प्रेषितांची कृत्ये 12:1-25
प्रेषितांची कृत्ये 12:1-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले. ते यहूदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरता त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहार्यात होता; परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोन शिपायांच्या मध्ये निजला होता, आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पाहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला; त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, “लवकर ऊठ.” तेव्हा त्याच्या हातांतील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, “कंबर बांध व पायांत वहाणा घाल;” त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, “तू आपले वस्त्र पांघरून माझ्यामागे ये.” तो निघून त्याच्यामागे गेला; तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना; आपण दृष्टान्त पाहत आहोत असेच त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर, तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला; आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले, तेव्हा लगेच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.” हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरीया हिच्या घरी गेला; तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. तो दरवाजाची दिंडी ठोकत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सांगितले की, ‘पेत्र दाराशी उभा आहे.’ त्यांनी तिला म्हटले, “तू बावचळलीस.” तरी तिने खातरीपूर्वक सांगितले की, “मी म्हणते तसेच आहे.” ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत आहे!” मग पेत्र तसाच ठोकत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले. तेव्हा ‘उगे राहा,’ म्हणून त्याने हाताने त्यांना खुणावले, आणि आपल्याला प्रभूने कसे बाहेर काढले हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले की, “हे याकोबाला व बंधुजनांना सांगा.” नंतर तो दुसर्या ठिकाणी निघून गेला. मग दिवस उगवल्यावर, पेत्राचे काय झाले ह्याविषयी शिपायांत मोठी खळबळ उडाली. हेरोदाने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही; म्हणून त्याने पहारेकर्यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. मग तो यहूदीयाहून कैसरीयात येऊन राहिला. हेरोद सोरकरांवर व सीदोनकरांवर रागावला होता; म्हणून ते एकमताने त्याच्याकडे आले; व राजाच्या रंगमहालावरील अधिकारी ब्लस्त ह्याला अनुकूल करून घेऊन, त्यांनी समेट करण्याची विनंती केली, कारण त्या राजाच्या देशावर त्यांच्या देशाचे पोषण होत असे. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, “ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे.” त्याने देवाचा गौरव केला नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. पण देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. बर्णबा व शौल हे आपली सेवा पूर्ण करून, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घेऊन यरुशलेमेहून माघारी आले.
प्रेषितांची कृत्ये 12:1-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या वेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. योहानाचा भाऊ याकोबा ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले. हेरोदाने पाहिले की, यहूदी अधिकाऱ्यांना हे आवडले आहे, म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरवले, ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले, त्याच्या रखवालीकरिता त्यास शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले, वल्हांडण सण झाल्यावर पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना होती. म्हणून पेत्राला तुंरूगात ठेवण्यात आले, पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती. पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. तेव्हा पाहा, अचानक परमेश्वराचा दूत तेथे उभा राहिला, तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला, देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्यास उठवले, देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल,” मग पेत्राने कपडे घातले, मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये.” मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्यामागे चालला, पेत्राला कळत नव्हते की, हे खरोखर काय करीत आहे, त्यास वाटले आपण दृष्टांत पाहत आहोत. पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी दाराजवळ येऊन पोहोचले, ते त्यांच्यासाठी आपोआप उघडले, पेत्र व देवदूत दरवाजामधून बाहेर पडले, त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला. पेत्राला मग कळले की नक्की काय घडले आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने खरोखर त्याचा दूत माझ्याकडे पाठविला व त्याने मला हेरोदाच्या हातातून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.” या गोष्टींची जाणीव झाल्यावर पेत्र मरीयेच्या घरी गेला, ती योहान ज्याला मार्कही म्हणत त्याची आई होती, पुष्कळ लोक त्याठिकाणी जमले होते, ते सर्व प्रार्थना करीत होते. पेत्राने फाटकाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा रुदा नावाची दासी फाटक उघडण्यासाठी आली. तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली, ती फाटक उघडण्याचेसुद्धा विसरून गेली, ती आतमध्ये पळाली आणि लोकांस तिने सांगितले, “पेत्र दाराजवळ उभा आहे.” विश्वास ठेवणारे रुदाला म्हणाले, “तुला वेड लागले आहे!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली, म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिजे.” पण पेत्र बाहेरून फाटक सारखे ठोठावत होता, जेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांनी फाटक उघडले, तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले, ते चकित झाले होते. पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले, मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले, तो म्हणाला, “याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा,” मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला. दुसऱ्या दिवाशी शिपाई फार हताश झाले होते, पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते. हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्यास शोधू शकला नाही, मग हेरोदाने पहारेकऱ्यांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली, नंतर हेरोद यहूदीया प्रांतातून निघून गेला, तो कैसरीया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला. हेरोद सोर व सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता, ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले, ब्लस्तला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले, ब्लस्त हा राजाचा खाजगी सेवक होता, लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता. हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरवला, त्यादिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता, तो न्यायासनावर बसून लोकांसमोर भाषण करू लागला. लोक मोठ्याने आरोळी करून म्हणाले, “ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!” हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला. आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून परमेश्वराच्या दूताने त्यावर प्रहार केला, तो किडे पडून मरण पावला. देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरत गेले व लोकांस प्रेरित करीत होता, विश्वास ठेवणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता. बर्णबा व शौलाने त्यांचे यरूशलेम शहरातील काम संपविल्यानंतर ते अंत्युखियाला परत आले, त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले.
