२ शमुवेल 16:5-13
२ शमुवेल 16:5-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पुढे दावीद बहूरीमला आला. तेव्हा शौलाच्या घराण्यातील एकजण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी होता. तो दावीदाला शिव्याशाप देत चालला होता. त्याने दावीदावर आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक करायला सुरवात केली. पण इतर लोकांनी आणि सैनिकांनी चहूकडून दावीदाला वेढा घातला. शिमी दाविदला शाप देतच होता, चालता हो इथून, तू दुष्ट आहेस तू खूनी आहेस! देव तुला शासन करीत आहे. कारण शौलाच्या घरातील लोकांस तू मारलेस. त्याचे राज्य बळकावलेस. पण ते राज्य परमेश्वराने तुझा मुलगा अबशालोम याच्या हवाली केले आहे. तुझे आता हाल होत आहेत कारण तू खुनी आहेस. सरुवेचा मुलगा अबीशय राजाला म्हणाला, “या मरण पावलेल्या कुत्र्यासारख्या मनुष्याने तुम्हास शिव्याशाप द्यावेत म्हणजे काय? स्वामी, मला त्याचा शिरच्छेद करू द्या. पण राजा त्यास म्हणाला, सरुवेच्या पुत्रांनो मी काय करू? दाविदाला शिव्याशाप दे असे परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल. मग त्यास असे कोण म्हणू शकेल की, तू राजाला का शाप देत आहेस?” अबीशयला आणि इतर सर्व सेवकांना राजा पुढे म्हणाला, माझा पोटचा मुलगा अबशालोमच माझ्या जिवावर उठला आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे तर त्यामध्ये नवल काय. त्यास हवे ते म्हणू द्या, कारण परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल. माझ्याबाबतीत घडणारे हे अन्याय कदाचित् परमेश्वर पाहील, आणि शिमीच्या या शिव्याशापाच्या बदल्यात उद्या तो माझे भलेच करील. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक मग आपल्या वाटेने तसेच पुढे गेले. शिमी त्यांच्या मागोमाग जात राहिला. डोंगराच्या कडेने तो दुसऱ्या बाजूने जात होता. तो दाविदाबद्दल खूप वाईट गोष्टी बोलत होता. दावीदावर तो दगड आणि मातीही फेकत होता.
२ शमुवेल 16:5-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दावीद राजा बहूरीमजवळ पोहोचताच, एक मनुष्य बाहेर आला, जो शौलाच्या घराण्यातील एका कुळातील होता. त्याचे नाव शिमी होते, तो गेराचा पुत्र होता, तो बाहेर येताच शाप देऊ लागला. त्याने दावीद व राजाच्या सर्व अधिकार्यांवर धोंडमार केली, सर्व सैन्यदल व विशेष अंगरक्षक दावीदाच्या उजव्या व डाव्या बाजूंना होते. शाप देत शिमी म्हणाला, “निघून जा, अरे तू खुनी, हलकट मनुष्या, चालता हो! ज्याच्या जागी तू राज्य केलेस त्या शौलाच्या घराण्याचा जो रक्तपात तू केला त्याचा मोबदला याहवेह तुला देत आहेत. आता याहवेहने ते राज्य तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती दिले आहे. तू खुनी आहेस म्हणून तू नाशास येऊन ठेपला आहेस!” तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीला का शाप द्यावा? मला त्याच्याकडे जाऊन त्याचा शिरच्छेद करू द्या.” परंतु राजा म्हणाला, “अहो जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला याचे काय? याहवेहनेच जर त्याला सांगितले असले, ‘दावीदाला शाप दे,’ तर ‘तू असे का करतोस,’ असे त्याला कोणी विचारावे?” तेव्हा दावीद अबीशाई व त्याच्या सर्व अधिकार्यांना म्हणाला, “माझा पुत्र, माझे स्वतःचे रक्त-मांस मला मारून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, तर हा बिन्यामीन किती अधिक करेल! त्याला जाऊ द्या; व शाप देऊ द्या, कारण याहवेहने त्याला तसे करण्यास सांगितले आहे. मला होत असलेल्या त्रासाकडे कदाचित याहवेह पाहतील आणि या शापाऐवजी मी गमावलेला त्यांच्या कराराचा आशीर्वाद मला मिळवून देतील.” दावीद आणि त्याची माणसे त्यांच्या वाटेने पुढे जात राहिले आणि शिमी त्यांच्या समोरच्या टेकडीकडून, दावीदाला शाप देत, त्याच्यावर दगडफेक करीत व त्याच्यावर धूळ उधळत चालत होता.
२ शमुवेल 16:5-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दावीद राजा बहूरीम येथे पोहचला तेव्हा पाहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला; त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते; तो शिव्याशाप देत आला. तो दाविदावर व सर्व राजसेवकांवर दगड फेकू लागला; सर्व लोक आणि लढवय्ये त्याच्या उजव्याडाव्या बाजूंना होते. शिमी शिव्याशाप देऊन म्हणाला, “अरे खुनी माणसा, अधमा, नीघ, चालता हो; ज्या शौलाच्या जागी तू राज्य केलेस त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे पारिपत्य केले आहे, आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम ह्याच्या हाती राज्य दिले आहे; तू रक्तपात करणारा माणूस आहेस, ह्यास्तव तुझ्या दुष्टतेतच तू गुरफटला आहेस,” सरूवेचा पुत्र अबीशय राजाला म्हणाला, “ह्या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीराजांना शाप द्यावा काय? मला त्याच्यावर चालून जाण्याचा हुकूम द्या, मी त्याचे डोके उडवतो.” राजा म्हणाला, “सरूवेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय करायचे आहे? तो शिव्याशाप देत आहे; दाविदाला शिव्याशाप दे असे खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास तू हे का करतोस असे त्याला कोण म्हणेल?” मग दाविदाने अबीशय व आपले सर्व सेवक ह्यांना सांगितले, “पाहा, प्रत्यक्ष माझा पुत्र, माझ्या पोटचा गोळा, माझा जीव घ्यायला पाहत आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे ह्यात काय नवल! त्याच्या वाटेला जाऊ नका, त्याला शिव्याशाप देऊ द्या! कारण परमेश्वरानेच त्याला सांगितले असेल. मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहील आणि ह्या शिव्याशापाऐवजी मला चांगला मोबदला देईल.” दावीद आपल्या लोकांसह पुढे मार्गस्थ झाला आणि शिमी समोरच्या पहाडाच्या कडेने त्याला शिव्याशाप देत, दगड मारत व त्याच्यावर धूळ उधळत चालला.