१ शमुवेल 22:6-19
१ शमुवेल 22:6-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यांचा शोध लागला असे शौलाने ऐकले. शौल तर रामातल्या गिब्यात एशेल झाडाखाली बसला होता; त्याचा भाला त्याच्या हातात होता व त्याचे सर्व चाकर उभे होते. तेव्हा शौल आपल्याजवळ जे आपले चाकर उभे होते त्यांना म्हणाला, “अहो बन्यामिनी लोकांनो ऐका हा इशायाचा मुलगा तुम्हा प्रत्येकाला शेते व द्राक्षमळे देणार आहे काय? तो तुम्हा सर्वांना हजाराचे व शंभराचे सरदार करणार आहे काय? म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर फितुरी करीत आहा आणि माझा मुलगा इशायाच्या मुलाशी करार करतो तेव्हा मला कोणी कळवीत नाही आणि तुम्हातला कोणी माझ्यासाठी दुखीत होत नाही आणि माझ्या मुलाने माझ्या चाकराला आजच्यासारखे माझ्यासाठी टपून बसायला चेतवले आहे हे कोणी मला कळवीत नाही.” मग दवेग अदोमी जो शौलाच्या चाकरांसोबत उभा होता, त्याने उत्तर देऊन म्हटले, “मी इशायाच्या मुलाला नोब येथे अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याच्याकडे येताना पाहिले; त्याने त्याच्यासाठी परमेश्वरास विचारले व त्यास अन्न दिले आणि गल्याथ पलिष्टी याची तलवार त्यास दिली.” तेव्हा राजाने अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याजक याला व त्याच्या वडिलाच्या सर्व घराण्यातले जे याजक नोब येथे होते त्यांना बोलवायला माणसे पाठवली आणि ते सर्व राजाकडे आले. तेव्हा शौलाने म्हटले, “अहीटूबाच्या मुला आता ऐक.” तो म्हणाला, “माझ्या प्रभू मी येथे आहे.” शौल त्यास म्हणाला, “तू आणि इशायाचा मुलगा अशा तुम्ही दोघांनी माझ्यावर फितुरी केली तू त्यास भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी देवापाशी विचारले यासाठी की, त्याने आजच्यासारखे माझ्यावर उठून माझ्यासाठी टपून बसावे?” तेव्हा अहीमलेखाने राजाला उत्तर देऊन म्हटले, “तुझ्या सर्व चाकरांमध्ये दावीदासारखा कोण विश्वासू आहे? तो राजाचा जावई आहे व एकांती तुझ्याजवळ मसलतीला येत असतो व तुझ्या घरात प्रतिष्ठीत आहे. आजच मी त्याच्यासाठी परमेश्वरास विचारू लागलो काय? असे करणे माझ्यापासून दूर असो; राजाने आपल्या दासास किंवा माझ्या वडिलाच्या घराण्यातील कोणाला अपराध लावू नये कारण या सर्वांतले अधिक उणे काहीच तुझ्या दासास ठाऊक नाही.” राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला खचित मरण पावले पाहिजे; तुला व तुझ्या वडिलाच्या घराण्यातील सर्वांना मरण पावले पाहिजे” मग राजा आपणाजवळ जे शिपाई उभे होते त्यांना म्हणाला, “परमेश्वराच्या याजकांच्या अंगावर जाऊन त्यांना मारा कारण त्यांनीही दावीदाचा पक्ष धरला आहे; आणि तो पळाला असे त्यांना कळले असता त्यांनी मला कळवले नाही.” परंतु राजाचे चाकर परमेश्वराच्या याजकांवर तुटून पडायला आपले हात पुढे करीनात. मग राजाने दवेगाला म्हटले, “तू याजकांच्या अंगावर चालून जा. तेव्हा दवेग अदोमी याजकांच्या अंगावर जाऊन तुटून पडला.” त्या दिवशी त्याने तागाचे एफोद नेसलेल्या पंच्याऐंशी मनुष्यांना जिवे मारले. त्याने याजकांचे नोब नगर याचा तलवारीच्या धारेने नाश केला; पुरुष स्त्रिया बालके व तान्ही बाळे, आणि गुरे, आणि गाढवे आणि मेंढरे ही त्याने तलवारीच्या धारेने जिवे मारली.
