YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 20:1-23

२ इतिहास 20:1-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनी लोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटावर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशाफाटाला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करून येत आहे. ती हससोन-तामार!” म्हणजेच एन-गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा. यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वरास काय करावे, असे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली. तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले. यहोशाफाट, परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांमध्ये तो उभा राहिला. तो म्हणाला, “आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रामधल्या सर्व राज्यांचा तूच शास्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही.” तूच आमचा परमेश्वर आहेस या प्रदेशातील रहिवाश्यांना तू हाकलून लावलेस. तुझ्या या इस्राएलादेखतच तू हे केलेस. तुझा मित्र अब्राहाम याच्या वंशजांना तू ही भूमी कायमची बहाल केलीस. अब्राहामाचे वंशज या प्रदेशात राहिले आणि तुझ्या नावाकरिता त्यांनी मंदिर बांधले. ते म्हणाले, तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे, “संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु, आमची हाक ऐकून तू आम्हास सोडव.” “पण यावेळी अम्मोन, मवाब आणि सेईर पर्वत या भागातले हे लोक आहेत. इस्राएल लोक मिसरहून आले तेव्हा इस्राएल लोकांस तू त्यांच्या प्रदेशात प्रवेश करु दिला नाहीस. त्यामुळे इस्राएल लोकांनी तिकडे पाठ फिरवली आणि त्यांचे उच्चाटन केले नाही. पण तेव्हाच त्यांच्या नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हास आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हास बहाल केला आहेस. हे देवा, या लोकांस चांगले शासन कर. आमच्यावर चाल करून येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हास काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहे.” यहूदातील सर्व मंडळी आपल्या पत्नी आणि तान्ह्या मुलांसकट सर्व अपत्यांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती. तेव्हा यहजीएल याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. यहजीएल हा जखऱ्याचा पुत्र. जखऱ्या बनायाचा पुत्र. बनाया यईएलाचा पुत्र. आणि यईएल मत्तन्याचा पुत्र. यहजीएल लेवी असून आसाफच्या वंशातला होता. या सभेत यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरूशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे. उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल. तुम्हास या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हास आढळून येईल. यहूदा आणि यरूशलेम लोकहो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.” यहोशाफाटाने मस्तक भूमीपर्यंत लववले. यहूदा आणि यरूशलेममधील सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे दंडवत घातले. त्या सर्वांनी परमेश्वराची आराधना केली. कहाथ आणि कोरह या घराण्यांतील लेवी इस्राएलच्या परमेश्वर देवाची भजने म्हणण्यास उभे राहिले. उच्च स्वरात त्यांनी परमेश्वराची भजने म्हटली. यहोशाफाटाचे सैन्य भल्यासकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले. ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला, “यहूदा आणि यरूशलेम नगरांमधील लोकहो, ऐका. आपल्या परमेश्वर देवावर श्रध्दा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा. जय तुमचाच आहे.” यहोशाफाटाने लोकांस प्रोत्साहन दिले व सूचना दिल्या. परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यांनी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले, “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची प्रीती सर्वकाळ आहे.” लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने यहूदावर चाल करून आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेईर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली. अम्मोनी आणि मवाबी लोक सेईर पर्वतातल्या लोकांशी लढू लागले. अम्मोन्यांनी आणि मवाब्यांनी त्यांचा पुरता संहार केला. सेईरातल्या लोकांचा बीमोड केल्यानंतर त्यांनी एकमेकांचा नाश केला.

