3 योहान 1
1
1मंडळीचा वडील,
याच्याकडून, माझा मित्र गायस याला, ज्याच्यावर मी खरेपणाने प्रीती करतो.
2प्रिय मित्रा, मी प्रार्थना करतो की, तुला चांगले आरोग्य लाभो आणि तुझ्याबरोबर सर्वकाही चांगले होत जावो, जशी तुझ्या आत्म्याचीसुद्धा उन्नती होत आहे. 3जेव्हा काही विश्वासणार्यांनी येऊन सत्यासाठी असलेल्या तुमच्या विश्वासूपणाबद्दल साक्ष दिली आणि सांगितले की तुम्ही सातत्याने विश्वासात कशाप्रकारे जगत आहात, तेव्हा मला मोठा आनंद झाला. 4माझी मुले सत्याने चालतात, हे ऐकल्याने मला जेवढा आनंद होतो, तेवढा आनंद दुसर्या कशानेही होत नाही.
5प्रिय मित्रा, जे काही तू भावांसाठी आणि बहिणींसाठी करीत आहेस त्यामध्ये तू विश्वासू आहेस जरी ते तुला अनोळखी आहेत. 6त्यांनी मंडळीला तू दाखविलेल्या प्रीतिविषयी साक्ष दिली आहे. कृपा करून त्यांना अशाप्रकारे निरोप देऊन पाठव की ज्यामुळे परमेश्वराचे गौरव होते. 7कारण ते प्रभुसाठी प्रवास करीत आहेत आणि जरी ते गैरयहूदी लोकांना सुवार्ता सांगतात, तरी त्यांच्याकडून ते अन्न, वस्त्रे, निवारा किंवा पैसा घेत नाहीत. 8आपण अशा लोकांचे आदरातिथ्य केले पाहिजे, म्हणजे सत्यासाठी आपण एकत्र कार्य करू शकू.
9मी मंडळीला एक पत्र लिहिले, परंतु दियत्रेफस, ज्याला पुढे राहण्यास आवडते, तो आमचे स्वागत करणार नाही. 10म्हणून जेव्हा मी येतो, तेव्हा तो आमच्याविषयी दुर्भावनायुक्त बातम्या पसरवित आहे याकडे मी लक्ष देईन. दुसर्या विश्वासणार्यांचे स्वागत तो स्वतः तर करीत नाहीच, पण दुसर्यांनीही ते करू नये म्हणून तो सांगत असतो आणि जे ते करतात, त्यांना तो मंडळीतून घालवून देण्याचा प्रयत्न करतो.
11प्रिय मित्रा, जे वाईट आहे त्याचे अनुकरण करू नको तर चांगल्याचे कर. जो कोणी चांगले करतो तो परमेश्वरापासून आहे. जो कोणी जे काही वाईट आहे ते करतो त्याने परमेश्वराला पाहिलेले नाही. 12देमेत्रियाबद्दल प्रत्येकजण चांगले बोलतात आणि स्वतः सत्यसुद्धा त्याच्याविषयी साक्ष देते. आम्हीसुद्धा त्याच्याविषयी चांगलेच बोलतो, आणि तुम्हाला माहितच आहे की, आमची साक्ष खरी आहे.
13तुम्हाला लिहिण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ काही आहे, परंतु ते लेखनी आणि शाईने लिहून कळवावे अशी माझी इच्छा नाही. 14तुमची भेट लवकरच होईल, अशी मला आशा आहे, आणि तेव्हा आपण समोरासमोर बोलू.
15तुम्हाला शांती लाभो.
येथील मित्र तुम्हाला शुभेच्छा पाठवितात. कृपया तेथील मित्रांपैकी प्रत्येकाला त्यांच्या नावाने शुभेच्छा दे.
सध्या निवडलेले:
3 योहान 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.