१ शमुवेल 10:9-27
१ शमुवेल 10:9-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि असे झाले की, शमुवेलापासून जायला त्याने आपली पाठ फिरवल्यावर, परमेश्वराने त्यास दुसरे मन दिले. आणि ती सर्व चिन्हे त्याच दिवशी त्यास प्राप्त झाली. जेव्हा ते डोंगराजवळ आले, तेव्हा पाहा भविष्यवाद्यांचा गट त्यास भेटला आणि देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला व त्याच्यामध्ये तो भविष्यवाणी करू लागला. तेव्हा असे झाले की, ज्यांना पूर्वी त्याची ओळख होती, त्या सर्वांनी पाहिले की तो भविष्यवक्त्यांबरोबर भविष्यवाणी करत आहे, ते लोक एकमेकांना म्हणू लागले की, “कीशाच्या मुलाला हे काय झाले? शौल भविष्यवक्त्यांपैकी एक आहे काय?” तेव्हा त्या ठिकाणाचा कोणी एक उत्तर देऊन बोलला, “त्यांचा बाप कोण आहे?” यावरुन, अशी म्हण पडली की, शौलही भविष्यवाद्यांमध्ये आहे काय? भविष्यवाणी करणे समाप्त केल्यावर तो उंचस्थानाकडे आला. नंतर, शौलाचा काका त्यास व त्याच्या चाकराला म्हणाला, “तुम्ही कोठे गेला होता?” तो बोलला, “आम्ही गाढवांचा शोध करीत गेलो; ती नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलाकडे गेलो.” मग शौलाचा काका म्हणाला, “मी तुला विनंती करतो शमुवेल तुम्हाशी काय बोलला ते मला सांग.” तेव्हा शौल आपल्या काकाला म्हणाला, “गाढवे सापडली असे त्याने आम्हास उघड सांगितले.” परंतु राज्याविषयीची जी गोष्ट शमुवेल बोलला ती त्याने त्यास सांगितली नाही. मग शमुवेलाने लोकांस मिस्पा येथे परमेश्वराजवळ बोलावले. तेव्हा तो इस्राएलाच्या संतानाना म्हणाला, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो, मी मिसरातून इस्राएलास वर आणले, आणि मिसऱ्यांच्या हातातून व तुम्हास पीडणारी जी राज्ये त्या सर्वांच्या हातातून तुम्हास सोडवले. परंतु तुमचा परमेश्वर, जो स्वत: तुमच्या सर्व शत्रूपासून व तुमच्या संकटातून तुम्हास सोडवतो त्यास तुम्ही आज नाकारले; आणि आम्हांवर राजा नेमून ठेव, असे त्यास म्हटले. तर आता आपल्या वंशाप्रमाणे व आपल्या हजारांप्रमाणे परमेश्वराच्या समोर उभे राहा.” शमुवेलाने इस्राएलाचे सर्व वंश जवळ आणले, तेव्हा बन्यामिनाचा वंश निवडून घेण्यात आला. मग त्याने बन्यामिनाचा वंश त्यातील घराण्याप्रमाणे जवळ आणला; आणि मात्रीचे घराणे आणि कीशाचा मुलगा शौल निवडून घेण्यात आला. पण जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला तेव्हा तो सापडला नाही. मग त्यांनी परमेश्वरास आणखी विचारले की, “तो पुरुष इकडे फिरून येईल काय?” तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “पाहा तो सामानामध्ये लपला आहे.” मग त्यांनी धावत जाऊन त्यास तेथून आणले. तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता. तेव्हा शमुवेल सर्व लोकांस म्हणाला, “ज्याला परमेश्वराने निवडले त्यास तुम्ही पाहता काय? त्याच्यासारखा सर्व लोकात कोणी नाही!” सर्व लोक ओरडून म्हणाले, “राजा दीर्घायुषी होवो!” तेव्हा शमुवेलाने राजाच्या कारभाराचे नियम आणि कायदे लोकांस सांगितले, आणि ते एका पुस्तकात लिहून परमेश्वराच्या समोर ठेवले. मग शमुवेलाने सर्व लोकांस आपापल्या घरी पाठवून दिले. शौलही आपल्या घरी गिबा येथे गेला, आणि ज्यांच्या मनाला परमेश्वराने स्पर्श केला, अशी काही बलवान माणसे त्यांच्याबरोबर गेली. परंतु काही कुचकामी माणसे होती ती म्हणाली, “हा पुरुष आम्हास कसा काय सोडवील?” त्यांनी त्याचा अनादर केला व त्यास काही भेट आणली नाही. पण शौल शांत राहिला.