प्रेषितांची कृत्ये 12:1-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याच सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही लोकांना छळावे म्हणून बंदिस्त केले. त्याने योहानाचा भाऊ याकोब, याचा तलवारीने वध करविला. या कृत्याने यहूदी प्रसन्न झाल्याचे पाहून, हेरोद पेत्रालासुद्धा अटक करण्यास पुढे आला. हे बेखमीर भाकरीच्या सणाच्या वेळेस घडले. पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले आणि त्याच्यावर चार शिपायांच्या चार दलांचा पहारा बसविला. वल्हांडण सण झाल्यावर त्याला बाहेर आणून समुदायापुढे चौकशी करावी असा हेरोदाचा हेतू होता. पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले होते, परंतु मंडळी त्याच्यासाठी परमेश्वराकडे एकाग्रतेने प्रार्थना करत होती. हेरोद त्याला चौकशीसाठी बाहेर आणणार होता त्या आधीच्या रात्री, पेत्र दोन बेड्या घातलेला असा दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता आणि पहारेकरी प्रवेशद्वारापुढे रक्षण करीत उभे होते. तेव्हा अकस्मात तुरुंगाच्या खोलीत प्रकाश पडला आणि पाहा, प्रभुचा दूत पेत्राजवळ प्रकट झाला. त्या दूताने पेत्रावर हात ठेऊन त्याला जागे केले व म्हटले, “लवकर, ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील बेड्या गळून पडल्या. मग देवदूताने त्याला सांगितले, “कपडे घाल आणि पायात जोडे घाल.” तेव्हा पेत्राने त्याप्रमाणे केले. मग देवदूताने त्याला आज्ञा केली, “आता तुझा अंगरखा लपेट आणि माझ्यामागे ये.” पेत्र तुरुंगातून निघून त्याच्यामागे चालू लागला, परंतु देवदूत जे करीत होता ते सर्व खरोखर घडत होते याची त्याला कल्पना नव्हती; तो एक दृष्टांत पाहत आहे असे त्याला वाटले. त्यांनी पहिल्या व दुसर्या पहारेकर्यांना ओलांडले आणि ते शहरात जाण्याच्या लोखंडी द्वारापर्यंत पोहोचले. त्यावेळी तो दरवाजा त्यांच्यासाठी आपोआपच उघडला गेला आणि ते त्यातून बाहेर पडले. जेव्हा पुढे एका रस्त्याइतके अंतर ते चालून गेल्यानंतर अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला. पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला निःसंशय कळून आले की प्रभुने त्याचा देवदूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोक ज्या गोष्टींची अपेक्षा करीत होते त्यापासून मला सोडविले आहे.” हे त्याला स्पष्टपणे समजल्यानंतर, योहान ज्याला मार्क असे सुद्धा म्हणतात त्याची आई मरीया, हिच्या घरी गेला. तेथे अनेक लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. त्याने अंगणाचा दरवाजा ठोठावला आणि रुदा नावाची एक दासी दार उघडण्यासाठी आली. तिने पेत्राचा आवाज ओळखला, तेव्हा तिला एवढा आनंद झाला की दरवाजा न उघडता ती पुन्हा आत धावत गेली आणि, “पेत्र दारात आहे!” असे तिने सांगितले. ते तिला म्हणाले, “तुझे मन ठिकाण्यावर नाही,” परंतु ती आग्रहाने सांगू लागली, तेव्हा ते म्हणाले की, “तो त्याचा देवदूत असावा.” परंतु पेत्र ठोठावीत राहिला आणि जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला व त्याला पाहिले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. पेत्राने त्यांना आपल्या हाताने खुणावून शांत केले आणि प्रभुने त्याला तुरुंगातून कसे बाहेर काढले, हे त्यांना सविस्तर सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, “याकोब आणि बंधू भगिनींना याबद्दल सांगा,” मग तो दुसर्या स्थळी निघून गेला. पहाट झाल्यावर, पेत्राचे काय झाले असावे या विचाराने सैनिकांमध्ये एकच गडबड उडाली. हेरोदाने त्याचा पूर्ण शोध करूनही तो सापडला नाही, तेव्हा त्याने त्या सोळा पहारेकर्यांची उलट तपासणी करून त्यांना मरणदंडाच्या शिक्षेचा आदेश दिला. यानंतर हेरोद यहूदीयातून कैसरीयात गेला व तेथे राहिला. तो सोर व सीदोन येथील लोकांबरोबर भांडण करीत होता; ते आता एकत्र झाले आणि त्यांनी त्याच्याबरोबर विशेष भेट ठरविली. राजाचा विश्वासू वैयक्तिक सेवक ब्लस्त याचा पाठिंबा मिळविल्यानंतर त्यांनी शांततेची मागणी केली, कारण ही शहरे त्यांच्या अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी हेरोद राजाच्या देशावर अवलंबून होती. नेमलेल्या दिवशी हेरोद, आपली राजवस्त्रे परिधान करून राजासनावर बसला आणि त्यांच्यापुढे जाहीर भाषण करू लागला. ते ओरडले, “ही मनुष्याची नव्हे परंतु परमेश्वराची वाणी आहे.” हेरोदाने परमेश्वराला मान दिला नाही, म्हणून प्रभुच्या दूताने हेरोदावर तत्काळ प्रहार करून त्याला खाली पाडले आणि त्याला किड्यांनी खाऊन टाकले आणि तो मरण पावला. परंतु परमेश्वराचे वचन पसरत राहिले आणि तेथे पुष्कळ नवीन विश्वासणारे तयार झाले. जेव्हा बर्णबा आणि शौल यांनी यरुशलेममधील त्यांचे सेवाकार्य पूर्ण केले, तेव्हा योहान ज्याला मार्क असेही म्हणत त्याला त्यांच्याबरोबर घेऊन ते परत आले.
