YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 9:1-37

२ राजे 9:1-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्यास म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ-गिलाद येथे जा. येथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्यास त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने. त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!” तेव्हा तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलाद येथे आला येथे पोचल्यावर त्यास सैन्यातील सरदार बसलेले आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुमच्यासाठी एक निरोप आहे.” येहू म्हणाला, “आम्ही सर्वच इथे आहोत. निरोप नक्की कोणासाठी आहे?” तेव्हा तो तरुण म्हणाला, “हे सरदारा, तुझ्याशीच; माझे काम आहे.” यावर येहू उठून घरात आला. त्या तरुण संदेष्ट्याने त्याच्या मस्तकावर तेलाचा अभिषेक केला. येहूला तो म्हणाला, इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “इस्राएलचा पुढचा राजा म्हणून मी तुला अभिषेक करत आहे.” तुमचा राजा अहाब याच्या घराण्याचा तू संहार करावास. अशा तऱ्हेने मी माझे सेवक, संदेष्टे, परमेश्वराचे सर्व सेवक यांच्या वधाचा सूड घेऊन ईजबेलला शासन करणार आहे. म्हणजे अहाबचे संपूर्ण घराणे नष्ट होईल. अहाबाच्या घराण्यात एकही मुलगा जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम. नबाटचा मुलगा यराबाम तसेच अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यासारखी अहाबाच्या घराण्याची मी गत करून टाकीन. “ईजबेलला इज्रेल भागात कुत्री खातील. तिचे दफन होणार नाही. एवढे बोलून हा तरुण संदेष्टा दार उघडून पळून गेला.” येहू पुन्हा राजाच्या सरदारांमध्ये आला. तेव्हा त्यांच्यातला एकजण म्हणाला, “येहू, सर्व कुशल आहे ना? तो वेडा तुझ्याकडे कशाला आला होता?” येहू त्यांना म्हणाला, “तो मनुष्य कोण आणि त्याचा संदेश तुम्हास माहित आहेच.” तेव्हा ते सर्व म्हणाले, “नाही, नाही खर काय झाले ते सांग. काय म्हणाला तो?” तेव्हा तो तरुण संदेष्टा काय म्हणाला ते येहूने सरदारांना सांगितले. येहू म्हणाला, “तो मला म्हणाला, ‘इस्राएलाचा राजा म्हणून परमेश्वराच्या सांगण्यावरुन मी तुला अभिषेक करत आहे.” हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली. निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याने योरामाविरुध्द कट रचला. यावेळी, अरामाचा राजा हजाएल याच्यापासून रामोथ-गिलादाचे संरक्षण करण्यासाठी योराम सर्व इस्राएलांसह झटत होता. येहू इज्रेल येथे जातो राजा योथामाने हजाएलशी झुंज घेतली होती. पण अरामी लोकांनी योरामाला जायबंदी केले होते तेव्हा जखमा भरुन येण्यासाठी तो इज्रेलला गेला होता. तेव्हा येहू त्या सगळ्या सरदारांना म्हणाला, “नवीन राजा म्हणून मला तुमची मान्यता असेल तर ही बातमी नगरातून इज्रेलमध्ये जाऊ देऊ नका.” योराम इज्रेलमध्ये आराम करत होता. येहू रथात बसून इज्रेलला गेला. यहूदाचा राजा अहज्या देखील तेव्हा योथामाला भेटावयाला इज्रेलला आला होता. इज्रेलमध्ये बुरूजावर एक पहारोकरी होता. त्याने येहूला मोठ्या जमावनिशी येताना पाहिले. तो म्हणाला, “मोठाच जमाव दिसतोय” योरामाने त्यास सांगितले, “कोणाला तरी घोड्यावरुन त्यांच्याकडे पाठव. ते शांतीने येत आहेत का ते त्या स्वाराला विचारायला सांग.” तेव्हा एक सेवक घोड्यावरुन येहूला सामोरा गेला. राजा योरामाच्या वतीने त्याने येहूला विचारले, “तुमचे येणे शांततेचे आहे ना?” येहू त्यास म्हणाला, “शांतीशी तुला कर्तव्य नाही. असा माझ्या मागेमाग