२ राजे 13:14-20
२ राजे 13:14-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्या दुखण्याने अलीशा मरणार होता ते त्याला आता लागले; तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्याच्याकडे गेला. तो ओणवून त्याचे मुख पाहून रडू लागला व म्हणाला, “बाबा! अहो बाबा! इस्राएलाच्या रथांनो! इस्राएलाच्या राउतांनो!” अलीशाने त्याला सांगितले, “धनुष्यबाण घेऊन ये.” तेव्हा तो धनुष्यबाण घेऊन त्याच्याकडे आला. त्याने इस्राएलाच्या राजाला सांगितले, “धनुष्याला आपला हात लाव.” त्याने आपला हात धनुष्याला लावला; तेव्हा अलीशाने आपले हात राजाच्या हातांवर ठेवले. मग त्याने सांगितले, “पूर्वेकडील खिडकी उघड.” त्याने ती उघडली. मग अलीशा त्याला म्हणाला, “बाण सोड.” तेव्हा त्याने तो सोडला. तो म्हणाला, “हा बाण परमेश्वराकडून होणार्या सोडवणुकीचे म्हणजे अरामापासून सुटण्याचे चिन्ह होय; तू अफेक येथे अराम्यांना असा मार देशील की त्यांचा धुव्वा उडेल.” त्याने त्याला म्हटले, “बाण उचलून घे.” त्याने ते उचलून घेतले. मग तो इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “जमिनीवर बाण मार.” तो तीनदा मारून थांबला. देवाचा माणूस त्याच्यावर रागावून म्हणाला, “तू पाचसहा वेळा बाण मारायचे असते, म्हणजे अरामाचा क्षय होईपर्यंत तू त्याला मार दिला असतास; आता तू त्याला तीन वेळा मात्र मार देशील.” ह्यानंतर अलीशा मृत्यू पावला, व लोकांनी त्याला मूठमाती दिली. मग नव्या वर्षाच्या आरंभी मवाबी टोळ्यांनी देशावर स्वारी केली.
२ राजे 13:14-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता अलीशा तर आजारी पडला व त्या आजारातच पुढे तो मरण पावला. तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्यास भेटायला गेला आणि अलीशाबद्दल दु:खातिशयाने त्यास रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, इस्राएलचा रथ व त्याचे स्वार तुला घेण्यासाठी आले.” तेव्हा अलीशा योवाशाला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.” तेव्हा योवाशाने धनुष्य व काही बाण घेतले मग अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “धनुष्यावर हात ठेव.” योवाशाने त्याप्रमाणे केले. अलीशाने मग आपले हात राजाच्या हातांवर ठेवले. अलीशा त्यास म्हणाला, “पूर्वेकडची खिडकी उघड.” योवाशाने खिडकी उघडली. तेव्हा अलीशाने त्यास बाण मारायला सांगितले. योवाशाने बाण सोडला. अलीशा त्यास म्हणाला, “परमेश्वराचा हा विजयाचा तीर होय. अरामावरील विजयाचा बाण. अफेक येथे तू अराम्यांचा पाडाव करशील, त्यांना नेस्तनाबूत करशील.” अलीशा पुढे म्हणाला, “बाण घे.” योवाशाने ते घेतले. अलीशाने मग इस्राएलच्या राजाला भूमीवर बाण मारायला सांगितले. योवाशाने जमिनीवर तीन बाण मारले. मग तो थांबला. देवाचा मनुष्य योवाशावर रागावला. तो त्यास म्हणाला, “तू पाच सहावेळा तरी मारायला हवे होतेस. तरच तू अराम्यांना पुरते नेस्तनाबूत करु शकला असतास. आता तू फक्त तीनदाच त्यांचा पराभव करशील.” अलीशाने देह ठेवला आणि लोकांनी त्यास पुरले. पुढे वसंतात मवाबी सैन्यातील काहीजण इस्राएलाला आले. लढाईनंतर लूट करायला ते आले होते.
२ राजे 13:14-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता अलीशा ज्या आजाराने मरणार होता त्या आजाराने तो ग्रस्त झाला. इस्राएलाचा राजा योआश त्याला भेटावयाला खाली आला आणि त्याच्यासाठी रडला. तो रडत म्हणाला, “माझ्या पित्या! माझ्या पित्या! तुम्ही इस्राएलचे रथ आणि त्याचे स्वार!” अलीशा म्हणाला, “एक धनुष्य व काही बाण घे.” आणि त्याने तसेच केले. “आपल्या हातात धनुष्य घे,” तो इस्राएलाच्या राजाला म्हणाला. जेव्हा त्याने ते आपल्या हातात घेतले, तेव्हा अलीशाने आपला हात राजाच्या हातावर ठेवला. “पूर्वेकडील खिडकी उघड.” असे अलीशाने म्हटले आणि त्याने ती उघडली. तेव्हा अलीशा म्हणाला, “बाण सोड!” आणि त्याने बाण सोडला. तेव्हा अलीशाने जाहीर केले, “हा याहवेहचा विजयी बाण, अरामावर विजय मिळवून देणारा बाण आहे. तू अफेक येथे अरामी लोकांचा संपूर्ण नाश करशील.” नंतर त्याने म्हटले, “बाण घे,” आणि राजाने बाण घेतले. अलीशा इस्राएलच्या राजाला म्हणाला, “ते बाण जमिनीवर मार.” त्याने ते बाण तीन वेळा जमिनीवर मारले आणि थांबला. परमेश्वराचा मनुष्य त्याच्यावर रागावला आणि म्हणाला, “तू पाच किंवा सहा बाण जमिनीवर सोडावयास हवे होतेस; तेव्हा तू अरामचा पराभव आणि पूर्ण नाश केला असतास. परंतु आता तू फक्त तीन वेळाच त्यांचा पराभव करशील.” अलीशा मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली. मोआबातील लुटारूंच्या टोळ्या प्रत्येक वसंतॠतूत देशावर हल्ला करीत असत.