सामायिक करा
२ इतिहास 20 वाचा

२ इतिहास 20:1-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यानंतर, मोआबी आणि अम्मोनी सैन्य काही मऊनी लोकांना बरोबर घेऊन यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी आले. काही लोक आले आणि यहोशाफाटला म्हणाले, “मृत समुद्राच्या पलीकडे असलेल्या अराम येथून एक प्रचंड सैन्य तुमच्याविरुद्ध येत आहे. ते आधीच हससोन-तामार येथे आले आहे” (ते म्हणजे एन-गेदी). धोक्याची सूचना मिळाल्याने यहोशाफाटने याहवेहकडे याची चौकशी करण्याचा निश्चय केला आणि त्याने सर्व यहूदीयामध्ये उपवासाची घोषणा केली. त्याप्रमाणे यहूदीयाचे लोक याहवेहची मदत घेण्यास एकत्र आले; निश्चितच, यहूदीयाच्या प्रत्येक शहरातील लोक त्यांच्या साहाय्यासाठी आले. नंतर यहोशाफाट याहवेहच्या मंदिराजवळ नवीन अंगणासमोर यहूदीया आणि यरुशलेम यांच्या सभेमध्ये उभा राहिला आणि म्हणाला: “याहवेह, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, तुम्ही स्वर्गातील परमेश्वर नाही का? तुम्ही राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर राज्य करता. सत्ता आणि सामर्थ्य तुमच्या हातात आहे, आणि कोणीही तुमचा सामना करू शकत नाही. आमच्या परमेश्वरा, या प्रदेशातील रहिवाशांना तुम्ही तुमच्या इस्राएली लोकांपुढून घालवून दिले आणि तो प्रदेश तुमचे मित्र अब्राहामच्या वंशजांना कायमचा दिला नाही का? त्यांनी या प्रदेशात वास्तव्य केले आहे आणि त्यामध्ये तुमच्या नामासाठी पवित्रस्थान बांधले आहे, ते म्हणाले, ‘जर आमच्यावर संकटे आली, मग ती न्यायाची तलवार असो किंवा मरी असो किंवा दुष्काळ, तर आम्ही तुमच्या उपस्थितीत तुमचे नाव धारण करणाऱ्या या मंदिरापुढे उभे राहू आणि आमच्या संकटात तुमचा धावा करू आणि तुम्ही आमचे ऐकाल आणि आम्हाला वाचवाल.’ “परंतु आता येथे अम्मोन, मोआब आणि सेईर पर्वताकडील लोक आहेत, जेव्हा ते इजिप्तकडून आले तेव्हा तुम्ही इस्राएली लोकांना त्यांच्या प्रदेशावर आक्रमण करू देत नव्हता; म्हणून ते त्यांच्यापासून दूर गेले आणि त्यांचा नाश केला नाही. आता पाहा, तुम्ही आम्हाला वारसा म्हणून दिलेल्या वतनदत्त प्रदेशातून बाहेर काढायला येऊन ते आमची कशी परतफेड करत आहेत. आमच्या परमेश्वरा, तुम्ही त्यांचा न्याय करणार नाही का? कारण आमच्यावर हल्ला करणाऱ्या या विशाल सैन्याचा सामना करण्यासाठी आमच्याकडे शक्ती नाही. काय करावे हे आम्हाला कळत नाही, परंतु आमची दृष्टी तुमच्याकडे लागली आहे.” यहूदीयाचे सर्व पुरुष, त्यांच्या पत्नी, मुले आणि शिशू यांच्या समवेत याहवेहसमोर उभे राहिले. तेव्हा जखर्‍याहचा मुलगा यहजिएल, जो बेनाइयाहचा पुत्र, जो ईयेलचा पुत्र, जो मत्तन्याहचा पुत्र, लेवी आणि आसाफ याचा वंशज त्याच्यावर याहवेहचा आत्मा आला व तो सभेमध्ये उभा राहिला. तो म्हणाला, “ऐका, राजा यहोशाफाट आणि जे यहूदीया आणि यरुशलेममध्ये राहतात ते सर्वजण! याहवेह तुम्हाला असे म्हणतात: ‘या विशाल सैन्याला घाबरू नका किंवा निराश होऊ नका. कारण युद्ध तुमचे नव्हे, तर परमेश्वराचे आहे. उद्या त्यांच्या विरोधात हल्ला करा. जीजच्या खिंडीने ते वर चढत असतील आणि यरुएलच्या वाळवंटातील खिंडीच्या शेवटी तुम्हाला ते सापडतील. तुम्हाला हे युद्ध करावे लागणार नाही. तुम्ही तुमचे स्थान ग्रहण करा; खंबीरपणे उभे राहा. यहूदीया आणि यरुशलेम पहा, याहवेह तुम्हाला सुटकारा देतील. घाबरू नका; निराश होऊ नका. उद्या त्यांचा सामना करण्यासाठी बाहेर पडा, आणि याहवेह तुमच्याबरोबर असतील.’ ” यहोशाफाट त्याचे मुख जमिनीकडे करून नतमस्तक झाला आणि यहूदीया आणि यरुशलेमच्या सर्व लोकांनी याहवेहपुढे खाली पडून उपासना केली. नंतर कोहाथी आणि कोरही लोकांमधील काही लेवी उभे राहिले आणि त्यांनी उच्चस्वरात याहवेहची, इस्राएलच्या परमेश्वराची स्तुती केली. पहाटे ते तकोवाच्या वाळवंटाकडे निघाले. ते बाहेर पडले असताना यहोशाफाट उभा राहिला आणि म्हणाला, “यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांनो, माझे ऐका! याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे समर्थन केले जाईल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा आणि तुम्ही यशस्वी व्हाल.” लोकांबरोबर सल्लामसलत केल्यावर, यहोशाफाटने पुरुषांची नियुक्ती केली, याहवेहची स्तुती गाण्यासाठी आणि त्यांच्या पवित्रतेच्या वैभवाबद्दल त्यांची स्तुती करण्यासाठी जेव्हा ते सैन्याचे प्रमुख म्हणून निघाले तेव्हा ते म्हणाले: “याहवेहचे आभार माना, कारण त्यांचे प्रेम अनंतकाळ टिकते.” जेव्हा त्यांनी गाणे गाण्यास आणि स्तुती करण्यास सुरुवात केली लागले, तेव्हा याहवेहनी यहूदीयावर आक्रमण करणारे अम्मोनी, मोआब आणि सेईर पर्वताच्या लोकांवर दबा धरून हल्ला केला आणि शत्रूचा पराभव झाला. अम्मोनी आणि मोआबी लोक सेईर पर्वतावरील लोकांवर त्यांचा नाश करण्यासाठी आणि त्यांचा समूळ उच्छेद करण्यासाठी उठले. सेईर येथील माणसांची कत्तल करून झाल्यावर त्यांनी एकमेकांचा नाश करण्यास सुरुवात केली.