ये.” पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “आपला तिकडे पाठवलेला मनुष्य अजून परत आलेला नाही.” तेव्हा योथामाने दुसऱ्या घोडेस्वाराला पाठवले, तो येहूकडे आला आणि राजा योरामाच्या वतीने सलोख्याचे अभिवादन केले. येहू म्हणाला, “तुला सलोख्याशी काय करायचे आहे? असा माझ्या मागोमाग ये?” पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा मनुष्यही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच ती पध्दत आहे. योथामाने मग स्वत:चा रथ तयार ठेवण्यास सांगितले.” तेव्हा सेवकाने योरामाचा रथ आणला. इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले. इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची यहूशी गाठ पडली. येहूला पाहून योरामाने त्यास विचारले, “येहू तू शांततेसाठीच आला आहेस ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार आणि चेटके चालू असेपर्यंत कसली आली आहे शांतता?” योरामाने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.” पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामाचा बरोबर दोन बाहूंच्यामध्ये वेध घेतला. बाण योरामाच्या हृदयातून आरपार गेला. योराम रथात मरुन पडला. येहूने आपल्या रथाचा सारथी बिदकर याला सांगितले, “योरामाचा मृतदेह उचल आणि तो इज्रेलचा नाबोथ ह्याच्या शेतात फेकून दे आपण दोघे, योरामाचा बाप अहाब याच्याबरोबर बसून चाललो होतो तेव्हा हे असे घडणार असे परमेश्वराने सांगितले होते, ते आठवते ना? परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले तेव्हा त्या शेतात मी अहाबाला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!” यहूदाचा राजा अहज्या याने ते पाहिले आणि तेथून पळ काढला. मळ्यातल्या एका घराच्या बाजूने तो गेला. येहूने त्याचा पाठलाग केला. येहू म्हणाला, “अहज्याचाही वध करा.” तेव्हा येहूच्या मनुष्यांनी अहज्याला इब्लाम जवळच्या गूरच्या रस्त्यावर जखमी केले. तेव्हा अहज्या मगिद्दोकडे पळाला पण तिथेच मरण पावला. अहज्याच्या चाकरांनी त्याचा मृतदेह रथातून यरूशलेम येथे आणला. त्याचे त्यांनी दावीद नगरात त्याच्या पूर्वजांशेजारी दफन केले. अहाबाचा पुत्र योरामाचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्षे चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता. येहू इज्रेलला आला ते ईजबेलने ऐकले. तिने चांगले प्रसाधन केले, केशभूषा केली आणि खिडकीत बसून बाहेर बघू लागली. येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, ते शांतीने येत आहेत काय? “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस?” येहूने वर खिडकीकडे पाहत म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!” तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले. येहू त्यांना म्हणाला, “त्या ईजबेलला खाली फेका.” तेव्हा त्या खोजांनी ईजबेलला खाली फेकून दिले. भिंतीवर आणि घोड्यांवर तिचे रक्त उडाले. घोडे तिच्यावरून चालून गेले. येहू घरात शिरला आणि त्याने फराळाच्या पदार्थांचा समाचार घेतला. मग तो म्हणाला, “आता त्या शापित स्त्रीला घ्या व तिचे दफन करा कारण ती राजकन्या होती.” लोक तिला पुरायला पुढे झाले पण त्यांना तिच्या देहाचा पत्ता लागला नाही. फक्त तिचे शिर, पाय आणि हाताचे तळवे सापडले. तेव्हा त्या लोकांनी येऊन येहूला हे सांगितले. येहू त्यांना म्हणाला, “आपला सेवक एलीया तिश्बी याच्या मार्फत परमेश्वराने हेच सांगितले होते. एलीया म्हणाला होता, ‘इज्रेलच्या परिसरात ईजबेलचा देह कुत्री खातील.’ शेणखतासारखा ईजबेलचा देह इज्रेलच्या भूमीवर पडेल. लोकांस तिचे प्रेत ओळखू येणार नाही.”

