१ शमुवेल 22
22
1दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल्लामाच्या गुहेत गेला; हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याच्याकडे गेली.
2विपन्न, कर्जबाजारी व जिवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले, तो त्यांचा नायक झाला; सुमारे चारशे पुरुष त्याच्याजवळ जमले.
3तेथून दावीद मवाबातील मिस्पे येथे जाऊन मवाबाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर माझे काय करणार हे मला समजेपर्यंत माझ्या आईबापांना येऊन तुमच्याजवळ राहू द्या.”
4त्याने त्यांना मवाबाच्या राजासमोर आणले; दावीद तेथल्या गढीत राहत होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले.
5गाद संदेष्टा दाविदाला म्हणाला, “गढीत राहू नकोस, तेथून निघून यहूदा देशात जा.” तेव्हा दावीद तेथून निघून हरेथ नामक वनात गेला. नोब येथील याजकांचा शौल वध करतो 6दाविदाचा व त्याच्याबरोबरच्या लोकांचा पत्ता लागला आहे असे शौलाने ऐकले; त्या वेळी तो गिबा येथे एका उच्च जागी चिंचेच्या झाडाखाली हातात आपला भाला घेऊन बसला होता व त्याचे सर्व सेवक त्याच्या सभोवती उभे होते.
7तेव्हा शौल आपल्या सभोवतालच्या सेवकांना म्हणाला, “बन्यामिनी लोकहो, ऐका; इशायाचा पुत्र तुम्हा सर्वांना शेते व द्राक्षांचे मळे देणार आहे काय आणि तो तुम्हा सर्वांना सहस्रपती व शतपती करणार आहे काय,
8म्हणून तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध कट केला असून माझ्या पुत्राने इशायाच्या पुत्राशी करार केल्याचे कोणी माझ्या कानावर घातले नाही? आज माझ्या पुत्राने माझ्या नोकराला माझा घात करण्यासाठी टपून बसायला चिथावले असून मला कोणी कळवले नाही व माझ्याबद्दल कोणास वाईटही वाटले नाही ना?”
9तेव्हा शौलाच्या नोकरांवर नेमलेला दवेग अदोमी म्हणाला, “मी इशायाच्या पुत्राला नोब येथे अहिटूबाचा पुत्र अहीमलेख ह्याच्याकडे येताना पाहिले.
10त्याने त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रश्न केला, त्याला अन्नसामग्री पुरवली आणि गल्याथ पलिष्ट्याची तलवार त्याला दिली.”
11तेव्हा राजाने अहिटूबाचा पुत्र अहीमलेख याजक ह्याला आणि त्याच्या बापाच्या घराण्यातील सर्व माणसे म्हणजे नोब येथे राहणारे सर्व याजक ह्यांना बोलावणे पाठवले; तेव्हा ते सर्व राजाकडे आले.
12शौल म्हणाला, “अहीटूबपुत्रा, ऐक;” तो म्हणाला, “आज्ञा महाराज.”
13शौल त्याला म्हणाला, “तू व इशायाचा पुत्र अशा तुम्ही दोघांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे; तू त्याला भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी तू देवाकडे प्रश्न केला व त्यामुळे तो आज माझ्याविरुद्ध उठून माझा घात करू पाहत आहे ह्याचे काय कारण?”
14अहिमलेखाने राजाला उत्तर केले, “आपल्या सर्व सेवकांमध्ये दाविदासारखा विश्वासू कोण आहे? तो तर राजाचा जावई असून आपल्या मंत्रीमंडळातला आहे, दरबारात त्याची मोठी प्रतिष्ठा आहे.
15मी काय आजच पहिल्याने त्याच्यासाठी देवाकडे प्रश्न करू लागलो काय? असे माझ्याकडून न घडो; राजाने आपल्या ह्या सेवकाला आणि माझ्या बापाच्या सर्व घराण्याला असा बट्टा लावू नये; कारण ह्या प्रकरणी आपल्या दासाला अधिकउणे काहीच माहीत नाही.”
16राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला व तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वांना अवश्य मेले पाहिजे.”
17तेव्हा जवळ प्यादे उभे होते त्यांना राजा म्हणाला, “चला, परमेश्वराच्या याजकांचा वध करा; कारण त्यांनी दाविदाशी हातमिळवणी केली आहे; तो पळून गेला हे त्यांना ठाऊक असूनही त्यांनी माझ्या कानावर घातले नाही;” पण परमेश्वराच्या याजकांवर राजाचे सेवक आपला हात टाकीनात.
18तेव्हा राजा दवेगास म्हणाला, “चल, तू जाऊन त्या याजकांवर तुटून पड.” तेव्हा अदोमी दवेग याजकांवर तुटून पडला. त्या दिवशी सणाचे एफोद धारण करणार्या पंचाऐंशी पुरुषांचा त्याने वध केला.
19नोबावर तलवार चालवून पुरुष व स्त्रिया, मुले व तान्ही बाळे, बैल, गाढवे व मेंढरे ह्या सर्वांची त्याने कत्तल केली.
20तरीपण अहीटूबपुत्र अहीमलेख ह्याच्या पुत्रांपैकी अब्याथार नावाचा एक पुत्र निभावून दाविदाकडे पळून गेला.
21शौलाने परमेश्वराच्या याजकांचा वध केला हे वर्तमान अब्याथाराने दाविदाला सांगितले.
22दावीद अब्याथारास म्हणाला, “ज्या दिवशी अदोमी दवेग तेथे होता त्याच दिवशी मी ताडले की हा निश्चितच शौलाला सांगेल; तुझ्या बापाच्या घराण्यातल्या सर्व माणसांच्या मरणास मी कारण झालो आहे.
23भिऊ नकोस, माझ्याबरोबर राहा, कारण जो तुझा जीव घ्यायला पाहत आहत आहे, तो माझाही जीव घ्यायला पाहत आहे; माझ्याजवळ तू सुरक्षित राहशील.”
सध्या निवडलेले:
१ शमुवेल 22: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.