२ इतिहास 20:12-20
२ इतिहास 20:12-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे देवा, या लोकांस चांगले शासन कर. आमच्यावर चाल करून येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हास काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहे.” यहूदातील सर्व मंडळी आपल्या पत्नी आणि तान्ह्या मुलांसकट सर्व अपत्यांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती. तेव्हा यहजीएल याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. यहजीएल हा जखऱ्याचा पुत्र. जखऱ्या बनायाचा पुत्र. बनाया यईएलाचा पुत्र. आणि यईएल मत्तन्याचा पुत्र. यहजीएल लेवी असून आसाफच्या वंशातला होता. या सभेत यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरूशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे. उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल. तुम्हास या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हास आढळून येईल. यहूदा आणि यरूशलेम लोकहो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.” यहोशाफाटाने मस्तक भूमीपर्यंत लववले. यहूदा आणि यरूशलेममधील सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे दंडवत घातले. त्या सर्वांनी परमेश्वराची आराधना केली. कहाथ आणि कोरह या घराण्यांतील लेवी इस्राएलच्या परमेश्वर देवाची भजने म्हणण्यास उभे राहिले. उच्च स्वरात त्यांनी परमेश्वराची भजने म्हटली. यहोशाफाटाचे सैन्य भल्यासकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले. ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला, “यहूदा आणि यरूशलेम नगरांमधील लोकहो, ऐका. आपल्या परमेश्वर देवावर श्रध्दा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा. जय तुमचाच आहे.”
२ इतिहास 20:12-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आमच्या परमेश्वरा, तुम्ही त्यांचा न्याय करणार नाही का? कारण आमच्यावर हल्ला करणाऱ्या या विशाल सैन्याचा सामना करण्यासाठी आमच्याकडे शक्ती नाही. काय करावे हे आम्हाला कळत नाही, परंतु आमची दृष्टी तुमच्याकडे लागली आहे.” यहूदीयाचे सर्व पुरुष, त्यांच्या पत्नी, मुले आणि शिशू यांच्या समवेत याहवेहसमोर उभे राहिले. तेव्हा जखर्याहचा मुलगा यहजिएल, जो बेनाइयाहचा पुत्र, जो ईयेलचा पुत्र, जो मत्तन्याहचा पुत्र, लेवी आणि आसाफ याचा वंशज त्याच्यावर याहवेहचा आत्मा आला व तो सभेमध्ये उभा राहिला. तो म्हणाला, “ऐका, राजा यहोशाफाट आणि जे यहूदीया आणि यरुशलेममध्ये राहतात ते सर्वजण! याहवेह तुम्हाला असे म्हणतात: ‘या विशाल सैन्याला घाबरू नका किंवा निराश होऊ नका. कारण युद्ध तुमचे नव्हे, तर परमेश्वराचे आहे. उद्या त्यांच्या विरोधात हल्ला करा. जीजच्या खिंडीने ते वर चढत असतील आणि यरुएलच्या वाळवंटातील खिंडीच्या शेवटी तुम्हाला ते सापडतील. तुम्हाला हे युद्ध करावे लागणार नाही. तुम्ही तुमचे स्थान ग्रहण करा; खंबीरपणे उभे राहा. यहूदीया आणि यरुशलेम पहा, याहवेह तुम्हाला सुटकारा देतील. घाबरू नका; निराश होऊ नका. उद्या त्यांचा सामना करण्यासाठी बाहेर पडा, आणि याहवेह तुमच्याबरोबर असतील.’ ” यहोशाफाट त्याचे मुख जमिनीकडे करून नतमस्तक झाला आणि यहूदीया आणि यरुशलेमच्या सर्व लोकांनी याहवेहपुढे खाली पडून उपासना केली. नंतर कोहाथी आणि कोरही लोकांमधील काही लेवी उभे राहिले आणि त्यांनी उच्चस्वरात याहवेहची, इस्राएलच्या परमेश्वराची स्तुती केली. पहाटे ते तकोवाच्या वाळवंटाकडे निघाले. ते बाहेर पडले असताना यहोशाफाट उभा राहिला आणि म्हणाला, “यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांनो, माझे ऐका! याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे समर्थन केले जाईल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा आणि तुम्ही यशस्वी व्हाल.”
२ इतिहास 20:12-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या ह्या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हांला ताकद नाही; आम्ही काय करावे ते आम्हांला सुचत नाही; पण आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत.” तेव्हा सर्व यहूदी आपली मुलेबाळे व स्त्रियांसह परमेश्वरासन्मुख उभे राहिले. मग आसाफ वंशातला यहजीएल बिन जखर्या बिन बनाया बिन यइएल बिन मत्तन्या लेवी हा ह्या मंडळीमध्ये उभा होता; त्याच्या ठायी परमेश्वराचा आत्मा उतरला. आणि तो म्हणाला, “अहो सर्व यहूद्यांनो, यरुशलेमनिवासी जनहो, आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका; परमेश्वर तुम्हांला सांगत आहे की, ‘हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका; कचरू नका; कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. उद्या त्यांच्याशी सामना करण्यास जा; पाहा, ते सीसघाट चढून येत आहेत, यरुएल रानापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यांना गाठाल. ह्या लढाईत तुम्हांला लढावे लागणार नाही; हे यहूदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पाहा.’ घाबरू नका, कचरू नका; उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे.” मग यहोशाफाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक लववले, त्याप्रमाणेच सर्व यहूदी व यरुशलेमनिवासी ह्यांनी परमेश्वराचे भजन करून त्याच्यापुढे दंडवत घातले. आणि कहाथी व कोरही ह्यांच्यातले काही लेवी उभे राहून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे स्तवन उच्च स्वराने करू लागले. ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले; ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, “अहो यहूद्यांनो, अहो यरुशलेमनिवासी जनहो, ऐका; तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.”