१ शमुवेल 16:5-13
१ शमुवेल 16:5-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने म्हटले, “शांतीने; मी परमेश्वरास यज्ञ अर्पण करायास आलो आहे. मजबरोबर यज्ञास येण्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा.” त्याने इशाय व त्याचे पुत्र यांना शुद्ध केल्यावर त्यांना यज्ञास बोलाविले. ते आले तेव्हा असे झाले कि, त्याने अलियाबास पाहून स्वतःला म्हटले, “परमेश्वराचा अभिषिक्त निःसंशय हाच आहे.” परंतु परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “की त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको कारण मी त्यास नाकारीले आहे. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. कारण की, मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो.” मग इशायाने अबीनादाबाला बोलाविले आणि त्यास शमुवेलापुढे चालविले. परंतु शामुवेलाने म्हटले, “यालाही परमेश्वराने निवडले नाही.” मग इशायने शम्मास पुढे चालविले. परंतु शमुवेलाने म्हटले. “ह्यालाही परमेश्वराने निवडले नाही.” असे इशायाने आपल्या सात पुत्रांना शमुवेलापुढे चालविले. “परंतु शमुवेलाने इशायला म्हटले, यांपैकी कोणालाच परमेश्वराने निवडले नाही.” तेव्हा शमुवेलाने इशायला म्हटले, “तुझे सर्व पुत्र आले आहेत का?” मग तो म्हणाला, “आणखी एक धाकटा आहे, तो राहिला आहे. तो मेंढरे राखीत आहे.” तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले. “त्याला येथे बोलावून आण त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही.” मग त्याने त्यास बोलावून आणले तो तांबूस रंगाचा आणि सुंदर डोळ्यांचा होता आणि त्याचे रुप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, “उठून ह्याला अभिषेक कर; कारण हाच तो आहे.” मग शमूवेलाने तेलाचे शींग घेऊन त्याच्या भावांच्यामध्ये त्यास अभिषेक केला. त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दावीदावर येऊन राहिला. त्यानंतर शमुवेल उठून रामा येथे गेला.
१ शमुवेल 16:5-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो म्हणाला, “मी स्नेहभावाने आलो आहे; मी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन माझ्याबरोबर यज्ञाला या.” त्याने इशाय व त्याचे पुत्र ह्यांना पवित्र होऊन यज्ञाला येण्याचे आमंत्रण दिले. ते आले तेव्हा त्याने अलीयाबास न्याहाळून पाहून म्हटले, “परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय.” पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.” मग इशायाने अबीनादाबास बोलावून शमुवेलापुढून चालवले; पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वराला हाही पसंत नाही.” मग इशायाने शाम्मा ह्याला त्याच्यापुढून चालवले; पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वराला हाही पसंत नाही.” ह्या प्रकारे इशायाने आपले सात पुत्र शमुवेलापुढून चालवले. शमुवेलाने इशायाला म्हटले, “ह्यांतला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. शमुवेलाने इशायाला विचारले, “तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय?” तो म्हणाला, “एक सर्वांत धाकटा राहिला आहे; पण पाहा, तो शेरडेमेंढरे राखत आहे.” तेव्हा शमुवेल इशायाला म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही.” त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ऊठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे.” मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला; आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमुवेल उठून रामास गेला.