सामायिक करा
२ इतिहास 20 वाचा

२ इतिहास 20:1-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्यानंतर मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्या- बरोबर मऊन्यातले1 कित्येक लोक युद्ध करण्यास यहोशाफाटावर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की, “समुद्रापलीकडून अराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझ्यावर चाल करून येत आहे; तो जमाव हससोन-तामार उर्फ एन-गेदी येथवर आला आहे.” यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला; सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फर्मावले. यहूदी लोक परमेश्वराचे साहाय्य मागण्यासाठी एकत्र झाले; यहूदाच्या सर्व नगरांतून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले. यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नव्या अंगणासमोर यहूदी व यरुशलेमकर ह्यांच्या जमावांमध्ये उभा राहिला. तो म्हणाला, “हे आमच्या पूर्वजांच्या देवा, परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना? राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर तूच शास्ता आहेस ना? तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तुझ्यासमोर टिकाव धरवत नाही. हे आमच्या देवा, तू ह्या देशाच्या रहिवाशांना आपल्या इस्राएल प्रजेपुढून घालवून देऊन हा देश तुझा मित्र अब्राहाम ह्याच्या वंशजांना कायमचा दिला आहेस ना? ते येथे वसले आहेत आणि येथे तुझ्या नामाप्रीत्यर्थ त्यांनी हे पवित्रस्थान बांधले आहे. ते म्हणाले आहेत की, ‘तलवार, दैवी क्षोभ, मरी अथवा दुष्काळ आमच्यावर आला तर ह्या मंदिरास तुझे नाम दिले आहे त्याच्यासमोर व तुझ्यासमोर आम्ही उभे राहून आमच्या संकटसमयी तुझा धावा करू, तेव्हा तू आमचे ऐकून आमचा बचाव करशील.’ पाहा, हे अम्मोनी, मवाबी व सेईर पहाडातले लोक; इस्राएल लोक मिसर देशाहून येत असताना त्यांना तू ह्यांच्यावर स्वारी करू दिली नाहीस; ते ह्यांच्याजवळून वळून निघून गेले, व ह्यांचा त्यांनी नाश केला नाही. पाहा, जे वतन तू आम्हांला दिले आहेस त्यातून आम्हांला घालवून देण्यासाठी ते आले आहेत; असे हे आमची उलटफेड करण्यास आले आहेत. हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या ह्या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हांला ताकद नाही; आम्ही काय करावे ते आम्हांला सुचत नाही; पण आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत.” तेव्हा सर्व यहूदी आपली मुलेबाळे व स्त्रियांसह परमेश्वरासन्मुख उभे राहिले. मग आसाफ वंशातला यहजीएल बिन जखर्‍या बिन बनाया बिन यइएल बिन मत्तन्या लेवी हा ह्या मंडळीमध्ये उभा होता; त्याच्या ठायी परमेश्वराचा आत्मा उतरला. आणि तो म्हणाला, “अहो सर्व यहूद्यांनो, यरुशलेमनिवासी जनहो, आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका; परमेश्वर तुम्हांला सांगत आहे की, ‘हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका; कचरू नका; कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. उद्या त्यांच्याशी सामना करण्यास जा; पाहा, ते सीसघाट चढून येत आहेत, यरुएल रानापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यांना गाठाल. ह्या लढाईत तुम्हांला लढावे लागणार नाही; हे यहूदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पाहा.’ घाबरू नका, कचरू नका; उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे.” मग यहोशाफाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक लववले, त्याप्रमाणेच सर्व यहूदी व यरुशलेमनिवासी ह्यांनी परमेश्वराचे भजन करून त्याच्यापुढे दंडवत घातले. आणि कहाथी व कोरही ह्यांच्यातले काही लेवी उभे राहून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे स्तवन उच्च स्वराने करू लागले. ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले; ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, “अहो यहूद्यांनो, अहो यरुशलेमनिवासी जनहो, ऐका; तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.” सैन्याबरोबर बाहेर जाताना ‘परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे,’ हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकांना त्या कामी नेमले. ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले, तेव्हा अम्मोनी, मवाबी व सेईर पहाडातले लोक जे यहूदावर चाल करून येत होते त्यांना गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसवले व त्यांनी त्यांचा मोड केला. अम्मोनी व मवाबी सेईर पहाडातल्या लोकांची अगदी कत्तल करून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्यांच्यावर उठले; सेइरनिवाशांचा निःपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले.

सामायिक करा
२ इतिहास 20 वाचा