YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 1

1
विषयप्रवेश
1थियफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला,
2त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास व शिकवण्यास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला.
3मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.
4तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पाहा;
5कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा; पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल.”
येशूचे स्वर्गारोहण
6मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, “प्रभूजी, ह्याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?”
7तो त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही.
8परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”
9असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला; आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले.
10तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले.
11ते म्हणाले, “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले, तसाच येईल.”
बाराव्या प्रेषिताची नेमणूक
12मग यरुशलेमेजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरुशलेमेस परत आले.
13आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले; तेथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते.
14हे सर्व जण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना व विनंती करण्यात तत्पर असत.
15त्या दिवसांत पेत्र बंधुवर्गामध्ये (सुमारे एकशेवीस माणसांच्या जमावामध्ये) उभा राहून म्हणाला,
16“बंधुजनहो, येशूला धरून नेणार्‍यांना वाट दाखवणार्‍या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दाविदाच्या मुखावाटे जे भविष्य वर्तवले ते पूर्ण होण्याचे अगत्य होते.
17त्याची आपल्यामध्ये गणना होती आणि त्याला ह्या सेवेचा वाटा मिळाला होता.
18(त्याने आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले; तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली.
19हे यरुशलेमेत राहणार्‍या सर्वांना कळले; म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत, असे नाव पडले आहे.)
20स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे,
‘त्याचे घर उजाड पडो,
व त्यात कोणीही न राहो;’
आणि ‘त्याचा हुद्दा दुसरा घेवो.’
21म्हणून योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत,
22म्हणजे तो आपल्यामध्ये येत-जात असे त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.”
23तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते तो बर्सब्बा म्हटलेला योसेफ व मत्थिया, ह्या दोघांना त्यांनी पुढे आणले.
24मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वांची हृदये जाणणार्‍या प्रभू,
25हे सेवकपद व प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाचे पद ज्याला मिळावे असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव.”
26मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन

प्रेषितांची कृत्ये 1 साठी चलचित्र