YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 12:13-19

२ शमुवेल 12:13-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग दावीद नाथानला म्हणाला, माझ्याहातून परमेश्वराचा मोठा अपराध घडला आहे. नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, परमेश्वराने हा तुझा अपराध दूर केला आहे. तू मरणार नाहीस. पण परमेश्वराच्या शत्रूंना तू त्याचा उपहास करायला मोठे कारण दिलेस, म्हणून हा तुझा पुत्र मरेल. यानंतर नाथान घरी परतला. उरीयाची पत्नी बथशेबा आणि दावीद यांना झालेला मुलगा परमेश्वराच्या कोपामुळे खूप आजारी पडला. दावीदाने बाळासाठी देवाची प्रार्थना केली. दावीदाने अन्नपाण्याचा त्याग केला. घरात जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. घरातील वडीलधाऱ्या मनुष्यांनी येऊन दावीदाला जमिनीवरून उठवायचा खूप प्रयत्न केला. पण काही केल्या दावीद तेथून हलेना. त्यांच्याबरोबर खायला प्यायलाही त्याने नकार दिला. सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मुलाच्या मृत्यूची बातमी दावीदाला द्यायला त्याचे नोकर कचरु लागले. ते म्हणाले, मुलगा जिवंत असतानाही आम्ही दावीदाशी बोलायला गेलो तरी तो ऐकत नसे, मग आता तर मूल मरण पावले असे आम्ही सांगितले तर तो आपल्या जिवाचे काही बरेवाईट करून घेईल. पण आपल्या नोकरांची कुजबूज दावीदाने ऐकली त्यावरून मूल गेल्याचे तो मनोमन उमजला. त्याने नोकरांना विचारले, मूल गेले का? नोकरांनी होय म्हणून उत्तर दिले.

सामायिक करा
२ शमुवेल 12 वाचा

२ शमुवेल 12:13-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

दावीद नाथानाला म्हणाला, “मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे,” नाथान दाविदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे; तू मरणार नाहीस. तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिले आहेस, ह्यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार.” मग नाथान आपल्या घरी गेला. उरीयाच्या स्त्रीला जो मुलगा दाविदापासून झाला त्याच्यावर परमेश्वराचा तडाका येऊन तो फार आजारी पडला; म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची काकळूत करू लागला. त्याने उपास केला व आत जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. त्याच्या घरची म्हातारी माणसे त्याच्याकडे येऊन त्याला जमिनीवरून उठवू लागली; तो उठेना व त्यांच्याबरोबर बसून भोजन करीना. सातव्या दिवशी ते मूल मेले; पण मूल मेले आहे हे दाविदाला सांगायला त्याच्या चाकरांना भय वाटले; ते म्हणाले, “पाहा, मूल जिवंत असताना आम्ही त्याला समजावले पण त्याने ऐकले नाही; तर मूल मरण पावले आहे असे त्याला कळवले तर तो स्वतःला अपाय करून घ्यायचा.” आपले चाकर आपसांत कुजबुजत आहेत हे पाहून आपले मूल मेले आहे असे दाविदाने ताडले; त्याने त्यांना विचारले, “मूल मेले काय?” ते म्हणाले, “मेले.”

सामायिक करा
२ शमुवेल 12 वाचा