1 तीमथ्य 6:6-21
1 तीमथ्य 6:6-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे. कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही. जर आपणास अन्न, वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे. पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात. कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची हाव धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दुःख करून घेतले आहे. हे देवाच्या मनुष्या, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधी चांगले युद्ध कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या सार्वकालिक जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस, जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो. आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत निष्कलंक आणि निर्दोष रहावे म्हणून ही आज्ञा पाळ. जो धन्यवादीत, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाली दाखवील, त्यास सन्मान व सार्वकालिक सामर्थ्य आहे. आमेन. या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी. चांगले ते करावे, चांगल्या कृत्यात धनवान, उदार व परोपकारी असावे. जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. तीमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “विद्या” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा. ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून बहकून गेले आहेत देवाची कृपा तुम्हाबरोबर असो.
1 तीमथ्य 6:6-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु संतोषासहित असणारी सुभक्ती ही मोठीच मिळकत आहे. कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपण जाताना बरोबर काहीही घेऊन जाणार नाही. म्हणून आपल्याजवळ पुरेसे अन्नवस्त्र असले की त्यामध्ये आपण तृप्त असावे. जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात, ते परीक्षेत आणि पाशात व अति मूर्खपणाच्या आणि अपायकारक अभिलाषांच्या आहारी जातात, जी त्यांना अधोगतीला नेऊन त्यांचा संपूर्ण नाश करतात. कारण पैशाचा लोभ सर्वप्रकारच्या दुष्टाईचे एक मूळ होय. पैशाच्या आसक्तीने कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस अनेक दुःखांनी भेदून घेतले आहे. परंतु हे परमेश्वराच्या माणसा, तू या सर्व गोष्टींपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग. विश्वासाचे सुयुद्ध लढ. परमेश्वराने तुला केलेले पाचारण आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव, ज्याचा अनेक साक्षीदारांसमक्ष तू अंगीकार केला आहे. सर्वांना जीवन देणार्या परमेश्वरासमक्ष आणि पंतय पिलातासमोर निर्भयपणाने साक्ष देणार्या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आज्ञा करतो आपले प्रभू येशू ख्रिस्त परत येईपर्यंत या आज्ञा दोषरहित आणि निर्दोष ठेव. परमेश्वर जे योग्य समयी त्याला पूर्ण करतील, परमेश्वर जे धन्यवादित व एकच सर्वसमर्थ, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जे अगम्य प्रकाशात राहतात, ज्यांना कोणीही पाहिले नाही, आणि कोणीही पाहू शकत नाही; त्यांना सदासर्वकाळ गौरव आणि चिरकाल सामर्थ्य असो. आमेन. जगातील श्रीमंतांना निक्षून सांग की त्यांनी गर्विष्ठ आणि उद्धट होऊ नये; त्या धनावर विसंबून राहू नये. तर परमेश्वर जे आपल्या उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतात, त्याचा अभिमान बाळगा व त्यांच्यावर भरवसा ठेवा. त्यांना चांगले ते करण्यासाठी, सत्कर्माविषयी धनवान व गरजवंतांना औदार्याने देणे व परोपकारी असण्याविषयी आज्ञा द्या. अशाप्रकारे, ही संपत्ती त्यांच्या भावी युगाच्या पायाभरणीसाठी खर्च केली जाईल, जेणेकरून जे जीवन जगू शकतील ते वास्तव आहे. हे तीमथ्या, जी ठेव तुला सोपविली आहे तिचे रक्षण कर आणि अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि ज्ञानाच्या फुशारक्या मारणार्याबरोबर मूर्खपणाचे वाद वर्ज्य कर. कित्येक ती स्वीकारून विश्वासापासून ढळले आहेत.
1 तीमथ्य 6:6-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
चित्तसमाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे. परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणार्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वत:स पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे. हे देवभक्ता, तू ह्यांपासून पळ, आणि नीतिमत्त्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर; त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे, आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तो चांगला पत्कर केला आहेस. सर्व प्राणिमात्राला जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातासमक्ष स्वतःविषयी चांगला पत्कर केला, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू ही आज्ञा निष्कलंक व निर्दोष राख. जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही, आणि कोणी पाहू शकत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाळी दाखवील; त्याला सन्मान व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी. चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे; जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा. हे तीमथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटींपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा. ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून ढळले आहेत. तुझ्याबरोबर कृपा असो.
1 तीमथ्य 6:6-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
समाधानी धार्मिक जीवन हा एक महान लाभ असतो. आपण जगात काही आणले नाही आणि निश्चितच आपल्याला त्यातून काही नेता येत नाही! तर मग आपल्याला जे अन्नवस्त्र मिळते तेवढ्यात तृप्त असावे. परंतु जे धनवान होऊ पाहतात, ते मोहपाशात सापडून मूर्खपणाच्या बाधक वासनांत अडकून स्वतःचा नाश व विध्वंस ओढवून घेतात; कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे, त्याच्या मागे लागून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळ दुःखांनी त्यांची हृदये विदीर्ण करून घेतली आहेत. हे देवभक्ता, तू ह्या लोभापासून लांब राहा आणि यथोचित संबंध, देवभीरू वृत्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्या गोष्टींचा पाठपुरावा कर. श्रद्धेचे सुयुद्ध लढत रहा. स्वतःसाठी शाश्वत जीवन मिळव. त्यासाठीच तुला पाचारण करण्यात आले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तुझी श्रद्धा जाहीरपणे स्वीकारली आहेस. सर्व प्राणिमात्रांना जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातसमक्ष स्वतःविषयी साक्ष दिली, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू हे आदेश निष्कलंकपणे व निर्दोषपणे पाळ. जो धन्य व एकमेव अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही, तो प्रभू येशूचे प्रकट होणे यथाकाळी सिद्धीस नेईल, त्याला सन्मान व शाश्वत सामर्थ्य असो. आमेन. प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, त्यांनी गर्विष्ठ होऊ नये, चंचल धनावर भिस्त ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर भिस्त ठेवावी. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. अशा प्रकारे ते असा काही साठा जमवितील की, तो त्यांच्या भवितव्यासाठी भरभक्कम पाया ठरेल व त्यामुळे ते खरे शाश्वत जीवन मिळवू शकतील. हे तीमथ्य, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अमंगळ व निरर्थक वटवट व ज्याला चुकीने ‘ज्ञान’ असे म्हटले जाते त्याविषयीची मतभिन्नता टाळ; कारण ते ज्ञान स्वीकारून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत. तुम्हांला कृपा मिळो. आमेन.