YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 14:1-23

१ शमुवेल 14:1-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

एके दिवशी असे झाले की, शौलाचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुणाला म्हणाला, “चल आपण पलिष्ट्यांचे ठाणे जे पलीकडे आहे त्याकडे जाऊ.” परंतु त्याने आपल्या बापाला हे सांगितले नाही. शौल गिब्याच्या शेवटल्या भागी मिग्रोनांत डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता त्याच्याजवळचे लोक सुमारे सहाशे होते; एलीचा मुलगा फिनहास याचा मुलगा ईखाबोद याचा भाऊ अहीटूब याचा मुलगा अहीया शिलोत एफोद घातलेला परमेश्वराचा याजक हाही होता. तेव्हा योनाथान गेला हे लोकांस माहित नव्हते. योनाथान ज्या घाटांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यावर जाण्यास पाहत होता त्याच्या एका बाजूला खडकाळ शिखर व दुसऱ्या बाजूला खडकाळ शिखर होते; त्यातल्या एकाचे नांव बोसेस व दुसऱ्याचे नांव सेने असे होते. एक शिखर उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरे दक्षिणेकडे गिब्यासमोर उभे होते. योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुंत्यांच्या ठाण्यावर जाऊ. कदाचित परमेश्वर आमच्यासाठी कार्य करील; कारण बहुतांनी किंवा थोडक्यांनी सोडायला परमेश्वरास काही अडचण नाही.” त्याचा शस्त्रवाहक त्यास म्हणाला, “जे तुझ्या मनात आहे ते सगळे कर. तू पुढे जा, पाहा तुझ्या आज्ञा पालन करण्यास मी तुझ्याबरोबर आहे.” तेव्हा योनाथान म्हणाला, “पाहा आपण त्या मनुष्याकडे जाऊन त्यास प्रगट होऊ. जर ते आम्हास म्हणतील, ‘आम्ही तुम्हाकडे येऊ तोपर्यंत थांबा,’ तर आम्ही आपल्या ठिकाणी उभे राहू वर त्याच्याकडे जाणार नाही; परंतु जर ते म्हणतील की, ‘वर आम्हाकडे या,’ तर आम्ही वर जाऊ; कारण परमेश्वराने त्यांना आमच्या हाती दिले आहे. हेच आम्हांला चिन्ह होईल.” मग त्या दोघांनी आपणांला पलिष्ट्यांच्या ठाण्यातील मनुष्यांना प्रगट केले. पलिष्ट्यांनी म्हटले, “पाहा ज्या गुहांमध्ये इब्री लपले होते त्यातून ते निघून येत आहेत.” ठाण्याच्या मनुष्यांनी योनाथान व त्याचा शस्त्रवाहक यांना उत्तर देऊन म्हटले, “वर आम्हाकडे या म्हणजे आम्ही तुम्हास काही गोष्टी दाखवू.” तेव्हा योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “माझ्यामागे वर ये; कारण परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले आहे.” मग योनाथान आपल्या हातांनी व आपल्या पायांनी चढून गेला आणि त्याचा शस्त्रवाहक त्याच्या मागोमाग चढून गेला. तेव्हा योनाथानासमोर पलिष्टी पडले व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक त्यांना मारीत गेला. जो पहिला वध योनाथानाने केला त्यामध्ये एक बिघा भूमीवर सुमारे वीस माणसे पडली. छावणीत शेतात व सर्व लोकांमध्ये कंप झाला, ते ठाणे व छापे मारणारेही कापले व भूमी कापली. तेथे तर फार घबराट पसरली होती. तेव्हा बन्यामिनातील गिब्यांतल्या शौलाच्या पहारेकऱ्यांनी पाहिले की पलिष्टी सैन्याचा जमाव पांगत आहे आणि ते इकडे तिकडे पळत आहेत. मग शौल आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “आमच्यामधून कोण गेला आहे? मोजून पाहा.” मग त्यांनी मोजून पाहिले तर योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तेथे नव्हते. शौलाने अहीयाला म्हटले, “देवाचा कोश इकडे आण.” कारण त्या वेळी देवाचा कोश इस्राएल लोकांच्यामध्ये होता. असे झाले की शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीतला गलबला वाढत वाढत मोठा झाला. तेव्हा शौलाने याजकाला म्हटले, “आपला हात काढून घे.” तेव्हा शौल व त्याच्याजवळ ते सर्व लोक जमून लढाईला गेले. आणि पाहा प्रत्येक पलिष्टी मनुष्याची तलवार आपल्या सोबत्याच्या विरूद्ध झाली म्हणून फार मोठी दाणादाण उडाली. तेव्हा जे इब्री पूर्वी पलिष्ट्याच्यामध्ये राहिले होते जे चहूकडून त्याच्याबरोबर छावणीत गेले होते तेही शौल व योनाथान याच्याबरोबर जे इस्राएल होते त्याच्याशी मिळाले. जी इस्राएली माणसे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशांत लपली होती ती सर्व पलिष्टी पळत आहेत हे ऐकून लढाईत त्याच्या पाठीस लागली. असे परमेश्वराने त्यादिवशी इस्राएलास सोडवले आणि लढाई बेथ-आवेनाकडे गेली.

