YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 18:30-39

१ राजे 18:30-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग एलीया सर्व लोकांस उद्देशून म्हणाला, “आता सगळे माझ्याजवळ या.” तेव्हा सगळे त्याच्याभोवती जमले. परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती. तेव्हा एलीयाने आधी ते सर्व नीट केले. एलीयाने बारा दगड घेतले. प्रत्येकाच्या नावाचा एकेक याप्रमाणे बारा वंशांचे ते बारा दगड होते. याकोबाच्या बारा मुलांच्या नावाचे ते वंश होते. याकोबालाच परमेश्वराने इस्राएल या नावाने संबोधले होते. परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलीयाने वापरले. मग त्याने वेदीभोवती एक चर खणला. सात गंलन पाणी मावण्याइतकी त्याची खोली आणि रुंदी होती. एलीयाने मग वेदीवर लाकडे रचली. “गोऱ्हा कापला. त्याचे तुकडे लाकडावर ठेवले.” मग तो म्हणाला, “चार घागरी भरुन पाणी घ्या आणि ते मांसाच्या तुकड्यावर आणि खालच्या होमार्पणाच्या लाकडावर ओता.” ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले. वेदीवरुन वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले. दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करून दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे. हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वत:जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.” तेव्हा परमेश्वराने अग्नी पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतीच्या चरातले पाणी सुध्दा त्या अग्नीने सुकून गेले. सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले.

सामायिक करा
१ राजे 18 वाचा

१ राजे 18:30-39 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तेव्हा एलीयाह सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या.” ते त्याच्याकडे आले आणि त्याने याहवेहची जी वेदी मोडून गेली होती ती दुरुस्त केली. “तुझे नाव इस्राएल असणार” असे याहवेहने ज्या याकोबाला म्हटले होते त्याच्या वंशजांच्या बारा गोत्रांइतके एलीयाहने बारा धोंडे घेतले. त्या धोंड्यांनी त्याने याहवेहच्या नावाने वेदी बांधली आणि वेदीभोवती दोन सिआह बीज मावेल इतकी मोठी खळगी खणली. त्याने लाकडे रचली, बैल कापून त्याचे तुकडे केले आणि त्या लाकडांवर रचले. मग तो त्यांना म्हणाला, “चार मोठ्या घागरी पाण्याने भरा आणि ते यज्ञावर व लाकडांवर ओता.” तो म्हणाला, “पुन्हा असेच करा.” आणि त्यांनी पुन्हा केले. त्याने आदेश दिला, “तिसर्‍यांदा असेच करा,” आणि त्यांनी तिसर्‍यांदाही होमार्पणावर पाणी टाकले. पाणी वेदीवरून खाली वाहू लागले आणि खळगी सुद्धा पाण्याने भरली. यज्ञाच्या वेळी, एलीयाह संदेष्टा पुढे आला आणि त्याने प्रार्थना केली: “हे याहवेह, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलच्या परमेश्वरा, आज हे जाहीर होवो की इस्राएलमध्ये केवळ तुम्हीच परमेश्वर आहात आणि मी तुमचा सेवक असून या सर्व गोष्टी मी आपल्या आज्ञेनुसार केल्या आहेत. मला उत्तर द्या, हे याहवेह, मला उत्तर द्या, म्हणजे या लोकांना समजेल, याहवेह, तुम्हीच परमेश्वर आहे आणि आपणच त्यांची मने परत वळवित आहात.” तेव्हा याहवेहचा अग्नी आला आणि होमार्पण, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि खळग्यातील पाणी चाटून टाकले. जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, तेव्हा ते पालथे पडून रडू लागले, “याहवेह हेच परमेश्वर आहे! याहवेह हेच परमेश्वर आहे!”

सामायिक करा
१ राजे 18 वाचा

१ राजे 18:30-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग एलीया सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या”; तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली. ‘तुझे इस्राएल असे नाव पडेल’ असे याकोबाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते, त्याच्या वंशसंख्येइतके बारा धोंडे एलीयाने घेतले; त्या धोंड्यांची त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली; आणि दोन मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदीसभोवार खणली. त्याने वेदीवर लाकडे ठेवली आणि गोर्‍हा कापून व तुकडे करून ते लाकडांवर रचले. मग तो म्हणाला, “चार घागरी पाणी भरून होमबलीवर व लाकडांवर ओता.” तो पुन्हा म्हणाला, “दुसर्‍यांदा तसेच करा”; तेव्हा लोकांनी दुसर्‍यांदा तसेच केले. तो म्हणाला, “तिसर्‍यांदा तसेच करा”; आणि त्यांनी तिसर्‍यांदा तसेच केले. पाणी वेदीवरून सभोवार वाहिले, आणि ती खळगीही पाण्याने भरली. संध्याकाळच्या यज्ञसमयी एलीया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, “हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, इस्राएलामध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे, आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांना कळू दे. हे परमेश्वरा, ऐक, माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच ह्यांची हृदये मागे फिरवली आहेस, ह्याची ह्या लोकांना जाणीव होऊ दे.” तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटले. हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, “परमेश्वर हाच देव! परमेश्वर हाच देव!”

सामायिक करा
१ राजे 18 वाचा