सामायिक करा
२ राजे 9 वाचा

२ राजे 9:1-37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

इकडे अलीशा संदेष्ट्याने एका तरुण संदेष्ट्याला संदेष्ट्यांच्या समुहातून बोलाविले आणि त्याला म्हटले, “तू आपली कंबर बांध, जैतून तेलाची कुपी बरोबर घे आणि रामोथ गिलआद येथे जा. जेव्हा तू तिथे पोहोचशील तेव्हा निमशी यहोशाफाटाचा पुत्र येहूचा शोध घे व त्याला त्याच्या मित्र मंडळीपासून दूर एका खाजगी खोलीत घेऊन जा, मग कुपी घे आणि तेल त्याच्या मस्तकांवर ओत आणि जाहीर कर, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा म्हणून अभिषेक करतो.’ नंतर दार उघड आणि पळ; उशीर करू नकोस!” मग तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलआद येथे गेला. जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की सेना अधिकारी सोबत बसलेले आहेत. तो म्हणाला, “सेनापती महोदय, माझ्याजवळ तुमच्यासाठी एक संदेश आहे.” येहूने विचारले, “आमच्यापैकी कोणासाठी?” त्याने उत्तर दिले, “सेनापती महोदय तुमच्यासाठी.” मग येहू उठला आणि तो आत घरात गेला. नंतर संदेष्ट्याने येहूच्या मस्तकांवर तेल ओतले आणि जाहीर केले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: ‘मी तुझा याहवेहची प्रजा इस्राएलाचा राजा म्हणून अभिषेक करतो. तुला आपला स्वामी अहाबाच्या घराण्याचा नाश करावयाचा आहे. ईजबेलने माझ्या संदेष्ट्यांना आणि याहवेहच्या इतर सेवकांना ठार मारलेल्यांचा सूड तुला उगवावयाचा आहे. कारण अहाबाच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल. मी अहाबाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुष इस्राएल राष्ट्रातून मिटवून टाकीन तो दास असो किंवा स्वतंत्र. नेबाटाचा पुत्र यरोबोअम आणि अहीयाहचा पुत्र बाशा यांच्या घराण्यासारखे मी अहाबाच्या घराण्याचे करेन. ईजबेलला येज्रीलच्या भूमीत कुत्री फाडून खातील आणि तिला कोणीही मूठमाती देणार नाही.’ ” मग त्या तरुणाने दार उघडले आणि पळाला. येहू आपल्या सोबतच्या अधिकार्‍यांकडे परत आला. त्यापैकी एकाने त्याला विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना? हा वेडा तुझ्याकडे का आला होता?” येहूने उत्तर दिले, “तो कोण होता व त्याचे बोलणे हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.” तेव्हा ते म्हणाले, “हे सत्य नाही, खरे काय आहे ते आम्हाला सांग.” येहूने म्हटले, “त्याने मला म्हटले: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा होण्यासाठी अभिषेक करत आहे.’ ” हे ऐकून त्यांनी ताबडतोब त्याच्यासमोर पायर्‍यांवर आपल्या अंगरख्याच्या पायघड्या घातल्या व कर्णा वाजवून ते ओरडून म्हणाले, “येहू राजा झाला आहे.” निमशीचा पुत्र यहोशाफाटचा पुत्र येहूने योराम राजाविरुद्ध बंड पुकारले. (त्यावेळेस योराम राजा सर्व सैन्यानिशी रामोथ गिलआद येथे अरामचा राजा हजाएलविरुद्ध इस्राएलांच्या बाजूने लढत होता. पण यहोराम राजा हा अरामचा राजा हजाएलशी लढताना ज्या जखमा अरामी लोकांनी दिल्या होत्या, त्या जखमा बर्‍या व्हाव्यात म्हणून