१ राजे 19:3-12
१ राजे 19:3-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैर-शेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून तो पुढे दिवसभर वाळवंट तुडवत गेला. एका झाडाखाली तो बसला. आता मरण यावे असे त्यास वाटले. एलीया म्हणाला, “आता हे पुरे झाले, परमेश्वरा! मला आता मरु दे माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे?” एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्यास झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करून म्हणाला, “उठ हे खा.” एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला. आणखी काही वेळाने तो परमेश्वराचे देवदूत दुसऱ्यांदा पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्यास स्पर्श केला आणि त्यास म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.” तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्या अन्नाच्या बळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला. तिथे एका गुहेत शिरुन त्याने रात्र काढली. तेव्हा परमेश्वर एलीयाशी बोलला. तो म्हणाला, “एलीया, तू येथे का आला आहेस?” एलीया म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्राएलाच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना तलवारीने मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे. पण आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.” यावर परमेश्वर एलीयाला म्हणाला, “जा, या डोंगरावर माझ्यासमोर उभा राहा. मी तुझ्या जवळून जातो” मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठेमोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण तेथेही परमेश्वर नव्हता. धरणीकंपानंतर अग्नी प्रकटला. पण तेथेही परमेश्वर नव्हता. अग्नी शमल्यावर मात्र शांत, मंजुळ स्वर ऐकू आला.
१ राजे 19:3-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एलीयाह घाबरून आपला जीव घेऊन पळून गेला. जेव्हा तो यहूदीया प्रांतातील बेअर-शेबा नगरात आला, त्याने आपल्या सेवकाला तिथे सोडले, तो स्वतः एक दिवसाचा प्रवास करीत रानात गेला, तो रतामाच्या झुडूपाखाली आला आणि मरून जावे म्हणून तिथे बसून प्रार्थना केली. “हे याहवेह आता पुरे आहे, माझा प्राण घ्या, मी माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला आहे असे नाही.” नंतर तो त्या रतामाच्या झुडूपाखाली पडून झोपी गेला. अचानक परमेश्वराच्या दूताने येऊन त्याला स्पर्श करीत म्हटले, “ऊठ आणि खा.” त्याने सभोवती पाहिले, आणि त्याच्या उशाशी निखार्यावर भाजलेल्या काही भाकरी आणि पाण्याचे एक भांडे ठेवलेले होते. तो भाकर खाऊन पाणी प्याला आणि पुन्हा झोपी गेला. याहवेहचा दूत परत दुसर्यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ आणि खा, कारण तुला फार लांबचा प्रवास करावयाचा आहे.” तेव्हा त्याने उठून अन्नपाणी घेतले. त्या अन्नाच्या शक्तीवर चाळीस दिवस व चाळीस रात्री प्रवास करीत होरेब, तो परमेश्वराच्या डोंगराकडे पोहोचला. तिथे तो गुहेत जाऊन रात्रभर तिथेच राहिला. आणि याहवेहचे वचन त्याच्याकडे आले: “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?” एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.” याहवेहने त्याला म्हटले, “बाहेर जा आणि याहवेहच्या उपस्थितीत डोंगरावर उभा राहा, कारण याहवेह तिथून जाणार आहेत.” तेव्हा मोठ्या व शक्तिशाली वार्याने डोंगर याहवेहसमोर दुभागले आणि खडक फोडले, परंतु याहवेह त्या वार्यात नव्हते. त्या वार्यानंतर भूमिकंप झाला, परंतु याहवेह त्या भूमिकंपात देखील नव्हते. भूमिकंपानंतर अग्नी आला, परंतु त्या अग्नीतही याहवेह नव्हते. आणि त्या अग्नीनंतर एक शांत वाणी झाली.
१ राजे 19:3-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे ऐकून एलीया जीव घेऊन पळाला; तो यहूदातील बैर-शेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकराला ठेवले. तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला; आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, “हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर; मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही.” तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला; तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, “ऊठ, हे खा.” त्याने पाहिले तो निखार्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊनपिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसर्यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ, हे खा; कारण तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे.” त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले; त्या अन्नाच्या बळावर चाळीस दिवस व चाळीस रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहचला. तो तेथे जाऊन एका गुहेत राहिला; तेव्हा पाहा, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. तो त्याला म्हणाला, “एलीया, तू येथे काय करीत आहेस?” तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे; कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले; मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.” त्याने त्याला म्हटले, “तू येथून बाहेर निघून जा; पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा.” तेव्हा पाहा, परमेश्वर जवळून जात असताना त्याच्यासमोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारत व खडक फोडत होता; पण त्या वार्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला; पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला; पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता; त्या अग्नीनंतर शांत, मंद वाणी झाली.