाल्याचे पाहून, हेरोद पेत्रालासुद्धा अटक करण्यास पुढे आला. हे बेखमीर भाकरीच्या सणाच्या वेळेस घडले. 4पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले आणि त्याच्यावर चार शिपायांच्या चार दलांचा पहारा बसविला. वल्हांडण सण झाल्यावर त्याला बाहेर आणून समुदायापुढे चौकशी करावी असा हेरोदाचा हेतू होता.
5पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले होते, परंतु मंडळी त्याच्यासाठी परमेश्वराकडे एकाग्रतेने प्रार्थना करत होती.
6हेरोद त्याला चौकशीसाठी बाहेर आणणार होता त्या आधीच्या रात्री, पेत्र दोन बेड्या घातलेला असा दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता आणि पहारेकरी प्रवेशद्वारापुढे रक्षण करीत उभे होते. 7तेव्हा अकस्मात तुरुंगाच्या खोलीत प्रकाश पडला आणि पाहा, प्रभुचा दूत पेत्राजवळ प्रकट झाला. त्या दूताने पेत्रावर हात ठेऊन त्याला जागे केले व म्हटले, “लवकर, ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील बेड्या गळून पडल्या.
8मग देवदूताने त्याला सांगितले, “कपडे घाल आणि पायात जोडे घाल.” तेव्हा पेत्राने त्याप्रमाणे केले. मग देवदूताने त्याला आज्ञा केली, “आता तुझा अंगरखा लपेट आणि माझ्यामागे ये.” 9पेत्र तुरुंगातून निघून त्याच्यामागे चालू लागला, परंतु देवदूत जे करीत होता ते सर्व खरोखर घडत होते याची त्याला कल्पना नव्हती; तो एक दृष्टांत पाहत आहे असे त्याला वाटले. 10त्यांनी पहिल्या व दुसर्या पहारेकर्यांना ओलांडले आणि ते शहरात जाण्याच्या लोखंडी द्वारापर्यंत पोहोचले. त्यावेळी तो दरवाजा त्यांच्यासाठी आपोआपच उघडला गेला आणि ते त्यातून बाहेर पडले. जेव्हा पुढे एका रस्त्याइतके अंतर ते चालून गेल्यानंतर अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला.
11पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला निःसंशय कळून आले की प्रभुने त्याचा देवदूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोक ज्या गोष्टींची अपेक्षा करीत होते त्यापासून मला सोडविले आहे.”
12हे त्याला स्पष्टपणे समजल्यानंतर, योहान ज्याला मार्क असे सुद्धा म्हणतात त्याची आई मरीया, हिच्या घरी गेला. तेथे अनेक लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. 13त्याने अंगणाचा दरवाजा ठोठावला आणि रुदा नावाची एक दासी दार उघडण्यासाठी आली. 14तिने पेत्राचा आवाज ओळखला, तेव्हा तिला एवढा आनंद झाला की दरवाजा न उघडता ती पुन्हा आत धावत गेली आणि, “पेत्र दारात आहे!” असे तिने सांगितले.
15ते तिला म्हणाले, “तुझे मन ठिकाण्यावर नाही,” परंतु ती आग्रहाने सांगू लागली, तेव्हा ते म्हणाले की, “तो त्याचा देवदूत असावा.”
16परंतु पेत्र ठोठावीत राहिला आणि जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला व त्याला पाहिले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. 17पेत्राने त्यांना आपल्या हाताने खुणावून शांत केले आणि प्रभुने त्याला तुरुंगातून कसे बाहेर काढले, हे त्यांना सविस्तर सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, “याकोब आणि बंधू भगिनींना याबद्दल सांगा,” मग तो दुसर्या स्थळी निघून गेला.
18पहाट झाल्यावर, पेत्राचे काय झाले असावे या विचाराने सैनिकांमध्ये एकच गडबड उडाली. 19हेरोदाने त्याचा पूर्ण शोध करूनही तो सापडला नाही, तेव्हा त्याने त्या सोळा पहारेकर्यांची उलट तपासणी करून त्यांना मरणदंडाच्या शिक्षेचा आदेश दिला.
हेरोदाचा मृत्यू
यानंतर हेरोद यहूदीयातून कैसरीयात गेला व तेथे राहिला. 20तो सोर व सीदोन येथील लोकांबरोबर भांडण करीत होता; ते आता एकत्र झाले आणि त्यांनी त्याच्याबरोबर विशेष भेट ठरविली. राजाचा विश्वासू वैयक्तिक सेवक ब्लस्त याचा पाठिंबा मिळविल्यानंतर त्यांनी शांततेची मागणी केली, कारण ही शहरे त्यांच्या अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी हेरोद राजाच्या देशावर अवलंबून होती.
21नेमलेल्या दिवशी हेरोद, आपली राजवस्त्रे परिधान करून राजासनावर बसला आणि त्यांच्यापुढे जाहीर भाषण करू लागला. 22ते ओरडले, “ही मनुष्याची नव्हे परंतु परमेश्वराची वाणी आहे.” 23हेरोदाने परमेश्वराला मान दिला नाही, म्हणून प्रभुच्या दूताने हेरोदावर तत्काळ प्रहार करून त्याला खाली पाडले आणि त्याला किड्यांनी खाऊन टाकले आणि तो मरण पावला.
24परंतु परमेश्वराचे वचन पसरत राहिले आणि तेथे पुष्कळ नवीन विश्वासणारे तयार झाले.
बर्णबा आणि शौल यांना निरोप
25जेव्हा बर्णबा आणि शौल यांनी यरुशलेममधील त्यांचे सेवाकार्य पूर्ण केले, तेव्हा योहान ज्याला मार्क असेही म्हणत त्याला त्यांच्याबरोबर घेऊन ते परत आले.
सध्या निवडलेले:
प्रेषित 12: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.