1 शमु. 10
10
1तेव्हा शमुवेलाने तेलाची कुपी घेतली, शौलाच्या डोक्यावर ओतली, आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला आपल्या वतनावर राजा होण्यास अभिषेक केला म्हणून हे झाले की नाही? 2आज तू माझ्यापासून गेल्यावर राहेलीच्या कबरेजवळ बन्यामिनाच्या प्रांतात सेल्सह येथे तुला दोन माणसे भेटतील ती तुला म्हणतील की, ज्या गाढवांचा शोध करायला तू गेला होतास ती सांपडली आहेत. पाहा तुझा बाप गाढवांची काळजी सोडून, तुझी चिंता करीत आहे, तो म्हणतो, मी आपल्या मुलासाठी काय करू?” 3मग तेथून तू पुढे जाऊन, ताबोराच्या एलोनाजवळ पोहचशील. तेव्हा तेथे तीन करडू नेणारा एक व तीन भाकरी नेणारा एक व द्राक्षरसाची बुधली नेणारा एक अशी तीन माणसे देवाकडे बेथेलला जात असलेली तुला भेटतील. 4आणि ती तुला अभिवादन करून तुला दोन भाकरी देतील त्या तू त्यांच्या हातातून घेशील. 5त्यानंतर परमेश्वराच्या टेकडीला म्हणजे जेथे पलिष्ट्यांची चौकी आहे तेथे जाशील. आणि तू तेथे नगरास पोहचल्यावर भविष्यवाद्यांचा गट आणि त्यांच्यापुढे सतार, झांज, बासरी व वीणा वाजवणारे उंचस्थानावरून उतरत असता तू त्यांना भेटशील; ते भविष्यवाणी करीत असतील. 6परमेश्वराचा आत्मा जोराने तुझ्यावर येईल आणि त्यांच्याबरोबर तू भविष्यवाणी करशील, आणि तू बदलून निराळा पुरुष होशील. 7आता, जेव्हा ही सर्व चिन्हे तुला प्राप्त होतील, तेव्हा असे होवो की, तुला प्रसंग मिळेल तसे तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. 8तेव्हा तू माझ्या अगोदर खाली गिलगालास जा. पाहा होमार्पणे अर्पण करायला व शांत्यर्पणाचे यज्ञ करायला मी खाली तुझ्याकडे येईन. मी तुझ्याकडे येऊन जे तुला करायचे आहे ते तुला कळवीन तोपर्यंत सात दिवस तू माझी वाट पाहा. 9आणि असे झाले की, शमुवेलापासून जायला त्याने आपली पाठ फिरवल्यावर, परमेश्वराने त्यास दुसरे मन दिले. आणि ती सर्व चिन्हे त्याच दिवशी त्यास प्राप्त झाली. 10जेव्हा ते डोंगराजवळ आले, तेव्हा पाहा भविष्यवाद्यांचा गट त्यास भेटला आणि देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला व त्याच्यामध्ये तो भविष्यवाणी करू लागला. 11तेव्हा असे झाले की, ज्यांना पूर्वी त्याची ओळख होती, त्या सर्वांनी पाहिले की तो भविष्यवक्त्यांबरोबर भविष्यवाणी करत आहे, ते लोक एकमेकांना म्हणू लागले की, “कीशाच्या मुलाला हे काय झाले? शौल भविष्यवक्त्यांपैकी एक आहे काय?” 12तेव्हा त्या ठिकाणाचा कोणी एक उत्तर देऊन बोलला, “त्यांचा बाप कोण आहे?” यावरुन, अशी म्हण पडली की, शौलही भविष्यवाद्यांमध्ये आहे काय? 13भविष्यवाणी करणे समाप्त केल्यावर तो उंचस्थानाकडे आला. 14नंतर, शौलाचा काका त्यास व त्याच्या चाकराला म्हणाला, “तुम्ही कोठे गेला होता?” तो बोलला, “आम्ही गाढवांचा शोध करीत गेलो; ती नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलाकडे गेलो.” 15मग शौलाचा काका म्हणाला, “मी तुला विनंती करतो शमुवेल तुम्हाशी काय बोलला ते मला सांग.” 16तेव्हा शौल आपल्या काकाला म्हणाला, “गाढवे सापडली असे त्याने आम्हास उघड सांगितले.” परंतु राज्याविषयीची जी गोष्ट शमुवेल बोलला ती त्याने त्यास सांगितली नाही. 17मग शमुवेलाने लोकांस मिस्पा येथे परमेश्वराजवळ बोलावले. 18तेव्हा तो इस्राएलाच्या संतानाना म्हणाला, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो, मी मिसरातून इस्राएलास वर आणले, आणि मिसऱ्यांच्या हातातून व तुम्हास पीडणारी जी राज्ये त्या सर्वांच्या हातातून तुम्हास सोडवले. 19परंतु तुमचा परमेश्वर, जो स्वत: तुमच्या सर्व शत्रूपासून व तुमच्या संकटातून तुम्हास सोडवतो त्यास तुम्ही आज नाकारले; आणि आम्हांवर राजा नेमून ठेव, असे त्यास म्हटले. तर आता आपल्या वंशाप्रमाणे व आपल्या हजारांप्रमाणे परमेश्वराच्या समोर उभे राहा.” 20शमुवेलाने इस्राएलाचे सर्व वंश जवळ आणले, तेव्हा बन्यामिनाचा वंश निवडून घेण्यात आला. 21मग त्याने बन्यामिनाचा वंश त्यातील घराण्याप्रमाणे जवळ आणला; आणि मात्रीचे घराणे आणि कीशाचा मुलगा शौल निवडून घेण्यात आला. पण जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला तेव्हा तो सापडला नाही. 22मग त्यांनी परमेश्वरास आणखी विचारले की, “तो पुरुष इकडे फिरून येईल काय?” तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “पाहा तो सामानामध्ये लपला आहे.” 23मग त्यांनी धावत जाऊन त्यास तेथून आणले. तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता. 24तेव्हा शमुवेल सर्व लोकांस म्हणाला, “ज्याला परमेश्वराने निवडले त्यास तुम्ही पाहता काय? त्याच्यासारखा सर्व लोकात कोणी नाही!” सर्व लोक ओरडून म्हणाले, “राजा दीर्घायुषी होवो!” 25तेव्हा शमुवेलाने राजाच्या कारभाराचे नियम आणि कायदे लोकांस सांगितले, आणि ते एका पुस्तकात लिहून परमेश्वराच्या समोर ठेवले. मग शमुवेलाने सर्व लोकांस आपापल्या घरी पाठवून दिले. 26शौलही आपल्या घरी गिबा येथे गेला, आणि ज्यांच्या मनाला परमेश्वराने स्पर्श केला, अशी काही बलवान माणसे त्यांच्याबरोबर गेली. 27परंतु काही कुचकामी माणसे होती ती म्हणाली, “हा पुरुष आम्हास कसा काय सोडवील?” त्यांनी त्याचा अनादर केला व त्यास काही भेट आणली नाही. पण शौल शांत राहिला.
सध्या निवडलेले:
1 शमु. 10: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.