YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 1:1-8

प्रेषितांची कृत्ये 1:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे थियफिला, येशूने जे शिकवले आणि केले, व ज्या विषयी मी पहिल्या ग्रंथात नमुद केले, त्या दिवसापर्यंत जेव्हा तो वर घेतला गेला. या आज्ञा त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या प्रेषितांना दिल्या. मरण सोसल्यानंतरही येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत. हे दाखवून चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे, व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. नंतर तो त्यांच्याशी एकत्र असता त्याने त्यांना आज्ञा केली की, “यरूशलेम शहर सोडून जाऊ नका तर पित्याने देऊ केलेल्या, ज्या देणगी विषयी, तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पाहा. कारण योहानाने पाण्याने तुमचा बाप्तिस्मा केला खरा; थोडया दिवसानी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.” मग सर्वजण एकत्र जमले असताना शिष्यांनी येशूला विचारले, “प्रभूजी, याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?” तो त्यांना म्हणाला, “पित्याने स्वतःच्या अधिकारात काळ व समय ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल, तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल, आणि यरूशलेम शहरात सर्व यहूदीया आणि शोमरोन प्रांतात, व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”

प्रेषितांची कृत्ये 1:1-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

थियफिल महोदय, मी माझ्या पहिल्या ग्रंथात, येशूंनी जे काही कार्य करण्यास आणि शिक्षण देण्यास सुरुवात केली त्या दिवसापासून, त्यांच्या निवडलेल्या प्रेषितांना पवित्र आत्म्याच्याद्वारे आज्ञा केल्यानंतर येशू वर स्वर्गात घेतले गेले त्या दिवसापर्यंत घडलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांचे क्लेश संपल्यानंतर, त्यांनी आपण जिवंत आहोत हे पुष्कळ खात्रीलायक पुराव्यांनी सिद्ध केले. चाळीस दिवसांच्या काळात ते स्वतः त्यांना प्रकट झाले आणि परमेश्वराच्या राज्यासंबंधी बोलले. अशाच एका प्रसंगी, ते त्यांच्याबरोबर भोजन करीत असताना, त्यांनी आज्ञा केली की: “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर माझ्या पित्याने अभिवचन दिलेली देणगी ज्याबद्दल तुम्ही मला बोलताना ऐकले होते, त्याची वाट पाहा. कारण योहान पाण्याने बाप्तिस्मा करीत होता, परंतु थोड्या दिवसातच तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने केला जाईल.” नंतर पुन्हा एकदा ते त्यांच्याभोवती गोळा झाले आणि त्यांनी विचारले, “हे प्रभू, यावेळी आपण इस्राएलच्या राज्याची पुनर्स्थापना करणार आहात काय?” ते त्यांना म्हणाले, “पित्याने वेळ व तारीख आपल्या अधिकाराने निश्चित केली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही. परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेममध्ये आणि सर्व यहूदीयांत आणि शोमरोनात आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत माझे साक्षीदार व्हाल.”

प्रेषितांची कृत्ये 1:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

थियफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला, त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास व शिकवण्यास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पाहा; कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा; पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल.” मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, “प्रभूजी, ह्याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?” तो त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”

प्रेषितांची कृत्ये 1:1-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

प्रिय थियफिल, येशूने कार्य करायला आरंभ केल्यापासून त्याला स्वर्गात घेतले गेले, तोपर्यंत त्याने जे जे केले व शिकविले त्या सर्वांविषयी मी माझ्या पहिल्या पुस्तकात लिहिले. स्वर्गात घेतला जाण्यापूर्वी ज्यांना त्याने प्रेषित म्हणून निवडले होते, त्यांना त्याने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आदेश दिला. मरण सोसल्यानंतरही त्याने चाळीस दिवस त्यांना दर्शन देऊन अनेक ठोस पुराव्यांनिशी आपण जिवंत आहोत, हे दाखवले. त्यांनी त्याला पाहिले व त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयी सांगितले. ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आदेश दिला, “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने दिलेल्या ज्या वचनाविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे, त्याची वाट पाहा. योहानने पाण्याने बाप्तिस्मा दिला, पण तुम्हाला थोड्या दिवसांत पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देण्यात येईल.” प्रेषित येशूबरोबर एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, “प्रभो, तुम्ही इस्राएलचे राज्य पुन्हा स्थापन करणार त्याची वेळ हीच आहे का?” तो त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत, ते तुम्हांला जाणून घेता येणार नाही. परंतु तुमच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झाल्यावर तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेममध्ये, सर्व यहुदियात, शोमरोनात व जगभर तुम्ही माझे साक्षीदार व्हाल.”