1 पेत्र 4:1-5
1 पेत्र 4:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे. म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे. कारण परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तीपूजेत आपल्या मार्गाने गेलात. अशा बेतालपणाच्या स्वैराचरणात आता तुम्ही त्यांच्याबरोबर घुसत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात. तरीही, देव जो जिवंतांचा व मृतांचा न्याय करण्यास तयार आहे त्यास ते आपला हिशोब देतील.
1 पेत्र 4:1-5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून, ज्याअर्थी ख्रिस्ताने त्यांच्या शरीरामध्ये दुःख सहन केले, त्याअर्थी तुम्ही सुद्धा तीच मनोवृत्ती धारण केली पाहिजे, कारण जो कोणी शरीरामध्ये दुःख सहन करतो तो पापाचा त्याग करतो. याचा परिणाम असा होतो की, ते त्यांचे उरलेले जगीक आयुष्य मानवाच्या वाईट इच्छेप्रमाणे नाही तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगतात. कारण गैरयहूदी लोकांप्रमाणे व्यभिचार, कामातुरपणा, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली आणि घृणित मूर्तिपूजा हे करण्यात तुम्ही बराच वेळ घालविला. त्यांना आश्चर्य वाटते की तुम्ही आता त्यांच्या बेपर्वा, वाईट जीवनात सामील होत नाही आणि ते तुमची निंदा करतात. पण एवढे लक्षात ठेवा की, त्यांना त्यांचा हिशोब त्या परमेश्वराला द्यावा लागेल जो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास सिद्ध आहे.
1 पेत्र 4:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून आपल्यासाठी ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले तसेच तुम्हीही तेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा; कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे; ह्यासाठी की, तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे. कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यांत चालण्यात जो काळ गेला तितका पुरे. तुम्ही त्यांच्या बेतालपणात त्यांना सामील होत नाही ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात. जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे त्याला ते हिशेब देतील.
1 पेत्र 4:1-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ख्रिस्ताने दैहिक दुःख सोसले. तुम्हीही तीच मनोवृत्ती धारण करा, कारण जो दैहिक दुःख सहन करतो, तो पापाकडे पाठ फिरवतो! म्हणून तुम्ही आपले ऐहिक आयुष्य मानवी वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे. कारण यहुदीतर लोकांना आवडणारी कृत्ये करण्यात, म्हणजे स्वैराचार, कामासक्ती, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व बेकायदेशीर मूर्तिपूजा ह्यांत जो काळ गेला तितका पुरे. तुम्ही त्यांच्या बेतालपणात सामील होत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमच्याविरुद्ध दुर्भाषण करतात. परंतु जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे, त्या न्यायाधीशाला त्यांना हिशेब द्यावा लागणार आहे.