YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 4

4
पापाचा त्याग करणे
1म्हणून आपल्यासाठी ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले तसेच तुम्हीही तेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा; कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे;
2ह्यासाठी की, तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे.
3कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यांत चालण्यात जो काळ गेला तितका पुरे.
4तुम्ही त्यांच्या बेतालपणात त्यांना सामील होत नाही ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात.
5जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे त्याला ते हिशेब देतील.
6कारण सुवार्ता मृतांनाही सांगण्यात आली होती, ह्यासाठी की, देहात त्यांचा न्यायनिवाडा मनुष्यांनुसार व्हावा, पण आत्म्यात त्यांनी देवानुसार जगावे.
7सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा;
8मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा; कारण ‘प्रीती पापांची रास झाकून टाकते.’
9कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा.
10प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्‍यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा;
11भाषण करणार्‍याने, आपण देवाची वचने बोलत आहोत, असे बोलावे; सेवा करणार्‍याने, ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठी की, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा; गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचे आहेत. आमेन.
ख्रिस्तासाठी दु:ख सहन करण्याचा हक्क
12प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुमच्यावर आली आहे तिच्यामुळे आपणांस काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका.
13ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा; म्हणजे त्याचा गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्लास व आनंद कराल.
14ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन ‘राहिला आहे.’ [त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो.]
15तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी, किंवा दुसर्‍याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये;
16ख्रिस्ती ह्या नात्याने कोणाला दु:ख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचा गौरव करावा.
17कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणार्‍यांचा शेवट काय होईल?
18“नीतिमान जर कष्टाने तरतो तर भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल?”
19ह्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दु:ख भोगणार्‍यांनी सत्कृत्ये करत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावेत.

सध्या निवडलेले:

1 पेत्र 4: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन