2 शमुवेल 2
2
दावीद यहूदीयाचा अभिषिक्त राजा
1त्या दरम्यान, दावीदाने याहवेहला विचारले, “यहूदीयाच्या एखाद्या गावात मी जाऊ काय?”
तेव्हा याहवेह म्हणाले, “जा.”
दावीदाने विचारले, “मी कुठे जावे?”
याहवेहने उत्तर दिले, “हेब्रोनास जा.”
2तेव्हा दावीद त्याच्या दोन पत्नी म्हणजे येज्रीली अहीनोअम आणि कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल यांच्याबरोबर तिथे गेला. 3दावीद त्याच्या बरोबरच्या प्रत्येक माणसांना त्यांच्या कुटुंबासह घेऊन गेला आणि त्यांनी हेब्रोन व तेथील गावांमध्ये वस्ती केली. 4तेव्हा यहूदीयातील माणसे हेब्रोनास आली व तिथे त्यांनी दावीदाचा यहूदाहच्या गोत्राचा राजा म्हणून अभिषेक केला.
जेव्हा दावीदाला सांगण्यात आले की, ज्या लोकांनी शौलाला पुरले ते याबेश-गिलआदचे लोक होते, 5तेव्हा दावीदाने याबेश-गिलआदवासियांकडे दूत पाठवून म्हटले, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो, कारण तुम्ही आपला धनी शौल यांना पुरून त्यांच्याप्रित्यर्थ दया दाखविली आहे. 6तर आता याहवेह आपली दया व विश्वासूपणा तुम्हाला प्रगट करो आणि तुम्ही हे केले आहे म्हणून मी सुद्धा अशीच कृपा तुम्हावर करेन. 7तर आता हिंमत ठेवा आणि धैर्य धरा, कारण शौल तुमचा धनी मरण पावला आहे आणि यहूदीयाच्या लोकांनी त्यांचा राजा म्हणून माझा अभिषेक केला आहे.”
दावीदाचे घराणे आणि शौलाचे घराणे यांच्यामध्ये लढाई
8त्या दरम्यान, शौलाचा सेनापती नेरचा पुत्र अबनेरने शौलाचा पुत्र इश-बोशेथला महनाईम येथे आणले. 9त्याने गिलआद, अशुरी, येज्रील आणि एफ्राईम, बिन्यामीन व सर्व इस्राएलवर त्याला राजा नेमले.
10शौलाचा पुत्र इश-बोशेथ इस्राएल देशाचा राजा झाला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता आणि त्याने दोन वर्षे राज्य केले. मात्र यहूदाहचे गोत्र दावीदाशी एकनिष्ठ राहिले. 11हेब्रोनात यहूदीयावर दावीदाने राज्य केले त्याचा कालावधी सात वर्षे व सहा महिने होता.
12नेरचा पुत्र अबनेर शौलाचा पुत्र इश-बोशेथ याच्या माणसांबरोबर एकत्र येऊन महनाईम सोडून गिबोनकडे गेले. 13जेरुइयाहचा पुत्र योआब आणि दावीदाची माणसे बाहेर पडली आणि गिबोनाच्या तळ्याकडे भेटली. एक गट तळ्याच्या एका बाजूला खाली बसला आणि दुसरा गट तळ्याच्या दुसर्या बाजूला बसला.
14तेव्हा अबनेर योआबाला म्हणाला, “काही तरुण पुरुषांनी उठून आमच्यापुढे समोरासमोर लढाई होऊ करावी.”
“ठीक आहे, त्यांनी तसे करावे,” योआब म्हणाला.
15म्हणून ते उभे राहिले आणि त्यांची मोजणी करण्यात आली; बिन्यामीन आणि शौलाचा पुत्र इश-बोशेथ यांच्यातील बारा माणसे आणि बारा माणसे दावीदासाठी पुढे आले. 16नंतर प्रत्येकाने त्याच्या विरोधकाचे डोके पकडले आणि आपला सुरा विरोधकाच्या कुशीत खुपसला आणि ते मिळून पडले. म्हणून गिबोनातील त्या जागेला हेलकाथ-हज्जूरीम#2:16 हेलकाथ-हज्जूरीम अर्थात् धारदार सुर्यांचे मैदान हे नाव पडले.
