YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 12

12
नाथान दाविदाला ताडन करतो
1मग परमेश्वराने नाथानाला दाविदाकडे पाठवले. तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “एका नगरात दोन माणसे राहत होती; त्यांतला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता.
2त्या श्रीमंत माणसाची मेंढरे व गुरे विपुल होती;
3पण त्या गरिबाजवळ एका लहानशा मेंढीखेरीज काहीच नव्हते. त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते; ती त्याच्याबरोबर व त्याच्या मुलाबाळांबरोबर लहानाची मोठी झाली; ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या प्याल्यातून पाणी पीत असे व त्याच्या उराशी निजत असे; ती त्याची मुलगीच बनली होती.
4एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला, तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेरडामेंढरांतून अथवा गाईबैलांतून एखादे न घेता त्या गरीब माणसाची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले.”
5हे ऐकून त्या माणसावर दाविदाचा कोप भडकला. तो नाथानाला म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या माणसाने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे;
6त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामाया वाटली नाही म्हणून त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे.”
7नाथान दाविदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस. इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले व तुला शौलाच्या हातातून सोडवले;
8मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या, इस्राएल व यहूदा ह्यांचे घराणे तुला दिले, आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे ते दिले असते.
9तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केलेस? उरीया हित्ती ह्याचा तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातलीस आणि उरीयाचा अम्मोन्यांच्या तलवारीने वध करवलास?
10तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरीया हित्ती ह्याची स्त्री आपल्या घरात घातली आहेस.
11परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुझ्याच घरातून तुझ्यावर अरिष्ट उभे करीन; तुझ्या स्त्रिया तुझ्यादेखत तुझ्या शेजार्‍याला देईन; तो ह्या सूर्यादेखत त्यांची अब्रू घेईल.
12तू ते काम गुप्तपणे केलेस, पण मी हे सर्व इस्राएलादेखत, ह्या सूर्यादेखत करीन.”
13दावीद नाथानाला म्हणाला, “मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे,” नाथान दाविदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे; तू मरणार नाहीस.
14तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिले आहेस, ह्यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार.”
15मग नाथान आपल्या घरी गेला. उरीयाच्या स्त्रीला जो मुलगा दाविदापासून झाला त्याच्यावर परमेश्वराचा तडाका येऊन तो फार आजारी पडला;
16म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची काकळूत करू लागला. त्याने उपास केला व आत जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला.
17त्याच्या घरची म्हातारी माणसे त्याच्याकडे येऊन त्याला जमिनीवरून उठवू लागली; तो उठेना व त्यांच्याबरोबर बसून भोजन करीना.
18सातव्या दिवशी ते मूल मेले; पण मूल मेले आहे हे दाविदाला सांगायला त्याच्या चाकरांना भय वाटले; ते म्हणाले, “पाहा, मूल जिवंत असताना आम्ही त्याला समजावले पण त्याने ऐकले नाही; तर मूल मरण पावले आहे असे त्याला कळवले तर तो स्वतःला अपाय करून घ्यायचा.”
19आपले चाकर आपसांत कुजबुजत आहेत हे पाहून आपले मूल मेले आहे असे दाविदाने ताडले; त्याने त्यांना विचारले, “मूल मेले काय?” ते म्हणाले, “मेले.”
20मग दावीद जमिनीवरून उठला; त्याने स्नान करून तैलाभ्यंग केला, आपला पोशाख बदलला आणि परमेश्वराच्या मंदिरात जाऊन दंडवत घालून आराधना केली; मग तो आपल्या मंदिरात आला, त्याने सांगितल्यावरून त्याच्या सेवकांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, ते त्याने सेवन केले.
21त्याच्या चाकरांनी त्याला विचारले, “आपण हे असे काय केले? मूल जिवंत होते तोवर आपण त्याच्यासाठी उपास व शोक केला, पण ते मरण पावताच आपण उठून भोजन केले?”
22त्याने उत्तर दिले, “मूल जिवंत होते तोवर मी उपास केला व रुदन केले. मला वाटले, न जाणो, कदाचित परमेश्वर माझ्यावर कृपा करील व मूल जिवंत राहील;
23पण आता ते मरण पावले तर मी आता का उपास करावा? माझ्याने थोडेच त्याला परत आणवेल? मी त्याच्याकडे जाईन, पण ते माझ्याकडे परत येणार नाही.”
24मग दाविदाने आपली स्त्री बथशेबा हिचे सांत्वन केले, तो तिच्यापाशी जाऊन निजला. त्यानंतर तिला पुत्र झाला, त्याने त्याचे नाव शलमोन ठेवले; परमेश्वराला तो प्रिय झाला.
25त्याने नाथान संदेष्टा ह्याच्या द्वारे सांगून पाठवल्यावर परमेश्वरासाठी त्याचे नाव यदीद्या (परमेश्वराला प्रिय) असे ठेवले.
दावीद राब्बा नगर घेतो
(१ इति. 20:1-3)
26नंतर यवाबाने अम्मोन्यांच्या राब्बा ह्या नगराशी लढून ते राजनगर हस्तगत केले.
27यवाबाने दाविदाकडे जासूद पाठवून त्याला कळवले की, “मी राब्बा नगराबरोबर लढलो व जलनगर हस्तगत केले आहे.
28तर आता अवशिष्ट लोक जमा करून, नगरापुढे छावणी देऊन ते हस्तगत करा; मी ते घ्यावे व माझे नाव व्हावे असे न होवो.”
29तेव्हा दावीद सर्व लोकांना जमा करून राब्बा नगराकडे गेला, व त्याने ते लढून घेतले.
30त्याने त्या लोकांच्या राजाच्या1 मस्तकावरून मुकुट काढला; त्याचे वजन सोन्याचा एक किक्कार2 असून तो रत्नखचित होता, तो दाविदाच्या मस्तकावर ठेवला. त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली.
31त्याने त्या नगराच्या रहिवाशांना बाहेर काढले व त्यांना करवती, लोखंडी दाताळी, लोखंडी कुर्‍हाडी ह्यांचे3 आणि विटांच्या भट्ट्यांचे काम करायला लावले; अम्मोन्यांच्या सर्व नगरांचेही त्याने असेच केले. मग दावीद सर्व लोकांसह यरुशलेमेला परत आला.

सध्या निवडलेले:

२ शमुवेल 12: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन