२ शमुवेल 5:1-16
२ शमुवेल 5:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग इस्राएलाचे सर्व वंश हेब्रोनात दाविदाकडे येऊन म्हणाले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत, गतकाली शौल आमच्यावर राजा असता इस्राएल लोकांची नेआण करणारे पुढारी आपणच होता; आणि परमेश्वर आपणास म्हणाला होता की, माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.” ह्या प्रकारे इस्राएलांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला, आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलांवर राजा नेमले. दावीद राज्य करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता; त्याने चाळीस वर्षे राज्य केले. साडेसात वर्षे त्याने हेब्रोनात यहूदावर राज्य केले आणि तेहेतीस वर्षे यरुशलेमेत सर्व इस्राएल व यहूदा ह्यांच्यावर राज्य केले. राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुशलेम येथे त्या देशाचे रहिवासी यबूसी ह्यांच्यावर स्वारी केली. ते म्हणाले, “तुला येथे येणे साधायचे नाही; येथले आंधळेपांगळे तुला हाकून लावतील;” त्यांचा भावार्थ असा होता की दाविदाला येथे येणे साधायचे नाही. तरी दाविदाने सीयोन गड घेतला; हेच ते दावीदपूर. त्या दिवशी दावीद म्हणाला, “जो कोणी यबूशांना मारील त्याने नळाजवळून जाऊन दाविदाच्या जिवाचा द्वेष करणार्या त्या लंगड्या व आंधळ्या लोकांचा संहार करावा.” ह्यावर अशी म्हण पडली आहे की, ‘येथे आंधळे व लंगडे आहेत, घरात कोणाचा प्रवेश व्हायचा नाही.’ दावीद त्या गडावर राहू लागला; त्याला दावीदपूर हे नाव पडले. दाविदाने मिल्लो बुरुजापासून आतल्या बाजूस सभोवार तटबंदी केली. दाविदाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला, कारण सेनाधीश देव परमेश्वर त्याच्याबरोबर असे. सोरेचा राजा हीराम ह्याने दाविदाकडे जासूद पाठवले; तसेच त्याने गंधसरूचे लाकूड, सुतार व गवंडी पाठवले; त्यांनी दाविदासाठी राजमंदिर बांधले. परमेश्वराने इस्राएलावरील आपले राज्य स्थिर केले आहे आणि आपल्या इस्राएली प्रजेप्रीत्यर्थ आपल्या राज्याची उन्नती केली आहे हे दाविदाच्या ध्यानात आले. मग दावीद हेब्रोनाहून आला तेव्हा त्याने यरुशलेमेतून आणखी काही उपपत्नी व पत्नी केल्या; दाविदाला आणखी पुत्र व कन्या झाल्या. यरुशलेमेत त्याला पुत्र झाले त्यांची नावे ही : शम्मूवा, शोबाब, नाथान, शलमोन, इभार, अलीशवा, नेफग, याफीय, अलीशामा, एल्यादा व अलीफलेट.
२ शमुवेल 5:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएलच्या सर्व घराण्यांमधील लोक हेब्रोन येथे दावीदाजवळ एकत्र आले आणि त्यास म्हणाले, आपण इस्राएल लोक एकाच कुटुंबातले, एकाच हाडामांसाचेआहोत. शौल राज्यावर होता तेव्हा सुध्दा तुम्हीच युध्दात आमचे नेतृत्व करत होता. इस्राएलांना युध्दावरून तुम्हीच परत आणत होता. खुद्द परमेश्वर तुम्हास म्हणाला, “माझ्या इस्राएल प्रजेचा तू मेंढपाळ होशील. इस्राएलवर राज्य करशील.” मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला. दावीद राज्य करायला लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले. हेब्रोनमध्ये यहूदावर त्याने साडेसात वर्षे राज्य केले आणि तेहतीस वर्षे सर्व इस्राएल आणि यहूदावर यरूशलेमेमधून राज्य केले. राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरूशलेम येथे राहणाऱ्या यबूसी लोकांवर स्वारी केली तेव्हा ते यबूसी दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात प्रवेश करू शकणार नाहीस, आमच्या येथील आंधळे आणि पांगळे सुध्दा तुम्हास थोपवतील. दावीदाला आपल्या नगरात प्रवेश करणे जमणार नाही असे त्यांना वाटले म्हणून ते असे म्हणाले.” तरीपण दावीदाने सियोन किल्ला घेतला. दावीदपुर असे त्याचे नाव पडले. दावीद त्या दिवशी आपल्या लोकांस म्हणाला, “यबूसी लोकांचा पराभव करायचा असेल तर खंदकमार्गे जा आणि त्या आंधळ्या पांगळ्या दावीदाच्या शत्रूंना गाठा. यावरूनच, आंधळे पांगळे यांना या देवाच्या घरात येता यायचे नाही अशी म्हण पडली.” दावीदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव दावीदपूर असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता म्हणून दावीद अधिकाधिक सामर्थ्यवान होत गेला. सोरेचा राजा हिराम याने आपले दूत दावीदाकडे पाठवले गंधसंरूची झाडे, सुतार, गवंडी हे ही त्याने पाठवले. त्यांनी दावीदासाठी निवासस्थान उभारले. तेव्हा परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलाचा राजा केले आहे हे दावीदाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी, इस्राएल राष्ट्रासाठी, त्याच्या (दावीदाच्या) राज्याला महत्व दिले आहे, हे ही त्यास उमगले. हेब्रोनहून आता दावीद यरूशलेम येथे आला. तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि स्त्रिया होत्या. यरूशलेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला. त्याच्या या यरूशलेम येथे जन्मलेल्या पुत्रांची नावे अशी. शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन, इभार, अलीशवा, नेफेग, याफीय, अलीशामा, एल्यादा आणि अलीफलेट.