YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 10:5-13

१ शमुवेल 10:5-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्यानंतर परमेश्वराच्या टेकडीला म्हणजे जेथे पलिष्ट्यांची चौकी आहे तेथे जाशील. आणि तू तेथे नगरास पोहचल्यावर भविष्यवाद्यांचा गट आणि त्यांच्यापुढे सतार, झांज, बासरी व वीणा वाजवणारे उंचस्थानावरून उतरत असता तू त्यांना भेटशील; ते भविष्यवाणी करीत असतील. परमेश्वराचा आत्मा जोराने तुझ्यावर येईल आणि त्यांच्याबरोबर तू भविष्यवाणी करशील, आणि तू बदलून निराळा पुरुष होशील. आता, जेव्हा ही सर्व चिन्हे तुला प्राप्त होतील, तेव्हा असे होवो की, तुला प्रसंग मिळेल तसे तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. तेव्हा तू माझ्या अगोदर खाली गिलगालास जा. पाहा होमार्पणे अर्पण करायला व शांत्यर्पणाचे यज्ञ करायला मी खाली तुझ्याकडे येईन. मी तुझ्याकडे येऊन जे तुला करायचे आहे ते तुला कळवीन तोपर्यंत सात दिवस तू माझी वाट पाहा. आणि असे झाले की, शमुवेलापासून जायला त्याने आपली पाठ फिरवल्यावर, परमेश्वराने त्यास दुसरे मन दिले. आणि ती सर्व चिन्हे त्याच दिवशी त्यास प्राप्त झाली. जेव्हा ते डोंगराजवळ आले, तेव्हा पाहा भविष्यवाद्यांचा गट त्यास भेटला आणि देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला व त्याच्यामध्ये तो भविष्यवाणी करू लागला. तेव्हा असे झाले की, ज्यांना पूर्वी त्याची ओळख होती, त्या सर्वांनी पाहिले की तो भविष्यवक्त्यांबरोबर भविष्यवाणी करत आहे, ते लोक एकमेकांना म्हणू लागले की, “कीशाच्या मुलाला हे काय झाले? शौल भविष्यवक्त्यांपैकी एक आहे काय?” तेव्हा त्या ठिकाणाचा कोणी एक उत्तर देऊन बोलला, “त्यांचा बाप कोण आहे?” यावरुन, अशी म्हण पडली की, शौलही भविष्यवाद्यांमध्ये आहे काय? भविष्यवाणी करणे समाप्त केल्यावर तो उंचस्थानाकडे आला.

सामायिक करा
१ शमुवेल 10 वाचा

१ शमुवेल 10:5-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग तू देवाच्या टेकडीजवळ पोहचशील, तेथे पलिष्ट्यांचा चौकीपहारा आहे; तू तेथे नगराजवळ पोहचल्यावर संदेष्ट्यांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल, त्यांच्यापुढे सतार, डफ, सनई व वीणा वाजत असतील; व ते भाषण करीत असतील. तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर सामर्थ्याने येईल. व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. ही चिन्हे तुला प्राप्त झाली म्हणजे तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावेस; कारण देव तुझ्याबरोबर आहे. तू माझ्या अगोदर गिलगाल येथे जा; मग मी होमबली अर्पण करायला व शांत्यर्पणांचे यज्ञ करायला तुझ्याकडे येईन; तू सात दिवस माझी वाट पाहत राहा; मग मी तुझ्याकडे येऊन तुला काय करायचे हे दाखवीन.” शमुवेलापासून निघून जाण्यासाठी त्याची पाठ वळली तोच देवाने त्याचे मन बदलून टाकले व ही सर्व चिन्हे त्याला त्या दिवशी प्राप्त झाली. ते टेकडीजवळ आले, तेव्हा पाहा, संदेष्ट्यांचा एक समुदाय त्याला भेटला; आणि देवाचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला व तो त्यांच्याबरोबर भाषण करू लागला. जे लोक त्याला पूर्वीपासून ओळखत होते, त्यांनी जेव्हा पाहिले की हा संदेष्ट्यांबरोबर भाषण करीत आहे तेव्हा ते आपसांत म्हणू लागले, “कीशाच्या पुत्राला काय झाले? शौल हाही संदेष्ट्यांपैकी आहे काय?” तेव्हा तेथल्या एका मनुष्याने उत्तर दिले; तो म्हणाला, “ह्या संदेष्ट्याचा बाप कोण होता?” ह्यावरून शौलही संदेष्ट्यांपैकी आहे काय अशी म्हण पडली. मग भाषण करणे संपल्यावर तो उच्च स्थानी गेला.

सामायिक करा
१ शमुवेल 10 वाचा