1 पेत्र 4:7-13
1 पेत्र 4:7-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा; मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा; कारण ‘प्रीती पापांची रास झाकून टाकते.’ कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा; भाषण करणार्याने, आपण देवाची वचने बोलत आहोत, असे बोलावे; सेवा करणार्याने, ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठी की, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा; गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचे आहेत. आमेन. प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुमच्यावर आली आहे तिच्यामुळे आपणांस काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा; म्हणजे त्याचा गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्लास व आनंद कराल.
1 पेत्र 4:7-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे म्हणून समंजस मनाचे व्हा आणि प्रार्थनेसाठी सावध रहा; आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकली जाते. काही कुरकुर न करता तुम्ही सर्वजण एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा. तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा. जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताद्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे, त्यास गौरव व पराक्रम ही युगानुयुग असोत. आमेन. प्रियांनो, तुमच्या परीक्षेसाठी, तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हास काही अपूर्व झाले, असे वाटून त्याचे नवल मानू नका. उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखात भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लासित व्हावे.
1 पेत्र 4:7-13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सर्व गोष्टींचा अंतकाळ जवळ आला आहे म्हणून सावध आणि विचारशील असा, म्हणजे तुम्हाला प्रार्थना करता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांवर निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पुष्कळ पापांची रास झाकून टाकते. कुरकुर न करता एकमेकांचे आदरातिथ्य करा. परमेश्वराच्या कृपेच्या वेगवेगळ्या रुपामध्ये परमेश्वराचे एकनिष्ठ कारभारी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्हाला जे काही विशेष कर्तृत्वदान मिळाले आहे त्याचा उपयोग करा. जर कोणी संदेश देतो तर त्याने असा संदेश द्यावा की, तो परमेश्वराचेच शब्द बोलत आहे. जर कोणी सेवा करतात तर परमेश्वर जशी शक्ती पुरवितात त्याप्रमाणे करावी, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताच्याद्वारे परमेश्वराचे गौरव होईल. त्यांना गौरव, आणि सामर्थ्य सदासर्वकाळ असो. आमेन! प्रिय मित्रांनो, तुमची परीक्षा घेण्यासाठी तुमच्यावर आलेल्या अग्निसारख्या वाईट अनुभवाबद्दल आश्चर्यचकित होऊ नका, जसे की तुमच्यासाठी काहीतरी विचित्रच घडत आहे. परंतु ख्रिस्ताच्या दुःखात जेवढे तुम्हाला सहभागी होता येईल तेवढे होऊन आनंद करा, म्हणजे ज्यावेळी त्यांचे गौरव प्रकट होईल त्यावेळी तुम्ही अतिआनंदीत व्हाल.
1 पेत्र 4:7-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः एकमेकांवर आस्थेने प्रीती करा कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्याप्रणाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. शुभवर्तमान सांगणाऱ्याने देवाचा संदेश सांगावा. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत या भावनेने करावी, ह्यासाठी की, सर्व गोष्टींत येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा गौरव व्हावा. गौरव व पराक्रम ही युगानुयुगे त्याची आहेत. आमेन. प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हांला द्यावी लागली आहे तिच्यामुळे आपल्याला काही अपूर्व झाले, असे वाटून त्याचे नवल मानू नका. उलट, ज्याअर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात, त्याअर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे वैभव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्लास व आनंद कराल.