२ शमुवेल 2:1-7
२ शमुवेल 2:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यानंतर दाविदाने परमेश्वराला प्रश्न विचारला की, “मी यहूदाच्या एखाद्या नगरात जाऊ काय?” परमेश्वराने म्हटले, “जा.” दाविदाने विचारले, “कोणीकडे जाऊ?” त्याने म्हटले, “हेब्रोनास जा.” मग दावीद इज्रेलीण अहीनवाम आणि नाबालाची स्त्री कर्मेलीण अबीगईल ह्या आपल्या दोन्ही स्त्रियांसह तेथे गेला. तसेच दाविदाबरोबर जे पुरुष होते त्या सर्वांना आपापल्या कुटुंबांसह त्याने बरोबर नेले, व ते हेब्रोनाच्या गावात जाऊन राहिले. यहूदी लोकांनी तेथे जाऊन दाविदाला अभिषेक करून यहूदाच्या वंशाचा राजा नेमले. दाविदाला त्यांनी सांगितले की, “शौलाला ज्यांनी मूठमाती दिली ते याबेश-गिलादाचे लोक होते.” तेव्हा दाविदाने याबेश-गिलादच्या लोकांकडे जासूद पाठवून त्यांना सांगितले की, “तुम्ही आपला स्वामी शौल ह्याला मूठमाती दिली ही तुम्ही त्याच्यावर दया केली, ह्याबद्दल परमेश्वर तुमचे कल्याण करो. आता परमेश्वर तुमच्याशी दयेने व सत्यतेने वर्तो; तुम्ही हे कृत्य केले आहे ह्या तुमच्या चांगुलपणाचा मोबदला मीही तुम्हांला देईन. हिंमत धरा, शूर व्हा; तुमचा स्वामी शौल मृत्यू पावला आहे आणि यहूदाच्या घराण्याने मला अभिषेक करून आपल्यावर राजा नेमले आहे.” दावीद शौलाच्या वंशजांबरोबर लढतो
२ शमुवेल 2:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी यहूदातील एखाद्या नगरात जाऊ का?” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हो खुशाल जा,” दावीदाने विचारले, कुठे जाऊ? देवाने सांगितले, “हेब्रोनला जा.” तेव्हा दावीद आपल्या दोन्ही पत्नींसह हेब्रोनला गेला. इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन स्त्रिया. दावीदाने आपल्याबरोबरच्या लोकांसही त्यांच्या त्यांच्या परिवारासकट सोबत घेतले. हेब्रोन येथे आणि आसपासच्या नगरांमध्ये या सर्वांनी वस्ती केली. यहूदा येथील लोक मग हेब्रोनला आले आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करून यहूदाचा राजा म्हणून घोषित केले. ते मग त्यास म्हणाले, “याबेश गिलाद देशाच्या लोकांनी शौलाला पुरले.” तेव्हा दावीदाने याबेश गिलादाच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविधी करून तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो. आता परमेश्वर तुमच्याशी प्रामाणिक राहील, तुमच्यावर प्रेमाची पाखर घालील. मीही तुमच्याशी दयाळूपणाने वागेन. कारण तुम्ही हे काम केलेले आहे. आता खंबीर राहा आणि धैर्याने वागा. आपला स्वामी शौल मरण पावला असला तरी यहूदा वंशातील लोकांनी माझा राज्याभिषेक केला आहे.”
२ शमुवेल 2:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या दरम्यान, दावीदाने याहवेहला विचारले, “यहूदीयाच्या एखाद्या गावात मी जाऊ काय?” तेव्हा याहवेह म्हणाले, “जा.” दावीदाने विचारले, “मी कुठे जावे?” याहवेहने उत्तर दिले, “हेब्रोनास जा.” तेव्हा दावीद त्याच्या दोन पत्नी म्हणजे येज्रीली अहीनोअम आणि कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल यांच्याबरोबर तिथे गेला. दावीद त्याच्या बरोबरच्या प्रत्येक माणसांना त्यांच्या कुटुंबासह घेऊन गेला आणि त्यांनी हेब्रोन व तेथील गावांमध्ये वस्ती केली. तेव्हा यहूदीयातील माणसे हेब्रोनास आली व तिथे त्यांनी दावीदाचा यहूदाहच्या गोत्राचा राजा म्हणून अभिषेक केला. जेव्हा दावीदाला सांगण्यात आले की, ज्या लोकांनी शौलाला पुरले ते याबेश-गिलआदचे लोक होते, तेव्हा दावीदाने याबेश-गिलआदवासियांकडे दूत पाठवून म्हटले, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो, कारण तुम्ही आपला धनी शौल यांना पुरून त्यांच्याप्रित्यर्थ दया दाखविली आहे. तर आता याहवेह आपली दया व विश्वासूपणा तुम्हाला प्रगट करो आणि तुम्ही हे केले आहे म्हणून मी सुद्धा अशीच कृपा तुम्हावर करेन. तर आता हिंमत ठेवा आणि धैर्य धरा, कारण शौल तुमचा धनी मरण पावला आहे आणि यहूदीयाच्या लोकांनी त्यांचा राजा म्हणून माझा अभिषेक केला आहे.”