प्रेषितांची कृत्ये 10:6-16
प्रेषितांची कृत्ये 10:6-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी राहत आहे त्याचे घर समुद्रकिनारी आहे. कर्नेल्याशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला नंतर कर्नेल्याने त्याचे दोन विश्वासू नोकर व एका धर्मशील शिपायाला बोलावून घेतले. कर्नेल्याने या तिघांना घडलेले सर्वकाही सांगितले आणि त्यांना यापोला पाठवले. दुसऱ्या दिवशीही माणसे यापो गावाजवळ आली, ती दुपारची वेळ होती, त्याचवेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला. पेत्राला भूक लागली होती, त्यास काही खावेसे वाटले, ते पेत्रासाठी जेवणाची तयारी करीत असता पेत्राला तंद्री लागली. आणि आपल्यासमोर आकाश उघडले असून मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेली एक चादर पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांत त्यास झाला. त्यामध्ये पृथ्वीवरील सर्वप्रकारचे चालणारे, सरपटणारे, आकाशात उडणारे पक्षी होते. नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, “पेत्रा, ऊठ; यापैकी कोणताही प्राणी मारून खा.” पण पेत्र म्हणाला, “मी तसे कधीच करणार नाही, प्रभू जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी कधी खाल्लेले नाही.” पण ती वाणी त्यास पुन्हा म्हणाली, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस.” असे तीन वेळा घडले; मग ते पात्र आकाशात वर घेतले गेले.
प्रेषितांची कृत्ये 10:6-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्याचे घर समुद्राकाठी आहे, त्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.” जो देवदूत त्याच्याबरोबर बोलला तो गेल्यानंतर, कर्नेल्याने आपल्या दोन नोकरांना आणि धर्मनिष्ठ शिपायास, जो त्याच्या वैयक्तिक सेवकांपैकी एक होता त्याला बोलाविले. घडलेली सर्व हकिकत त्याने त्यांना सांगितली आणि त्यांना योप्पाकडे पाठवून दिले. दुसर्या दिवशी दुपारच्या सुमारास ते प्रवास करीत शहराजवळ येत होते आणि इकडे पेत्र प्रार्थना करण्यासाठी घराच्या धाब्यावर गेला. त्याला भूक लागली आणि काहीतरी खावे अशी त्याला इच्छा झाली, जेवण तयार होत असताना त्याचे देहभान सुटले. त्याने पाहिले आकाश उघडलेले आहे आणि मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून खाली जमिनीकडे सोडले जात आहे. तिच्यात पृथ्वीवरील सर्वप्रकारचे चतुष्पाद प्राणी, त्याचप्रमाणे सरपटणारे जीवजंतू व आकाशातील पाखरे होती. मग एक वाणी त्याला म्हणाली, “पेत्रा ऊठ, व मारून खा.” “खात्रीने नाही, प्रभू!” पेत्राने उत्तर दिले, “मी अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही खाल्ले नाही.” दुसर्या वेळेस त्याला वाणी ऐकू आली, “परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध म्हणू नकोस.” असे तीन वेळा झाले, मग लागलीच ती चादर पुन्हा स्वर्गात वर घेतली गेली.
प्रेषितांची कृत्ये 10:6-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्या चांभाराच्या येथे उतरला आहे; त्याचे घर समुद्राच्या किनार्यास आहे. [तुला काय करावे लागेल हे तो तुला सांगेल.]” जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरांना व आपल्या हुजरातीतल्या एका भक्तिमान शिपायाला बोलावले; आणि त्यांच्याजवळ सर्व सविस्तर सांगून त्यांना यापोस पाठवले. ते दुसर्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येताना दोन प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करण्यास धाब्यावर गेला. तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले; आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यात त्याचे देहभान सुटले. तेव्हा आकाश उघडलेले व मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टान्त त्याला झाला. त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे होती. मग त्याने अशी वाणी ऐकली की, ‘पेत्रा, ऊठ; मारून खा.’ पेत्र म्हणाला, “नको, नको, प्रभू; कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही.” मग दुसर्यांदा अशी वाणी झाली की, “देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.” असे तीन वेळा झाले आणि लगेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले.
प्रेषितांची कृत्ये 10:6-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो शिमोन नावाच्या, चर्मकाराच्या घरी उतरला आहे. त्याचे घर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे.” जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता, तो निघून गेल्यानंतर त्याने त्याच्या घरच्या दोघा चाकरांना व त्याच्या व्यक्तिगत सेवेसाठी नेमलेल्या एका धार्मिक शिपायाला बोलावले आणि त्यांना सर्व सविस्तर माहिती देऊन यापो या गावी पाठवले. दुसऱ्या दिवशी ते गावाजवळ आले, तेव्हा मध्यान्हीच्या वेळी पेत्र प्रार्थना करावयास छपरावर गेला, त्याला भूक लागून काही खावेसे वाटले पण जेवणाची तयारी होत आहे, इतक्यात त्याला गाढ तंद्री लागली. आकाश उघडले आहे व मोठ्या चादरीसारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे, असा त्याने दृष्टान्त पाहिला. त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पक्षी होते. त्याला अशी वाणी ऐकू आली की, “पेत्रा, ऊठ, मारून खा.” परंतु पेत्र म्हणाला, “नको, प्रभो, कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही.” दुसऱ्यांदा त्याला वाणी ऐकू आली, “देवाने जे शुद्ध केले आहे. ते तू निषिद्ध मानू नकोस.” असे तीन वेळा झाले आणि लगेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले.