3 योहान 1:1-14
3 योहान 1:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रिय गायस ह्याला, तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील2 ह्याच्याकडून : प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टींत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो. कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, त्यावरून मला अत्यानंद झाला. माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसर्या कशानेही होत नाही. प्रिय बंधो, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस; त्यांनी मंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली; देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटे लावशील तर बरे करशील. कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काहीएक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहेत. म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ. मी मंडळीला थोडेसे लिहिले; परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करत नाही. ह्यामुळे मी आलो तर तो जी कृत्ये करतो त्यांची आठवण देईन; तो आमच्याविरुद्ध द्वेषबुद्धीने बाष्कळ बडबड करतो; तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही; आणि तो बंधुजनांचा स्वीकार स्वत:ही करत नाही, आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो मना करतो व मंडळीबाहेर घालवून देतो. प्रिय बंधो, वाइटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणार्याने देवाला पाहिलेले नाही. देमेत्रियाविषयी सर्वांनी व स्वत: सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे; आम्हीही साक्ष देतो; आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला ठाऊक आहे. मला तुला पुष्कळ लिहायचे होते, पण ते शाईने व लेखणीने लिहिण्याची माझी इच्छा नाही; तर मी तुला लवकर भेटेन, अशी मला आशा आहे, तेव्हा आपण समक्ष बोलू.
3 योहान 1:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रिय गायस ह्यास, तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील ह्याजकडून. प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो. कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषययी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, त्यावरून मला अत्यानंद झाला. माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही. प्रिय बंधू, अनोळखी बंधुजनांसाठी जे काही तू करतोस ते विश्वासूपणाने करतोस. त्यांनी तू दाखविलेल्या प्रीतीविषयी मंडळीसमोर साक्ष दिली, देवाला आवडेल त्या रीतीने तू त्यांना वाटेस लावशील तर बरे करशील. कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काहीएक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहेत. म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामधे त्यांचे सहकारी होऊ. मी मंडळीला काही लिहिले, पण दियत्रेफस ज्याला त्यांचा पुढारी व्हायचे आहे व तो आमचा स्वीकार करीत नाही. या कारणामुळे जेव्हा मी येतो तेव्हा तो जो करीत आहे ते दाखवून देईन. तो वाईट शब्दांनी खोटेपणाने माझ्याविरुद्ध बोलत आहे व एवढ्यावरच तो समाधान मानीत नाही, तर त्यामध्ये भर म्हणून बंधूंचा तो स्वीकार करत नाहीच उलट मंडळीतील जे लोक त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांना अडथळा करतो आणि त्यांना मंडळीबाहेर घालवितो! माझ्या प्रिय मित्रा, जे चांगले आहे त्याचे अनुकरण कर. वाईटाचे करू नको. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही. प्रत्येकजण देमेत्रियाविषयी चांगली साक्ष देतात व स्वतः खरेपणानेही चांगली साक्ष दिली आहे. आम्हीदेखील त्याच्याविषयी तसेच म्हणतो आणि तुम्हास माहीत आहे की, आमची साक्ष खरी आहे. मला तुला पुष्कळ गोष्टी लिहावयाच्या आहेत पण मला शाई व लेखणीने तुला लिहावे असे वाटत नाही. त्याऐवजी, तुला लवकर भेटण्याची मला आशा आहे. मग आपल्याला समोरासमोर बोलता येईल.
3 योहान 1:1-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मंडळीचा वडील, याच्याकडून, माझा मित्र गायस याला, ज्याच्यावर मी खरेपणाने प्रीती करतो. प्रिय मित्रा, मी प्रार्थना करतो की, तुला चांगले आरोग्य लाभो आणि तुझ्याबरोबर सर्वकाही चांगले होत जावो, जशी तुझ्या आत्म्याचीसुद्धा उन्नती होत आहे. जेव्हा काही विश्वासणार्यांनी येऊन सत्यासाठी असलेल्या तुमच्या विश्वासूपणाबद्दल साक्ष दिली आणि सांगितले की तुम्ही सातत्याने विश्वासात कशाप्रकारे जगत आहात, तेव्हा मला मोठा आनंद झाला. माझी मुले सत्याने चालतात, हे ऐकल्याने मला जेवढा आनंद होतो, तेवढा आनंद दुसर्या कशानेही होत नाही. प्रिय मित्रा, जे काही तू भावांसाठी आणि बहिणींसाठी करीत आहेस त्यामध्ये तू विश्वासू आहेस जरी ते तुला अनोळखी आहेत. त्यांनी मंडळीला तू दाखविलेल्या प्रीतिविषयी साक्ष दिली आहे. कृपा करून त्यांना अशाप्रकारे निरोप देऊन पाठव की ज्यामुळे परमेश्वराचे गौरव होते. कारण ते प्रभुसाठी प्रवास करीत आहेत आणि जरी ते गैरयहूदी लोकांना सुवार्ता सांगतात, तरी त्यांच्याकडून ते अन्न, वस्त्रे, निवारा किंवा पैसा घेत नाहीत. आपण अशा लोकांचे आदरातिथ्य केले पाहिजे, म्हणजे सत्यासाठी आपण एकत्र कार्य करू शकू. मी मंडळीला एक पत्र लिहिले, परंतु दियत्रेफस, ज्याला पुढे राहण्यास आवडते, तो आमचे स्वागत करणार नाही. म्हणून जेव्हा मी येतो, तेव्हा तो आमच्याविषयी दुर्भावनायुक्त बातम्या पसरवित आहे याकडे मी लक्ष देईन. दुसर्या विश्वासणार्यांचे स्वागत तो स्वतः तर करीत नाहीच, पण दुसर्यांनीही ते करू नये म्हणून तो सांगत असतो आणि जे ते करतात, त्यांना तो मंडळीतून घालवून देण्याचा प्रयत्न करतो. प्रिय मित्रा, जे वाईट आहे त्याचे अनुकरण करू नको तर चांगल्याचे कर. जो कोणी चांगले करतो तो परमेश्वरापासून आहे. जो कोणी जे काही वाईट आहे ते करतो त्याने परमेश्वराला पाहिलेले नाही. देमेत्रियाबद्दल प्रत्येकजण चांगले बोलतात आणि स्वतः सत्यसुद्धा त्याच्याविषयी साक्ष देते. आम्हीसुद्धा त्याच्याविषयी चांगलेच बोलतो, आणि तुम्हाला माहितच आहे की, आमची साक्ष खरी आहे. तुम्हाला लिहिण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ काही आहे, परंतु ते लेखनी आणि शाईने लिहून कळवावे अशी माझी इच्छा नाही. तुमची भेट लवकरच होईल, अशी मला आशा आहे, आणि तेव्हा आपण समोरासमोर बोलू.
3 योहान 1:1-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रिय गायस, तुझ्यावर खरी प्रीती करणारा, वडीलजनांपैकी एक तुला हे पत्र लिहीत आहे. प्रिय मित्रा, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, तसे सर्व बाबतीत तुझे चांगले चालावे व तुला आरोग्य लाभावे, अशी मी प्रार्थना करतो. तू नेहमी सत्याने चालतोस म्हणून तू सत्याशी निष्ठावंत आहेस, अशी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, तेव्हा मला अत्यानंद झाला. माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत नाही. प्रिय मित्रा, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस. त्यांनी ख्रिस्तमंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी येथे साक्ष दिली आहे. देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना पुढची वाटचाल करण्यास साहाय्य कर. कारण ते यहुदीतर लोकांपासून काहीच न घेता ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी बाहेर पडले आहेत. म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यासाठी करीत असलेल्या त्यांच्या सेवाकार्यात त्यांचे सहकारी होऊ. मी ख्रिस्तमंडळीला छोटेसे पत्र लिहिले परंतु ख्रिस्तमंडळीमध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा मी जे काही सांगतो त्याकडे लक्ष देत नाही. ह्यामुळे जर मी आलो तर तो जी कृत्ये करतो, त्याकडे लक्ष वेधीन. तो आम्हांला त्रासदायक होतील अशा मूर्खपणाच्या गोष्टी सांगतो. तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही. तो बंधुजनांचा स्वीकार स्वतःही करीत नाही आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो करू देत नाही व ख्रिस्तमंडळीतून बाहेर घालवून देतो. प्रिय मित्रा, वाइटाचे अनुकरण करू नकोस, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवाला आवडतो; वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही. देमेत्रियविषयी सर्वांनी व स्वतः सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे. आम्हीही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे, हे तुला ठाऊक आहे. मला पुष्कळ लिहावयाचे होते, पण ते शाईने व लेखणीने लिहिण्याची माझी इच्छा नाही. मी तुला लवकर भेटेन, अशी मला आशा आहे. तेव्हा आपण समक्ष बोलू.