17त्या दिवशी तीव्र युद्ध झाले आणि अबनेर व इस्राएली सैन्य यांचा दावीदाच्या माणसांनी पराभव केला.
18जेरुइयाहचे हे तीन पुत्रः योआब, अबीशाई आणि असाहेल तिथे होते. असाहेल हरिणीसारखा चपळ पायाचा होता. 19असाहेलने अबनेरचा पाठलाग केला, त्याचा पाठलाग करताना तो उजवीकडे किंवा डावीकडे वळला नाही. 20अबनेरने मागे वळून पाहिले आणि विचारले, “तू असाहेल आहेस काय?”
“होय, मी आहे,” त्याने उत्तर दिले.
21तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “उजवीकडे किंवा डावीकडे वळ; एखाद्या तरुण पुरुषाला पकड आणि त्याची शस्त्रे काढून घे.” परंतु असाहेल त्याचा पाठलाग करण्याचे थांबवेना.
22अबनेरने पुन्हा असाहेलला चेतावणी दिली, “माझा पाठलाग करण्याचे थांबव! मी तुला का मारून टाकावे? तुझा भाऊ योआब याला मी आपले तोंड कसे दाखवू?”
23परंतु असाहेलने पाठलाग करण्याचे थांबविण्यास नाकारले; तेव्हा अबनेरने त्याच्या भाल्याचा दांडा असाहेलच्या पोटात खुपसला आणि तो भाला त्याच्या पोटातून जाऊन पाठीतून बाहेर आला. तो पडला आणि तिथेच मरण पावला. आणि प्रत्येकजण जे तिथून येत होते, ते असाहेल पडून मेला होता, तिथे थांबले.
24परंतु आता योआब आणि अबीशाई यांनी अबनेरचा पाठलाग केला, ते गिहाजवळच्या गिबोनच्या वाळवंटाकडे जाणार्या मार्गावर असलेल्या अम्माहच्या डोंगरावर येऊन पोहोचले तेव्हा सूर्यास्त होत होता. 25तेव्हा बिन्यामीनचे लोक अबनेरच्या मागे गेले. त्यांनी आपला एक गट तयार केला आणि एका टेकडीच्या शिखरावर उभे राहिले.
26अबनेरने योआबाला हाक मारत म्हटले, “तलवारीने सर्वकाळ नाश करावा काय? तुला समजत नाही काय की याचा शेवट कटुत्वात होणार? आपल्या सोबतीच्या इस्राएली लोकांचा पाठलाग करण्याचे थांबविण्यास तुझ्या लोकांस तू आज्ञा कधी देणार?”
27योआबने उत्तर दिले, “जिवंत परमेश्वराची शपथ, तू जर बोलला नसतास, तर माणसे सकाळपर्यंत त्यांचा पाठलाग करीत राहिली असती.”
28तेव्हा योआबने कर्णा वाजविला आणि सर्व सैन्य थांबले; त्यांनी पुढे इस्राएलचा पाठलाग केला नाही किंवा ते त्यांच्याशी पुन्हा लढलेही नाही.
29अबनेर आणि त्याची माणसे रात्रभर अराबाहमधून चालत गेली. त्यांनी यार्देन नदी पार केली, सकाळपर्यंत तसेच पुढे चालत राहिले आणि महनाईम येथे येऊन पोहोचले.
30नंतर योआबने अबनेरचा पाठलाग करण्याचे थांबविले आणि संपूर्ण सैन्याला एकत्र जमविले. असाहेल शिवाय दावीदाची एकोणवीस माणसे गहाळ होती. 31परंतु दावीदाच्या माणसांनी अबनेर बरोबर असलेल्या तीनशे साठ बिन्यामीन लोकांना मारले होते. 32त्यांनी असाहेलला घेतले आणि बेथलेहेम येथे त्याच्या वडिलांच्या कबरेत पुरले. नंतर योआब आणि त्याच्या माणसांनी रात्रभर प्रवास केला आणि पहाटेस हेब्रोनास येऊन पोहोचले.
सध्या निवडलेले:
2 शमुवेल 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.