तो येज्रीलला परतला होता.) येहू म्हणाला, “मी राजा व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर आपण काय केले आहे हे कोणीही या नगरीतून निसटून ही बातमी येज्रीलमध्ये कोणालाही कळवू नये म्हणून खबरदारी घ्या.” मग येहू रथात बसला आणि येज्रीलास गेला, कारण योराम तिथे विसावा घेत होता आणि यहूदीयाचा राजा अहज्याह त्याला भेटण्यास खाली गेला होता. येज्रीलच्या बुरुजावर असलेला पहारेकरी येहू व त्याची टोळी येताना पाहून ओरडून म्हणाला, “मला एक टोळी येताना दिसत आहे.” यहोरामाने आदेश दिला, “एका घोडेस्वारास त्यांना भेटण्यास पाठवा, जो त्यांना विचारेल, शांतीने येत आहात ना?” तेव्हा एक घोडेस्वार येहूला भेटण्यास गेला आणि म्हणाला, “राजाने असे म्हटले आहे: ‘तुम्ही शांतीने आला आहात का?’ ” येहूने उत्तर दिले, “तुला शांतीचे काय घेणे देणे? चल, माझ्यामागे हो!” तेव्हा पहारेकर्‍याने बातमी दिली, “आपला दूत तिथे पोहोचला, तो येणार्‍यांना भेटला, पण तो परत येत नाही.” मग राजाने दुसर्‍या घोडेस्वाराला पाठविले. तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, राजाने असे म्हटले आहे: तुम्ही शांतीने आला आहात का? येहूने उत्तर दिले, “तुला शांतीचे काय घेणे देणे? चल, माझ्यामागे हो!” पहारेकर्‍याने बातमी दिली, “तो तिथे पोहोचला, पण तो ही परत येताना दिसत नाही. त्याचे घोडे हाकणे तर निमशीचा पुत्र येहूसारखे आहे—तो घाईने हाकीत आहे.” यहोरामाने फर्मान दिला, “माझा रथ तयार करा.” मग इस्राएलाचा राजा योराम आणि यहूदीयाचा राजा अहज्याह आपआपल्या रथात बसून येहूला भेटावयास निघाले. ते येहूला येज्रीली नाबोथच्या शेतात भेटले. जेव्हा यहोरामाने येहूस पाहिले, तेव्हा त्याने विचारले, “येहू, तुम्ही शांतीने आला आहात का?” येहूने उत्तर दिले, “कशी राहील शांती, जेव्हा तुमची आई ईजबेलचे व्यभिचार आणि चेटके एवढे अधिक आहेत तोपर्यंत कशी शांती असेल?” ते ऐकताच यहोराम मागे फिरला आणि अहज्याहला ओरडून म्हणाला, “अहज्याह, विद्रोह, विद्रोह!” येहूने आपला धनुष्य सर्व शक्तिनिशी ओढला आणि यहोरामाच्या दोन्ही बाहूंच्यामध्ये मारला. बाण त्याच्या हृदयात शिरला, आणि तो रथातच कोसळून पडला. तेव्हा येहूने आपला साथीदार बिदकर याला म्हटले, “त्याला उचल आणि येज्रीली नाबोथच्या भूमीत फेकून दे, कारण स्मरण कर की मी आणि तू मिळून त्याचा पिता अहाब याच्यामागून रथामधून चाललो असताना याहवेहने ही भविष्यवाणी त्याच्या विरोधात केली होती: याहवेह जाहीर करतात, ‘मी काल नाबोथचे रक्त आणि त्याच्या पुत्रांचे रक्त पाहिले आहे आणि याच भूमीवर मी याची परतफेड करेन, असे याहवेह जाहीर करतात. वध केल्याबद्दल मी त्याचा बदला अहाबाला या नाबोथच्याच भूमीवर देईन.’ म्हणून आता याहवेहच्या वचनानुसार, त्याला उचल आणि त्याला त्या भूमीवर फेकून दे.” काय झाले ते पाहून, जेव्हा यहूदीयाचा राजा अहज्याह बेथ-हागानकडे जाणार्‍या मार्गाने पळाला. येहू त्याचा पाठलाग करता करता ओरडून म्हणाला, “त्यालाही मारा!” मग त्यांनी त्याला इब्लामजवळच्या गुर येथील चढणीवर रथातच घायाळ केले; तो मगिद्दोपर्यंत पळाला आणि तिथे तो मरण पावला. त्याच्या सेवकांनी त्याला रथामधूनच यरुशलेमास नेले व दावीदनगरीत त्याच्या पूर्वजांच्या थडग्यात त्याला मूठमाती दिली. (अहाबाचा पुत्र योरामच्या अकराव्या वर्षी अहज्याह यहूदीयाचा राजा झाला होता.) नंतर येहू येज्रीलास गेला. जेव्हा ईजबेलने हे ऐकले, तेव्हा तिने आपल्या पापण्या रंगविल्या व केशभूषा करून ती खिडकीतून बाहेर पाहत बसली. जसा येहू वेशीतून आत आला, तिने विचारले, “अरे आपल्या धन्याचा वध करणाऱ्या जिम्रीच्या मुला, तू शांतीने आला आहेस का?” त्याने वर खिडकीकडे पाहिले आणि मोठ्याने म्हणाला, “माझ्या बाजूचे कोण आहेत? कोण?” तेव्हा दोघा तिघा खोजांनी त्याच्याकडे डोकावून पाहिले. येहूने म्हटले, “तिला खिडकीतून खाली ढकलून द्या.” तेव्हा त्यांनी तिला खाली ढकलून दिले, आणि तिच्या रक्ताच्या काही चिरकांड्या भिंतीवर आणि घोड्यांवर पडल्या आणि घोड्यांनी तिला पायाखाली तुडविले. येहू आत गेला आणि त्याने खाणेपिणे केले. तो म्हणाला, “त्या शापित स्त्रीची काळजी घ्या आणि तिला मूठमाती द्या. कारण ती एका राजकन्या होती.” परंतु जेव्हा ते तिला मूठमाती देण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना तिची फक्त कवटी व हात आणि पायच सापडले. ते परत गेले आणि येहूला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, “याहवेहचे वचन जे त्यांनी आपला सेवक एलीयाह तिश्बी याच्यामार्फत सांगितले होते ते हेच होते; येज्रीलच्या शेतात कुत्री ईजबेलचे मांस खातील. आणि ईजबेलचे शरीर येज्रीलातील शेतात खताप्रमाणे विखुरले जाईल. हे कोणालाही सांगता येणार नाही की, ही ईजबेल आहे.”

सामायिक करा
२ राजे 9 वाचा

२ राजे 9:1-37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर अलीशा संदेष्ट्याने संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एकाला बोलावून सांगितले, “कंबर बांध आणि ही तेलाची कुपी हाती घेऊन रामोथ-गिलाद येथे जा. तेथे पोहचल्यावर येहू बिन यहोशाफाट बिन निमशी ह्याला शोधून काढ; मग आत जाऊन त्याला त्याच्या भाऊबंदांतून उठवून आतल्या खोलीत घेऊन जा. मग ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर ओत व असे बोल, ‘परमेश्वर म्हणतो, तू इस्राएलाचा राजा व्हावेस म्हणून मी तुला अभिषेक केला आहे.’ मग दार उघडून पळ काढ, थांबू नकोस.” नंतर तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलाद येथे गेला. तो तेथे जाऊन पोहचतो तर तेथे सैन्याचे सरदार बसले आहेत असे त्याला दिसून आले; तेव्हा तो म्हणाला, “हे सरदारा, तुला काही सांगायचे आहे.” येहूने विचारले, “आम्हा सर्वांतून कोणाला?” तो म्हणाला, “हे सरदारा, तुला.” तेव्हा तो उठून घरात गेल्यावर त्या शिष्याने त्याच्या मस्तकावर तेल ओतून म्हटले, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला परमेश्वराच्या लोकांचा म्हणजे इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून अभिषेक केला आहे; ईजबेलीच्या हातून माझे सेवक जे संदेष्टे आणि परमेश्वराचे दुसरे सर्व