२ इतिहास 9:1-9
२ इतिहास 9:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शलमोनाची कीर्ती शबाच्या राणीच्या कानावर गेली तेव्हा त्याची कठीण परीक्षा घेण्यासाठी ती यरूशलेमास आली. तिच्याबरोबर मोठा लवाजमा होता. मसाल्याचे पदार्थ, सोनेनाणे, मौल्यवान रत्ने या गोष्टी उंटांवर लादून तिने सोबत आणल्या होत्या शलमोनाची भेट घेऊन ती त्याच्याशी मनातल्या गोष्टी बोलली. तिला शलमोनाला बरेच प्रश्न विचारायचे होते. शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यास त्यातले काहीच अवघड वाटले नाही. त्याने उत्तर दिले नाही असा कोणताच प्रश्न उरला नाही. शबाच्या राणीने त्याच्या सूज्ञपणाचा प्रत्यय घेतला, त्याचा महाल पाहिला. त्याच्या मेजावरील अन्नपदार्थ तिने पाहिले, त्याच्या प्रमुख कारभाऱ्याची बैठक पाहिली. त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे पोशाख पाहिले. शलमोनाचे प्यालेबरदार आणि त्यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरातील शलमोनाने केलेली होमार्पणे हे सर्व तिने पाहिली आणि या दर्शनाने ती थक्क झाली. मग ती राजा शलमोनाला म्हणाली, “तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत. इथे येऊन स्वतः अनुभव घेईपर्यंत मला या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. आता मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहीले आहे. खरे तर तुझ्या सूज्ञपणाची थोरवी निम्म्यानेही माझ्यापर्यंत पोचली नव्हती. तुझ्याबद्दल जे ऐकले त्यापेक्षाही तू महान आहेस. तुझे लोक व तुझ्या सेवेत सदैव तत्पर असलेले तुझे सेवक, तुझी माणसे आणि अधिकारी फार धन्य आहेत. तुझ्या सेवेत असतानाच त्यांना तुझ्या शहाणपणाचा लाभ होतो. तुझा देव परमेश्वर ह्याची स्तुती असो. तो तुझ्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या वतीने त्याने तुला राजा म्हणून सिंहासनावर बसवले आहे. परमेश्वराचे इस्राएलावर प्रेम आहे आणि इस्राएलावर त्याचा कायमचा वरदहस्त आहे जे उचित आणि न्याय्य ते करण्यासाठी त्याने तुला राजा केले आहे.” शबाच्या राणीने मग राजा शलमोन याला एकशेवीस किक्कार सोने, अनेक मसाल्यांचे पदार्थ आणि मौल्यवान रत्ने यांचा नजराणा दिला. तिने दिले तसे मसाल्यांचे पदार्थ व वस्तू शलमोनाला कधीच कोणाकडून मिळाले नव्हते.
२ इतिहास 9:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनच्या किर्तीविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती यरुशलेमास आली. मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली. शलोमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; तिला स्पष्ट करू शकणार नाही असे काहीही त्याच्यासाठी कठीण नव्हते. जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनचे ज्ञान व त्याने बांधलेला राजवाडा पाहिला, त्याच्या मेजावरील भोजन, त्याच्या अधिकार्यांची आसने, सेवा करणारे सेवक व त्यांचे अंगरखे, प्यालेदार व याहवेहच्या मंदिरात त्याने केलेली होमार्पणे हे सर्व पाहून ती चकित झाली. ती राजाला म्हणाली, “तुमचे ज्ञान व तुमची प्राप्ती याविषयी माझ्या देशात मी जो अहवाल ऐकला तो सत्य आहे. परंतु त्यांनी मला जे सांगितले त्यावर मी येथे येऊन या गोष्टी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहीपर्यंत विश्वास केला नाही. खचितच तुमचे ज्ञान व संपत्ती याबद्दल मला जे सांगितले गेले ते अर्धे देखील नाही; त्यापेक्षा ते कितीतरी अधिक आहे. आपले लोक किती सुखी असतील! तुमचे अधिकारी जे तुमच्यासमोर नित्याने उभे राहतात व तुमचे ज्ञान ऐकतात ते किती सुखी असतील! याहवेह तुमचे परमेश्वर धन्य असो, ज्यांना तुमच्या ठायी संतोष वाटला व तुम्हाला याहवेह तुमचे परमेश्वरासाठी राजा म्हणून आपल्या राजासनावर अधिकार करण्यास ठेवले. कारण तुमच्या परमेश्वराचे इस्राएलवर असलेले प्रेम आणि त्यांना सर्वकाळ पाठिंबा द्यावा अशी त्यांची इच्छा, यासाठी त्यांनी तुम्हाला त्यांच्यावर राजा केले, यासाठी की न्याय आणि धार्मिकता टिकवून धरावी.” नंतर तिने राजाला एकशेवीस तालांत सोने, पुष्कळ सुगंधी द्रव्ये व मौल्यवान रत्ने दिली. शबाच्या राणीने शलोमोन राजाला जी सुगंधी द्रव्ये आणली त्यासारखी त्यानंतर परत कधी नव्हती.
२ इतिहास 9:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी बरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून कूटप्रश्नांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी यरुशलेमेस आली. शलमोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्यापुढे बोलली. शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती. शलमोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधलेले मंदिर, त्याच्या मेजवानीची पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्यांची खिदमत व त्यांचे पोशाख; त्याचे प्यालेबरदार व त्यांचे पोशाख आणि परमेश्वराच्या मंदिरात चढून जाण्याचा त्याचा तो जिना, हे सगळे पाहून ती गांगरून गेली. ती राजाला म्हणाली, “आपली करणी व ज्ञान ह्यांविषयीची कीर्ती मी आपल्या देशात ऐकली ती खरी आहे; तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ह्या गोष्टीचा मला विश्वास येईना; आता पाहावे तर आपल्या ज्ञानाची अर्धीही थोरवी माझ्या कानी आली नव्हती. आपली कीर्ती मी ऐकली आहे तिच्याहून आपली कीर्ती अधिक आहे. धन्य आपले लोक, धन्य हे आपले सेवक; त्यांना आपणासमोर सतत तिष्ठत राहून आपल्या शहाणपणाचा लाभ घडत असतो. धन्य आपला देव परमेश्वर; त्याने आपणावर प्रसन्न होऊन आपल्या वतीने आपण राजा व्हावे म्हणून आपणाला आपल्या गादीवर स्थापन केले आहे; आपल्या देवाने इस्राएलावर प्रेम करून त्याची कायमची स्थापना करण्याचे म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.” तिने राजाला एकशे वीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला जी सुगंधी द्रव्ये नजर केली त्यांच्यासारखी पुन्हा कधी कोठून आली नाहीत.