१ शमुवेल 18:5-16
१ शमुवेल 18:5-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा शौल दावीदाला जेथे जेथे पाठवी तेथे तेथे तो चतुराईने वागत असे. शौलाने त्यास लढाईच्या मनुष्यांवर नेमिले आणि तो शौलाच्या चाकराच्या दृष्टीतही तो मान्य झाला. मग असे झाले की, ते त्या पलिष्ट्याला मारून माघारी आले, तेव्हा स्त्रिया इस्राएलच्या सर्व नगरातून गात व नाचत, डफ व झांज वाजवीत शौल राजाची भेट घ्यावयास निघाल्या. त्या स्त्रिया नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे गात होत्या की, “शौलाने हजारास मारले आणि दावीदाने दहा हजारास मारले.” तेव्हा शौलला फार राग आला, आणि त्या गाण्याने त्यास वाईट वाटून त्याने म्हटले, “त्यांनी दावीदाला दहा हजारचे यश दिले आणि मला मात्र हजाराचे यश दिले. राज्याशिवाय त्यास आणखी काय अधिक मिळवायचे राहिले?” त्या दिवसापासून पुढे शौल दावीदाकडे संशयाने पाहू लागला. मग दुसऱ्या दिवशी असे झाले; देवापासून दुष्ट आत्मा शौलावर जोराने आला तेव्हा तो घरात बडबडत होता. म्हणून दावीद रोजच्याप्रमाणे आपल्या हाताने वाद्य वाजवीत होता. शौलाच्या हाती त्याचा भाला होता. तेव्हा शौलाने भाला मारण्यासाठी उगारला कारण त्याने म्हटले, “मी दावीदाला मारून भिंतीशी खिळीन.” परंतु दावीद त्याच्या समोरून दोनदा निसटून गेला. मग शौल दावीदाचे भय धरू लागला, कारण परमेश्वर शौलाला सोडून दावीदाच्या बरोबर होता. शौलाने त्यास आपल्यापासून दूर करून त्यास आपल्या हजारांचा सरदार करून ठेवले. दावीद लोकांच्या देखत आत बाहेर जात येत असे. दावीदाची त्याच्या सर्व मार्गात भरभराट झाली, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता. जेव्हा शौलाने बघितले त्याची भरभराट झाली आहे, तेव्हा त्यास त्याचा धाक बसला. परंतु सर्व इस्राएली आणि यहूदी दावीदावर प्रीती करीत होते, कारण की तो त्यांच्यादेखत आत बाहेर जात येत असे.
१ शमुवेल 18:5-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जिकडे जिकडे शौल दाविदाला पाठवी, तिकडे तिकडे जाऊन तो चतुराईने कार्यसिद्धी करी; शौलाने त्याला योद्ध्यांवर नेमले. हे सर्व लोकांना पसंत पडले; तसेच शौलाच्या सेवकांनाही ते पसंत पडले. त्या पलिष्ट्याचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता इस्राएलाच्या सर्व नगरांतून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ व झांजा वाजवून मोठ्या आनंदाने गात व नाचत शौल राजाला सामोर्या आल्या. नृत्य करणार्या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत : “शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले.” हे ऐकून शौलाला फार क्रोध आला; हे त्यांचे शब्द त्याला आवडले नाहीत; तो म्हणाला, “त्यांनी दाविदाला लाखांचे यश दिले व मला केवळ हजारांचे यश दिले; राज्यावाचून त्याला आणखी काय मिळायचे राहिले?” त्या दिवसापासून पुढे शौलाने दाविदावर डोळा ठेवला. दुसर्या दिवशी शौलाच्या ठायी देवाकडील दुरात्मा जोराने संचरला, व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला; दावीद आपल्या नित्यक्रमाप्रमाणे वीणा वाजवत होता; आणि शौलाच्या हाती भाला होता. शौलाने त्याला मारायला भाला उगारला; तो म्हणाला की, “भाला मारून दाविदाला भिंतीशी खिळावे;” पण दाविदाने त्याच्यासमोरून एकीकडे सरकून त्याला दोनदा चुकवले. परमेश्वर दाविदाच्या बरोबर होता व त्याने शौलाला सोडले होते, ह्यामुळे दावीद शौलाला भीत असे. मग शौलाने दाविदाला आपल्यापासून दूर करून सहस्रपती नेमले; तो लोकांच्या पुढे चालत असे. दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीस नेत असे, आणि परमेश्वर त्याच्याबरोबर असे. दावीद मोठ्या चतुराईने कार्यसिद्धी करत असतो हे पाहून शौलाला त्याचा धाक वाटू लागला; तरीपण सगळे इस्राएल व यहूदी दाविदावर प्रेम करीत. कारण तो त्यांच्यापुढे चालत असे.