प्रेषितांची कृत्ये 12:1-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्याच सुमारास हेरोद राजाने ख्रिस्तमंडळीतल्या काही जणांचा छळ सुरू केला. योहानचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने ठार मारले. ते यहुदी लोकांना आवडले, असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात टाकले आणि त्याच्यावर पहारा ठेवण्यासाठी त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. ओलांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे सादर करावे, असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता. मात्र त्याच्याकरिता देवाजवळ ख्रिस्तमंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. हेरोद त्याला बाहेर लोकांसमोर आणणार होता, त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये झोपला होता. पहारेकरी तुरुंगाच्या दरवाजापुढे पहारा करत होते. अचानक, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड पडला. त्याने पेत्राच्या खांद्यावर थापटून त्याला जागे करून म्हटले, “लवकर उठ.” तत्क्षणी त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. देवदूत त्याला म्हणाला, “तयार हो व पायांत वाहाणा घाल.” त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, “तू आपला झगा घालून माझ्यामागे ये.” तो निघून त्याच्यामागे गेला. तरी देवदूताने जे केले ते खरोखर घडत आहे, यावर त्याचा विश्वास बसेना. आपण दृष्टान्त पाहत आहोत, असे त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते शहरात जाण्याऱ्या लोखंडी दरवाज्याजवळ आल्यावर तो त्यांच्यासाठी आपोआप उघडला गेला. ते बाहेर पडून पुढे एका रस्त्यावरून चालून गेले, तोच देवदूत पेत्रला सोडून गेला. पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले आहे की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदच्या तावडीतून यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.” हे लक्षात आल्यावर तो योहान ऊर्फ मार्कची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. तो बाहेरच्या दरवाजाची कडी वाजवत असता रूदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. तिने पेत्राचा आवाज ओळखला आणि तिला इतका आनंद झाला की, दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सर्वांना सांगितले, “पेत्र दाराशी उभा आहे.” त्यांनी तिला म्हटले, “तू वेडी आहेस”, तरीही तिने खातरीपूर्वक सांगितले, “मी म्हणते तसेच आहे.” ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत आहे.” पेत्र तसाच ठोठावत राहिला असता शेवटी त्यांनी दरवाजा उघडला. त्याला पाहून ते थक्क झाले! त्याने हाताने त्यांना खुणावून गप्प राहायला सुचवून आपणाला प्रभूने कसे बाहेर काढले, हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले, “हे याकोबला व बंधुजनांना सांगा.” नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला. दिवस उगवल्यावर, पेत्राचे काय झाले, ह्याविषयी शिपायांत मोठी गडबड उडाली. हेरोदने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही म्हणून त्याने पहारेकऱ्यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. त्यानंतर हेरोद यहुदियातून निघून कैसरियात जाऊन राहिला. सोर व सिदोन येथील लोकांवर हेरोद रागावला होता म्हणून ते एक गट करून त्याच्याकडे आले व राजाच्या महालावरील अधिकारी ब्लस्त ह्याला अनुकूल करून घेऊन त्यांनी समेट करण्याची विनंती केली कारण त्यांच्या देशाला हेरोद राजाचा देश अन्नसामग्री पुरवीत असे. नंतर एका नियुक्त दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. लोक ओरडत राहिले, “ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे.” त्याने देवाला श्रेय दिले नाही म्हणून प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. दरम्यानच्या काळात देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. बर्णबा व शौल हे आपले सेवाकार्य पूर्ण करून योहान ऊर्फ मार्कला बरोबर घेऊन यरुशलेमहून परत निघाले.