एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणाला, “चल, आपण पलीकडे पलिष्ट्यांचे ठाणे आहे तेथे जाऊ.” पण त्याने हे बापाला कळवले नाही. शौल गिब्याच्या सीमेवर मिग्रोन येथील डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता व त्याच्याबरोबर सुमारे सहाशे लोक होते; अहीया बिन अहीटूब (ईखाबोदाचा भाऊ) बिन फिनहास बिन एली शिलोत परमेश्वराचा याजक होता; तो एफोद धारण करून त्याच्याबरोबर होता. योनाथान गेला हे लोकांना माहीत नव्हते. ज्या घाटांनी योनाथान पलिष्ट्यांच्या छावणीकडे जाऊ पाहत होता त्यांच्या एका बाजूला एक व दुसर्या बाजूला एक असे दोन सुळके होते; एका सुळक्याचे नाव बोसेस व दुसर्याचे नाव सेने असे होते. एक सुळका उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरा दक्षिणेस गिब्यासमोर आहे. तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हटले, “चल, आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ; कदाचित परमेश्वर आपले कार्य करील; परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास अडचण नाही.” त्याच्या शस्त्रवाहकाने त्याला म्हटले, “आपल्या मनाला येईल ते सगळे करा, तेथे चला; आपल्या मर्जीप्रमाणे मी आपल्याबरोबर आहे.” योनाथान म्हणाला, “पाहा, आपण त्या माणसांजवळ जाऊन त्यांच्या दृष्टीस पडू. ते जर आपल्याला म्हणाले की, ‘थांबा, आम्ही तुमच्याकडे येतो,’ तर आपण जागच्या जागी थांबू, त्यांच्याकडे वर जाणार नाही; पण जर ते म्हणाले, ‘आमच्याकडे वर या,’ तर आपण वर जाऊ; परमेश्वराने त्यांना आपल्या हाती दिले आहे ह्याची हीच खूण आपण समजू.” मग ते दोघे पलिष्ट्यांच्या ठाण्यातील माणसांच्या दृष्टीसमोर गेले; तेव्हा पलिष्टी म्हणाले, “पाहा, इब्री लोक बिळात लपून राहिले होते ते आता बाहेर पडत आहेत.” त्या ठाण्यातले लोक योनाथानाला व त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाले, “तुम्ही आमच्याकडे या, म्हणजे आम्ही तुम्हांला काही दाखवू.” योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “माझ्यामागून वर ये; कारण परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले आहे.” योनाथान व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक हे मेटाकुटीने वर चढले. योनाथानापुढे पलिष्टी लोक चीत झाले व त्याच्या शस्त्रवाहकाने त्याच्या मागून जाऊन त्यांचा संहार केला. योनाथान व त्याचा शस्त्रवाहक ह्यांनी जी पहिली कत्तल केली तींत एक बिघाभर जमिनीवर सुमारे वीस माणसे पडली. मग छावणीतील व मैदानातील इतर सर्व लोकांचा थरकाप झाला; ठाण्यातील लष्कर व लूट करणारे लोक हेही थरथरा कापू लागले; भूमीही कंपायमान झाली; ह्या प्रकारे प्रचंड कंप झाला. इकडे बन्यामिनाच्या गिब्यातल्या शौलाच्या पहारेकर्यांनी पाहिले तेव्हा लोकसमुदाय पांगला व लोक सैरावैरा धावू लागले. तेव्हा शौलाने आपल्याबरोबरच्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची मोजणी करून त्यांच्यामधून कोण गेले ते पाहा.” त्यांनी मोजणी केली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक हे नव्हते. मग शौल अहीयाला म्हणाला, “देवाचा कोश इकडे आण.” देवाचा कोश त्या समयी इस्राएल लोकांबरोबरच होता. शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीत गलबला वाढत चालला, तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “आपला हात आवर.” मग शौल व त्याच्याबरोबरचे सर्व लोक एकत्र जमून लढाईला गेले; तेव्हा प्रत्येकाची तलवार त्याच्या-त्याच्या सोबत्यावर चालून ते पराकाष्ठेचे घाबरून गेले. तेव्हा जे इब्री पूर्वीपासून पलिष्ट्यांबरोबर होते व जे चोहोकडून त्यांच्या छावणीला येऊन मिळाले होते तेही शौल व योनाथान ह्यांच्याबरोबर असलेल्या इस्राएल लोकांना येऊन मिळाले. तसेच जे इस्राएल लोक एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात लपून राहिले होते त्यांनी जेव्हा ऐकले की, पलिष्टी लोक पळत आहेत तेव्हा त्यांनीही त्यांच्याशी लढून त्यांचा जबर पिच्छा पुरवला. ह्या प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी इस्राएल लोकांचा बचाव केला आणि ते लढत लढत पलीकडे बेथ-आवेनापर्यंत गेले.
१ शमुवेल 14 वाचा
ऐका १ शमुवेल 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 14:1-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