१ शमुवेल 10:9-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शमुवेलापासून निघून जाण्यासाठी त्याची पाठ वळली तोच देवाने त्याचे मन बदलून टाकले व ही सर्व चिन्हे त्याला त्या दिवशी प्राप्त झाली. ते टेकडीजवळ आले, तेव्हा पाहा, संदेष्ट्यांचा एक समुदाय त्याला भेटला; आणि देवाचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला व तो त्यांच्याबरोबर भाषण करू लागला. जे लोक त्याला पूर्वीपासून ओळखत होते, त्यांनी जेव्हा पाहिले की हा संदेष्ट्यांबरोबर भाषण करीत आहे तेव्हा ते आपसांत म्हणू लागले, “कीशाच्या पुत्राला काय झाले? शौल हाही संदेष्ट्यांपैकी आहे काय?” तेव्हा तेथल्या एका मनुष्याने उत्तर दिले; तो म्हणाला, “ह्या संदेष्ट्याचा बाप कोण होता?” ह्यावरून शौलही संदेष्ट्यांपैकी आहे काय अशी म्हण पडली. मग भाषण करणे संपल्यावर तो उच्च स्थानी गेला. शौलाचा काका त्याला व त्याच्या गड्याला म्हणाला, “तुम्ही कोठे गेला होता?” ते म्हणाले, “गाढवे शोधायला; ती सापडत नाहीत असे पाहून आम्ही शमुवेलाकडे गेलो.” शौलाचा काका म्हणाला, “शमुवेल तुम्हांला काय म्हणाला ते मला सांगा.” शौल आपल्या काकाला म्हणाला, “गाढवे सापडली आहेत असे त्याने आम्हांला कळवले.” शमुवेलाने राजपदाविषयी जे काही कळवले होते त्यासंबंधाने त्याने त्याला काहीएक सांगितले नाही. मग शमुवेलाने लोकांना मिस्पात परमेश्वरापुढे बोलावून जमा केले. तो इस्राएल लोकांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, मी इस्राएलास मिसर देशातून बाहेर आणले आणि तुम्हांला मिसरी लोकांच्या हातांतून व तुम्हांला गांजणार्या सर्व राष्ट्रांच्या हातातून सोडवले. पण तुम्हांला सर्व विपत्तीतून व संकटातून सोडवणार्या तुमच्या देवाचा आज तुम्ही अव्हेर केला आहे, व तुम्ही त्याला म्हणाला आहात की हे ठीक नव्हे, आमच्यावर राजा नेमावा; तर आता वंशावंशांनी आणि हजाराहजारांनी परमेश्वरासमोर येऊन हजर व्हा.” शमुवेलाने सगळे वंश जवळ आणले, आणि बन्यामिनाच्या वंशाची चिठ्ठी निघाली. मग बन्यामिनी वंश कुळाकुळांनी जवळ आणला तेव्हा मात्रीच्या कुळाची चिठ्ठी निघाली; व शेवटी कीशाचा पुत्र शौल ह्याच्या नावाची चिठ्ठी निघाली; त्यांनी त्याला शोधले पण तो कोठे सापडेना. तेव्हा त्यांनी परमेश्वराला आणखी विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” परमेश्वराने सांगितले, “पाहा, तो सामानसुमानात लपून राहिला आहे.” त्यांनी धावत जाऊन त्याला तेथून आणले, आणि तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा तो उंच दिसला; सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागले. मग शमुवेल लोकांना म्हणाला, “परमेश्वराने ज्याला निवडले त्याला तुम्ही पाहत आहात ना? सर्व लोकांमध्ये त्याच्या बरोबरीचा कोणी नाही.” तेव्हा सर्व लोकांनी म्हटले, “राजा चिरायू होवो.” नंतर शमुवेलाने लोकांना राजनीती सांगितली व ती एका ग्रंथात लिहून तो ग्रंथ परमेश्वरापुढे ठेवून दिला. मग शमुवेलाने सर्व लोकांना आपापल्या घरी जाण्यास निरोप दिला. शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. ज्या सैनिकांच्या मनांस देवाकडून स्फूर्ती झाली ते त्याच्याबरोबर गेले. पण काही अधम लोक बोलले, “हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार?” त्यांनी त्याला तुच्छ मानले आणि त्याला काही नजराणा आणला नाही; पण त्याने ते ऐकले न ऐकलेसे केले.