1 थेस्सल 5:11-24
1 थेस्सल 5:11-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात. आणि बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हास बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या; आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना आणि एकमेकांशी शांतीने रहा. आता बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा. आणि तुम्ही हे पाहा की, कोणी कोणाला वाईटाबद्दल वाईट असे भरून देऊ नये; पण तुमच्यात एकमेकांसाठी व सर्वसाठी जे चांगले आहे त्याच्या सतत मागे लागा. सदोदित आनंद करा. नित्य प्रार्थना करा. प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. पवित्र आत्म्याला विझवू नका. संदेशाचा उपहास करू नका. सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा. वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा. आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो. तुम्हास जो बोलवत आहे तो विश्वासू आहे; तो हे करीलच.
1 थेस्सल 5:11-24 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून तुम्ही आता जे करीत आहात त्याचप्रमाणे एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि एकमेकांची उन्नती करण्यासाठी झटा. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सांगतो की जे तुम्हामध्ये परिश्रम करतात, जे प्रभुमध्ये तुमची काळजी घेतात आणि तुम्हाला बोध करतात त्यांच्या मान राखा. त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतिने सर्वोच्च मान द्या एकमेकांबरोबर शांतीने राहा. बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की जे आळशी आणि लुडबूड करणारे आहेत त्यांना ताकीद द्या, जे निराश आहेत त्यांना उत्तेजन द्या, अशक्तांना आधार द्या, प्रत्येकाशी सहनशीलतेने वागा. कोणी वाईटाची फेड वाईटाने करीत नाही याची खात्री बाळगा, परंतु प्रत्येकाचे आणि सर्वांचे सर्वदा चांगले करण्यासाठी झटा. सर्वदा आनंदित राहा, निरंतर प्रार्थना करा, सर्व परिस्थितीत उपकारस्मरण करा, कारण ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा हीच आहे. पवित्र आत्म्याला विझवू नका. संदेशाला तुच्छ मानू नका. परंतु त्या सर्वांची परीक्षा करा; जे चांगले आहे ते धरून ठेवा, सर्वप्रकारच्या वाईटाचा निषेध करा. परमेश्वर स्वतः जे शांतीचे परमेश्वर आहेत, ते तुम्हाला परिपूर्ण पवित्र करो. आपले प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुमचा पूर्ण आत्मा, जीव आणि शरीर निर्दोष राखली जावोत. ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे ते विश्वासू आहेत, आणि ते करतीलच.
1 थेस्सल 5:11-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा; असे तुम्ही करतच आहात. बंधुजनहो, आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुमच्यावर असतात व तुम्हांला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा; आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसांत शांतीने राहा. बंधूंनो, आम्ही तुम्हांला बोध करतो की, अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. कोणी कोणाचे वाइटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत राहा. सर्वदा आनंदित असा; निरंतर प्रार्थना करा; सर्व स्थितीत उपकारस्तुती करा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका; संदेशांचा धिक्कार करू नका; सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा; वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शांतीचा देव स्वत: तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे; तो हे करीलच.
1 थेस्सल 5:11-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणून ज्याप्रमाणे आता तुम्ही करीत आहात, त्याप्रमाणे तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन द्या व एकमेकांची उभारणी करा. बंधुंजनहो, आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूवरील श्रद्धेपोटी तुमच्यावर अधिकार चालवितात व तुम्हांला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा; त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने सर्वोच्च मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा. बंधूंनो, आम्ही तुम्हांला आवाहन करतो की, आळशी लोकांना ताकीद द्या, जे अल्प धीराचे आहेत त्यांना धीर द्या. दुर्बलांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. कोणी कोणाचे वाइटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा; सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा. सर्वदा आनंद करा. निरंतर प्रार्थना करा. सर्व परिस्थितीत कृतज्ञ राहा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. पवित्र आत्म्याला विझवू नका. संदेष्ट्यांच्या शद्बांचा तिरस्कार करू नका. सर्व गोष्टींची पारख करा. चांगले ते घट्ट धरून ठेवा. वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शांतिदाता देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही संपूर्णपणे निर्दोष राखो. तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे, तो हे करील.