सेवक ह्यांचा रक्तपात झाला आहे त्याचा मला सूड घेणे आहे, म्हणून आपला धनी अहाब ह्याच्या घराण्याचा तू संहार कर. अहाबाच्या सर्व घराण्याचा समूळ नाश होईल; अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्राएलाच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन. नबाटाचा पुत्र यराबाम व अहीयाचा पुत्र बाशा ह्यांच्या घराण्यांसारखे मी अहाबाच्या घराण्याचे करीन. इज्रेलाच्या भूमीवर ईजबेलीस कुत्री खातील; तिला पुरायला कोणी असणार नाही.” मग दार उघडून त्याने पळ काढला. येहू बाहेर आपल्या धन्याच्या सेवकांकडे आला तेव्हा एकाने त्याला विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना? तो वेडा तुझ्याकडे का आला होता?” तो त्यांना म्हणाला, “तो मनुष्य कोण व त्याचा संदेश काय हे तुम्हांला माहीत आहेच.” ते म्हणाले, “भलतेच; काय आहे ते आम्हांला सांग.” तो म्हणाला, “त्याने मला असे सांगितले. परमेश्वर म्हणतो तू इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून मी तुला अभिषेक केला आहे.” हे ऐकून त्यांनी त्वरा करून आपापली वस्त्रे उतरवून त्याच्या पायांखाली पायर्‍यांवर पसरली आणि कर्णा वाजवून ‘येहू राजा झाला’ असा पुकारा केला. ह्या प्रकारे येहू बिन यहोशाफाट बिन निमशी ह्याने योरामाविरुद्ध फितुरी केली. (त्या वेळी योराम सर्व इस्राएलासह अरामाचा राजा हजाएल ह्याच्या भीतीमुळे रामोथ-गिलादाचे रक्षण करत होता; पण अरामाचा राजा हजाएल ह्याच्याशी लढताना योराम1 राजाला अराम्यांच्या हातून जे घाव लागले होते ते सर्व बरे व्हावेत म्हणून तो इज्रेलास परत गेला होता.) येहू म्हणाला, “तुमच्या मनास येईल तर ह्या नगरातून कोणालाही इज्रेलास हे कळवण्यासाठी निसटून जाऊ देऊ नका.” येहू रथात बसून इज्रेलास गेला; येथे योराम पडून होता आणि यहूदाचा राजा अहज्या हा त्याच्या भेटीला आला होता. इज्रेल येथील बुरुजावर पहारेकरी उभा होता. त्याने येहू येत होता त्याची टोळी पाहिली; मग त्याने येऊन सांगितले की, “मला एक टोळी दिसत आहे.” तेव्हा योराम म्हणाला, “एक स्वार पाहून त्यांच्याकडे पाठव, त्याला विचारायला सांग की, “सर्वकाही ठीक आहे ना?” तेव्हा त्याला भेटायला एक जण घोड्यावर बसून गेला व त्याला म्हणाला, “राजा असे विचारतो की सर्वकाही ठीक आहे ना?” येहू म्हणाला, “ठीक आहे किंवा नाही ह्याची तुला काय पंचाईत? चल, माझ्यामागे हो.” तेव्हा पहारेकर्‍याने सांगितले की, “जासूद त्यांच्याकडे गेला आहे पण तो काही परत आला नाही.” मग त्याने दुसरा स्वार पाठवला. तो त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, राजा विचारतो की, “सर्वकाही ठीक आहे ना?” येहूने त्याला म्हटले, “ठीक आहे किंवा नाही ह्याची तुला काय पंचाईत? चल, माझ्यामागे हो.” तेव्हा पहारेकर्‍याने सांगितले, “तोही त्यांच्याकडे गेला आहे पण परत आला नाही. त्याचे रथ हाकणे निमशीचा पुत्र येहू ह्याच्या रथ हाकण्यासारखे आहे; तो मोठ्या सपाट्याने रथ हाकत आहे.” योराम म्हणाला, “रथ तयार करा.” तेव्हा त्यांनी त्याचा रथ तयार केला. इस्राएलाचा राजा