१ शमुवेल 15:17-22
१ शमुवेल 15:17-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्राएलाच्या वंशांचा मुख्य करण्यात आले नाही काय? आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राजा केले” परमेश्वराने तुला तुझ्या मार्गावर पाठवून सांगितले की, जा त्या पापी अमालेक्यांचा नाश कर. ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याशी लढाई कर. तर मग तू परमेश्वराचे वचन का पाळले नाही? तू तर लुट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले? तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला, “मी परमेश्वराचे वचन खरोखरच पाळले व ज्या मार्गावर परमेश्वराने मला पाठवले त्यामध्ये मी चाललो आणि अमालेक्यांचा नाश करून अमालेकाचा राजा अगाग याला मी घेऊन आलो आहे. परंतु ज्यांचा नाश करायचा होता अशी जी लुटीची मेंढरे व गुरे त्यातली उत्तम ती लोकांनी परमेश्वर तुझा देव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठी ठेवून घेतली.” शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.
१ शमुवेल 15:17-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शमुवेल म्हणाले, “एकेकाळी तू आपल्याच दृष्टीने लहान होतास, तरी इस्राएलच्या गोत्रांचा पुढारी तू झाला नाहीस काय? याहवेहने तुला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला. आणि याहवेहने तुला एका कामगिरीवर पाठवित म्हटले, ‘जा आणि त्या दुष्ट अमालेक्यांचा पूर्णपणे नाश कर, ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याविरुद्ध युद्ध कर.’ तू याहवेहच्या आज्ञेचे पालन का केले नाहीस? लुटीवर झडप घालून तू याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस?” शौल शमुवेलला म्हणाला, “पण मी याहवेहचे आज्ञापालन केले, याहवेहने मला दिलेल्या कामगिरीवर मी गेलो, अमालेक्यांचा मी पूर्णपणे नाश केला आणि अगाग त्यांचा राजा याला मी घेऊन आलो. सैनिकांनी त्या लुटीतील मेंढरे व गुरे घेतली व त्यातील जे उत्तम ते गिलगालात याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यासाठी यज्ञ करावे म्हणून राखून ठेवली आहेत.” परंतु शमुवेलने उत्तर दिले: “त्यांच्या आज्ञा पाळल्याने याहवेहला जितका होतो तितका आनंद होमार्पणे व यज्ञांनी होईल काय? यज्ञापेक्षा आज्ञापालन चांगले, आणि एडक्याच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.
१ शमुवेल 15:17-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास तरी तुला इस्राएली कुळांचा नायक केले ना? आणि तू इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना?” मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की, ‘जा, त्या पापी अमालेक्यांचा सर्वस्वी संहार कर, आणि ते नष्ट होत तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध कर.’ असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाहीस? तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस?” शौल शमुवेलाला म्हणाला, “मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे; परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेक्यांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग ह्याला घेऊन आलो आहे. पण ज्या लुटीचा नाश करायचा होता तिच्यातून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर ह्याला गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहेत.” तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.