YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमु. 18:5-16

1 शमु. 18:5-16 IRVMAR

तेव्हा शौल दावीदाला जेथे जेथे पाठवी तेथे तेथे तो चतुराईने वागत असे. शौलाने त्यास लढाईच्या मनुष्यांवर नेमिले आणि तो शौलाच्या चाकराच्या दृष्टीतही तो मान्य झाला. मग असे झाले की, ते त्या पलिष्ट्याला मारून माघारी आले, तेव्हा स्त्रिया इस्राएलच्या सर्व नगरातून गात व नाचत, डफ व झांज वाजवीत शौल राजाची भेट घ्यावयास निघाल्या. त्या स्त्रिया नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे गात होत्या की, “शौलाने हजारास मारले आणि दावीदाने दहा हजारास मारले.” तेव्हा शौलला फार राग आला, आणि त्या गाण्याने त्यास वाईट वाटून त्याने म्हटले, “त्यांनी दावीदाला दहा हजारचे यश दिले आणि मला मात्र हजाराचे यश दिले. राज्याशिवाय त्यास आणखी काय अधिक मिळवायचे राहिले?” त्या दिवसापासून पुढे शौल दावीदाकडे संशयाने पाहू लागला. मग दुसऱ्या दिवशी असे झाले; देवापासून दुष्ट आत्मा शौलावर जोराने आला तेव्हा तो घरात बडबडत होता. म्हणून दावीद रोजच्याप्रमाणे आपल्या हाताने वाद्य वाजवीत होता. शौलाच्या हाती त्याचा भाला होता. तेव्हा शौलाने भाला मारण्यासाठी उगारला कारण त्याने म्हटले, “मी दावीदाला मारून भिंतीशी खिळीन.” परंतु दावीद त्याच्या समोरून दोनदा निसटून गेला. मग शौल दावीदाचे भय धरू लागला, कारण परमेश्वर शौलाला सोडून दावीदाच्या बरोबर होता. शौलाने त्यास आपल्यापासून दूर करून त्यास आपल्या हजारांचा सरदार करून ठेवले. दावीद लोकांच्या देखत आत बाहेर जात येत असे. दावीदाची त्याच्या सर्व मार्गात भरभराट झाली, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता. जेव्हा शौलाने बघितले त्याची भरभराट झाली आहे, तेव्हा त्यास त्याचा धाक बसला. परंतु सर्व इस्राएली आणि यहूदी दावीदावर प्रीती करीत होते, कारण की तो त्यांच्यादेखत आत बाहेर जात येत असे.