सामायिक करा
१ शमुवेल 14 वाचा

१ शमुवेल 14:1-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणाला, “चल, आपण पलीकडे पलिष्ट्यांचे ठाणे आहे तेथे जाऊ.” पण त्याने हे बापाला कळवले नाही. शौल गिब्याच्या सीमेवर मिग्रोन येथील डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता व त्याच्याबरोबर सुमारे सहाशे लोक होते; अहीया बिन अहीटूब (ईखाबोदाचा भाऊ) बिन फिनहास बिन एली शिलोत परमेश्वराचा याजक होता; तो एफोद धारण करून त्याच्याबरोबर होता. योनाथान गेला हे लोकांना माहीत नव्हते. ज्या घाटांनी योनाथान पलिष्ट्यांच्या छावणीकडे जाऊ पाहत होता त्यांच्या एका बाजूला एक व दुसर्‍या बाजूला एक असे दोन सुळके होते; एका सुळक्याचे नाव बोसेस व दुसर्‍याचे नाव सेने असे होते. एक सुळका उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरा दक्षिणेस गिब्यासमोर आहे. तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हटले, “चल, आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ; कदाचित परमेश्वर आपले कार्य करील; परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास अडचण नाही.” त्याच्या शस्त्रवाहकाने त्याला म्हटले, “आपल्या मनाला येईल ते सगळे करा, तेथे चला; आपल्या मर्जीप्रमाणे मी आपल्याबरोबर आहे.” योनाथान म्हणाला, “पाहा, आपण त्या माणसांजवळ जाऊन त्यांच्या दृष्टीस पडू. ते जर आपल्याला म्हणाले की, ‘थांबा, आम्ही तुमच्याकडे येतो,’ तर आपण जागच्या जागी थांबू, त्यांच्याकडे वर जाणार नाही; पण जर ते म्हणाले, ‘आमच्याकडे वर या,’ तर आपण वर जाऊ; परमेश्वराने त्यांना आपल्या हाती दिले आहे ह्याची हीच खूण आपण समजू.” मग ते दोघे पलिष्ट्यांच्या ठाण्यातील माणसांच्या दृष्टीसमोर गेले; तेव्हा पलिष्टी म्हणाले, “पाहा, इब्री लोक बिळात लपून राहिले होते ते आता बाहेर पडत आहेत.” त्या ठाण्यातले लोक योनाथानाला व त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाले, “तुम्ही आमच्याकडे या, म्हणजे आम्ही तुम्हांला काही दाखवू.” योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “माझ्यामागून वर ये; कारण परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले आहे.” योनाथान व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक हे मेटाकुटीने वर चढले. योनाथानापुढे पलिष्टी लोक चीत झाले व त्याच्या शस्त्रवाहकाने त्याच्या मागून जाऊन त्यांचा संहार केला. योनाथान व त्याचा शस्त्रवाहक ह्यांनी जी पहिली कत्तल केली तींत एक बिघाभर जमिनीवर सुमारे वीस माणसे पडली. मग छावणीतील व मैदानातील इतर सर्व लोकांचा थरकाप झाला; ठाण्यातील लष्कर व लूट करणारे लोक हेही थरथरा कापू लागले; भूमीही कंपायमान झाली; ह्या प्रकारे प्रचंड कंप झाला. इकडे बन्यामिनाच्या गिब्यातल्या शौलाच्या पहारेकर्‍यांनी पाहिले तेव्हा लोकसमुदाय पांगला व लोक सैरावैरा धावू लागले. तेव्हा शौलाने आपल्याबरोबरच्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची मोजणी करून त्यांच्यामधून कोण गेले ते पाहा.” त्यांनी मोजणी केली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक हे नव्हते. मग शौल अहीयाला म्हणाला, “देवाचा कोश इकडे आण.” देवाचा कोश त्या समयी इस्राएल लोकांबरोबरच होता. शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीत गलबला वाढत चालला, तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “आपला हात आवर.” मग शौल व त्याच्याबरोबरचे सर्व लोक एकत्र जमून लढाईला गेले; तेव्हा प्रत्येकाची तलवार त्याच्या-त्याच्या सोबत्यावर चालून ते पराकाष्ठेचे घाबरून गेले. तेव्हा जे इब्री पूर्वीपासून पलिष्ट्यांबरोबर होते व जे चोहोकडून त्यांच्या छावणीला येऊन मिळाले होते तेही शौल व योनाथान ह्यांच्याबरोबर असलेल्या इस्राएल लोकांना येऊन मिळाले. तसेच जे इस्राएल लोक एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात लपून राहिले होते त्यांनी जेव्हा ऐकले की, पलिष्टी लोक पळत आहेत तेव्हा त्यांनीही त्यांच्याशी लढून त्यांचा जबर पिच्छा पुरवला. ह्या प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी इस्राएल लोकांचा बचाव केला आणि ते लढत लढत पलीकडे बेथ-आवेनापर्यंत गेले.

सामायिक करा
१ शमुवेल 14 वाचा