१ शमुवेल 1:1-8
१ शमुवेल 1:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम या नगरामधील एक पुरुष होता व त्याचे नाव एलकाना होते. तो यरोहामाचा मुलगा तो एलीहूचा मुलगा तो तोहचा मुलगा तो सूफाचा मुलगा तो एलकाना एफ्राईमी होता. त्यास दोन स्त्रिया होत्या, एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना होते. पनिन्नेला लेकरे होती परंतु हन्नेला नव्हती. तो पुरुष आपल्या नगराहून प्रतिवर्षी शिलो येथे सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करायला व यज्ञ करायला जात असे. तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास देवाचे याजक होते. यज्ञ करायचा दिवस आला म्हणजे एलकाना आपली पत्नी पनिन्ना हिला व तिची सर्व मुले तिच्या सर्व मुली यांना मांसाचे वाटे देत असे. परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देत असे कारण हन्नेवर तो जास्त प्रीती करत असे, पण परमेश्वराने तिची कुस बंद केली होती. परमेश्वराने तिची कुस बंद केल्यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची सवत तिला फारच चिडवत असे. ती प्रतिवर्षी असेच करीत असे, ती आपल्या परिवारासोबत परमेश्वराच्या मंदिरात जाई तेव्हा तिची सवत तिला असाच त्रास देई म्हणून ती रडत असे व काही खात नसे. तेव्हा तिचा पती एलकाना तिला नेहमी म्हणत असे, “हन्ना तू कां रडतेस? तू का खात नाहीस? आणि तुझे मन का दु:खीत आहे? मी तुला दहा मुलांपेक्षा जास्त नाही काय?”
१ शमुवेल 1:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता; त्याचे नाव एलकाना बिन यरोहाम बिन एलीहू बिन तोहू बिन सूफ एफ्राइमी असे होते. त्याला दोन बायका होत्या; एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेला मुलेबाळे झाली होती, पण हन्नेला काही अपत्य नव्हते. हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची आराधना करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यासाठी शिलो येथे जात असे. एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. एलकाना यज्ञ करी, तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रांना व कन्यांना वाटे देत असे. हन्नेला तो दुप्पट वाटा देई; कारण तिच्यावर त्याची प्रीती असे; परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. तिची सवत तिने कुढत राहावे म्हणून तिला सारखी चिडवीत असे, कारण परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवत असे; तेव्हा ती रडे व काही खात नसे. तिचा पती एलकाना तिला एकदा म्हणाला, “हन्ना, तू का रडतेस? तू अन्नपाणी का वर्ज केलेस? तुझे हृदय खिन्न का? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?”