१ शमुवेल 22:6-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दाविदाचा व त्याच्याबरोबरच्या लोकांचा पत्ता लागला आहे असे शौलाने ऐकले; त्या वेळी तो गिबा येथे एका उच्च जागी चिंचेच्या झाडाखाली हातात आपला भाला घेऊन बसला होता व त्याचे सर्व सेवक त्याच्या सभोवती उभे होते. तेव्हा शौल आपल्या सभोवतालच्या सेवकांना म्हणाला, “बन्यामिनी लोकहो, ऐका; इशायाचा पुत्र तुम्हा सर्वांना शेते व द्राक्षांचे मळे देणार आहे काय आणि तो तुम्हा सर्वांना सहस्रपती व शतपती करणार आहे काय, म्हणून तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध कट केला असून माझ्या पुत्राने इशायाच्या पुत्राशी करार केल्याचे कोणी माझ्या कानावर घातले नाही? आज माझ्या पुत्राने माझ्या नोकराला माझा घात करण्यासाठी टपून बसायला चिथावले असून मला कोणी कळवले नाही व माझ्याबद्दल कोणास वाईटही वाटले नाही ना?” तेव्हा शौलाच्या नोकरांवर नेमलेला दवेग अदोमी म्हणाला, “मी इशायाच्या पुत्राला नोब येथे अहिटूबाचा पुत्र अहीमलेख ह्याच्याकडे येताना पाहिले. त्याने त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रश्न केला, त्याला अन्नसामग्री पुरवली आणि गल्याथ पलिष्ट्याची तलवार त्याला दिली.” तेव्हा राजाने अहिटूबाचा पुत्र अहीमलेख याजक ह्याला आणि त्याच्या बापाच्या घराण्यातील सर्व माणसे म्हणजे नोब येथे राहणारे सर्व याजक ह्यांना बोलावणे पाठवले; तेव्हा ते सर्व राजाकडे आले. शौल म्हणाला, “अहीटूबपुत्रा, ऐक;” तो म्हणाला, “आज्ञा महाराज.” शौल त्याला म्हणाला, “तू व इशायाचा पुत्र अशा तुम्ही दोघांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे; तू त्याला भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी तू देवाकडे प्रश्न केला व त्यामुळे तो आज माझ्याविरुद्ध उठून माझा घात करू पाहत आहे ह्याचे काय कारण?” अहिमलेखाने राजाला उत्तर केले, “आपल्या सर्व सेवकांमध्ये दाविदासारखा विश्वासू कोण आहे? तो तर राजाचा जावई असून आपल्या मंत्रीमंडळातला आहे, दरबारात त्याची मोठी प्रतिष्ठा आहे. मी काय आजच पहिल्याने त्याच्यासाठी देवाकडे प्रश्न करू लागलो काय? असे माझ्याकडून न घडो; राजाने आपल्या ह्या सेवकाला आणि माझ्या बापाच्या सर्व घराण्याला असा बट्टा लावू नये; कारण ह्या प्रकरणी आपल्या दासाला अधिकउणे काहीच माहीत नाही.” राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला व तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वांना अवश्य मेले पाहिजे.” तेव्हा जवळ प्यादे उभे होते त्यांना राजा म्हणाला, “चला, परमेश्वराच्या याजकांचा वध करा; कारण त्यांनी दाविदाशी हातमिळवणी केली आहे; तो पळून गेला हे त्यांना ठाऊक असूनही त्यांनी माझ्या कानावर घातले नाही;” पण परमेश्वराच्या याजकांवर राजाचे सेवक आपला हात टाकीनात. तेव्हा राजा दवेगास म्हणाला, “चल, तू जाऊन त्या याजकांवर तुटून पड.” तेव्हा अदोमी दवेग याजकांवर तुटून पडला. त्या दिवशी सणाचे एफोद धारण करणार्या पंचाऐंशी पुरुषांचा त्याने वध केला. नोबावर तलवार चालवून पुरुष व स्त्रिया, मुले व तान्ही बाळे, बैल, गाढवे व मेंढरे ह्या सर्वांची त्याने कत्तल केली.