योराम व यहूदाचा राजा अहज्या हे आपापल्या रथात बसून येहूला भेटायला गेले, आणि इज्रेलकर नाबोथ ह्याच्या शेतात त्यांची गाठ पडली. योरामाने येहूला पाहिले तेव्हा तो म्हणाला, “येहू, सर्वकाही ठीक आहे ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार व गारुडे ह्यांचा सपाटा जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार?” हे ऐकून योरामाने आपला रथ फिरवून पळ काढला व अहज्याला म्हटले, “अहज्या, दगा रे दगा!” येहूने आकर्ण धनुष्य ओढून योरामाच्या बाहूंच्या दरम्यान असा बाण मारला की तो त्याचा ऊर फोडून गेला आणि तो रथात कलंडून पडला. तेव्हा येहूने आपला सरदार बिदकर ह्याला सांगितले, “त्याला उचलून इज्रेली नाबोथाच्या शेतात फेकून दे; त्याचा बाप अहाब ह्याच्यामागून तू आणि मी रथातून चाललो असता परमेश्वराने त्याला शासन सांगितले होते ते आठव; ‘परमेश्वर म्हणतो, काल नाबोथाचा व त्याच्या पुत्रांचा खून झाला तो मी पाहिलाच आहे; परमेश्वराचे असे म्हणणे आहे की ह्याच शेतात मी तुला त्याची उलटफेड करीन.’ तर आता परमेश्वराच्या वचनानुसार ह्याला उचलून शेतात टाक.” हे पाहून यहूदाचा राजा अहज्या हा बागेतील भवनाच्या रस्त्याने पळून गेला. येहूने त्याचा पाठलाग करून म्हटले, “त्यालाही रथातच ठार करा.” त्यांनी त्याला इब्लामाजवळील गुरघाटात मार दिला. तो तसाच मगिद्दोपर्यंत पळून जाऊन तेथे मेला. तेव्हा त्याच्या चाकरांनी त्याला रथात घालून यरुशलेमेला नेले आणि दावीदपुरात त्याच्या वडिलांच्या थडग्यात त्याला मूठमाती दिली. अहाबाचा पुत्र योराम ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षी अहज्या यहूदावर राज्य करू लागला होता. येहू इज्रेलास आल्याचे ईजबेलीने ऐकले तेव्हा ती डोळ्यांत सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली. येहू फाटकाजवळ आला तेव्हा ती म्हणाली, “आपल्या धन्याचा खून करणार्‍या जिम्री, सर्वकाही ठीक आहे ना?” येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, “माझ्या पक्षाचा कोणी आहे काय?” तेव्हा दोघा-तिघा खोज्यांनी त्याच्याकडे खिडकीतून डोकावले. त्याने त्यांना सांगितले, “तिला खाली टाका.” त्यांनी तिला खाली टाकले, तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व घोड्यांवर पडले आणि त्याने तिला पायांखाली तुडवले. मग तो आत जाऊन खाऊनपिऊन म्हणाला, “जा; ती शापित स्त्री कोठे आहे ते पाहा व तिला मूठमाती द्या, कारण ती राजकन्या आहे.” तिला मूठमाती देण्यासाठी ते गेले तेव्हा तिची कवटी, पाय व हाताचे तळवे ह्यांखेरीज तिचे त्यांना काही सापडले नाही. त्यांनी परत येऊन त्याला हे कळवले. तेव्हा तो म्हणाला, “परमेश्वराने आपला सेवक एलीया तिश्बी ह्याच्या द्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे घडले. त्याने म्हटले होते, ‘इज्रेलाच्या शेतात कुत्री ईजबेलीचे मांस खातील. ईजबेलीचे शव इज्रेलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील, ही ईजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही.”’

सामायिक करा
२ राजे 9 वाचा