१ राजे 11:26-43
१ राजे 11:26-43 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नबाट याचा पुत्र यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडिल वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला. त्याची कथा अशी. मिल्लोचे बांधकाम आणि दावीद राजाच्या नगराच्या तटबंदीला पडलेली खिंडारे बुजवण्याचे काम शलमोन करून घेत होता. यराबाम हा अंगापिडाने मजबूत होता. हा या कामाला चांगला असल्याचे शलमोनाने हेरले आणि त्यास योसेफ घराण्यातील कामगारांचा अधीक्षक म्हणून नेमले. एकदा यराबाम यरूशलेमेच्या बाहेर गेला होता. तेव्हा त्यास शिलो येथील अहीया नावाचा संदेष्टा वाटेत भेटला. अहीयाने नवीन अंगरखा घातला होता. या दोघांखेरीज तेव्हा त्या भागात आणखी कोणी नव्हते. अहीयाने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकडे केले. मग अहीया यराबामाला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वत:जवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन. आणि दाविदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दावीद आणि हे यरूशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलाच्या सर्व वंशांतून मी यरूशलेम नगराची निवड केली आहे. शलमोनाने माझा त्याग केला म्हणून मी त्याच्याकडून राज्य काढून घेणार आहे. सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मवाबाचा कमोश, अम्मोन्याचा मिलकोम या परकीय दैवतांचे तो भजन पूजन करतो. जे योग्य आणि न्याय्य ते आता तो करत नाही. माझ्या आज्ञा आणि नियम तो पाळत नाही. त्याचे वडिल दावीद ज्या पध्दतीने जगले तसे याचे नाही. तेव्हा आता त्याच्या घराण्यातून मी सत्ता काढून घेत आहे. मात्र शलमोन जिवंत असेपर्यंत तोच गादीवर अधिपती राहील. माझा सेवक दावीद याच्याखातर मी एवढे करीन. माझे सर्व नियम आणि आज्ञा दाविदाने पाळल्या म्हणून मी त्यास निवडले. पण त्याच्या मुलाच्या हातून मी राज्य काढून घेणार आहे आणि यराबाम, दहा घराण्यावरील सत्ता मी तुझ्या हाती सोपवीन. शलमोनाच्या मुलाची एका वंशावरील सत्ता तशीच अबाधित ठेवीन. म्हणजे यरूशलेमामध्ये माझा सेवक दावीद याचा वंशजच सतत राज्य करील. यरूशलेम हे नगर मी आपले स्वत:चे म्हणून निवडले. बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल. माझ्या आज्ञांचे पालन करत तू योग्य मार्गाने आयुष्य घालवलेस तर मी हे तुला देईन. दाविदाप्रमाणे माझी सर्व आज्ञा आणि नियम पाळलेस तर माझी तुला साथ असेल. दाविदा प्रमाणेच तुझ्याही घराण्याला मी राजघराणे करीन. इस्राएल तुला देईन. यामुळे मी दाविदाच्या वर्तणुकीची शिक्षा मी त्याच्या मुलांना करीन. पण काही काळापुरती, सर्वकाळ नव्हे.” शलमोनाने यराबामाच्या वधाचा प्रयत्न केला. पण यराबामाने मिसरला पलायन केले. मिसरचा राजा शिशक याच्याकडे तो गेला. शलमोनाच्या मृत्यूपर्यंत यराबाम तिथेच राहिला. शलमोनाने सत्तेवर असताना बऱ्याच मोठमोठ्या आणि सुज्ञपणाच्या गोष्टी केल्या. शलमोनचा इतिहास या पुस्तकात त्या सर्व लिहिलेल्या नाहीत काय? यरूशलेमेतून शलमोनाने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले मग शलमोन मरण पावला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दावीद याच्या नगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या ठिकाणी रहबाम राज्य करू लागला.
१ राजे 11:26-43 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेरेदाह येथील एक एफ्राईमकर, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने सुद्धा शलोमोन राजाविरुद्ध बंड केले. त्याची आई विधवा होती, तिचे नाव जेरुआह होते. त्याने राजाविरुद्ध बंड कसे केले त्याचा वृत्तांत असा: शलोमोनने स्तरीय बांधकाम व त्याचा पिता दावीदाच्या शहराच्या भिंतीची खिंडारे दुरुस्त केली. यरोबोअम एक शूरवीर होता. या तरुणाने आपले काम किती उत्तम प्रकारे केले आहे, हे शलोमोनने पाहिले, तेव्हा त्याने त्याला योसेफाच्या गोत्रातील सर्व मजूर कामगारांवर मुख्य असे नेमले. त्याच दरम्यान यरोबोअम यरुशलेमातून बाहेर जात असताना, शिलोनी अहीयाह नावाचा संदेष्टा, नवीन झगा घातलेला असा त्याला वाटेत भेटला. ते त्या मैदानात दोघेच होते, अहीयाहने घातलेला आपला नवीन झगा घेऊन तो फाडून त्याचे बारा तुकडे केले. आणि तो यरोबोअमास म्हणाला, “तुझ्यासाठी दहा तुकडे उचलून घे, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘पाहा, मी शलोमोनच्या हातून राज्य हिसकावून घेईन व दहा गोत्र मी तुझ्या हाती देईन. पण माझा सेवक दावीद आणि यरुशलेम शहर ज्याची मी इस्राएलच्या सर्व गोत्रांतून निवड केली त्याच्याप्रित्यर्थ, शलोमोनच्या हातात एक गोत्र राहील. मी असे केले आहे कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मोआबाचे दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे दैवत मिलकाम यांची उपासना केली आणि ते माझ्या आज्ञेनुसार चालले नाहीत किंवा माझ्या दृष्टीने जे बरे ते केले नाही किंवा शलोमोनचा पिता दावीदाने केले तसे माझे विधी व नियम त्यांनी पाळले नाहीत. “ ‘परंतु मी शलोमोनच्या हातून आताच संपूर्ण राज्य हिसकावून घेणार नाही; माझा सेवक दावीदाप्रीत्यर्थ मी त्याला त्याच्या जीवनभर अधिकारी असे नेमले आहे, कारण मी दावीदाला निवडले व त्याने माझ्या आज्ञा व विधींचे पालन केले. परंतु मी शलोमोनच्या पुत्राच्या हातून राज्य काढून दहा गोत्र तुला देईन. मी शलोमोनच्या पुत्राला एक गोत्र देईन, यासाठी की ज्या यरुशलेम नगरास मी माझ्या नावासाठी निवडले आहे त्यात माझा सेवक दावीद याचा दीप सदा माझ्यासमोर पेटलेला असेल. आणि तुझ्याविषयी म्हटले तर, तुला मनास वाटेल त्यावर तू राज्य करशील; इस्राएलवर तू राज्य करशील. मी तुला दिलेल्या आज्ञांनुसार जर तू करशील, माझा सेवक दावीदाने केले त्याप्रमाणे माझ्या आज्ञेत चालशील व माझे विधी व आज्ञा पाळून माझ्या दृष्टीत जे योग्य ते करशील, तर मी तुझ्याबरोबर राहीन. दावीदाचे जसे मी कायमचे राज्य स्थापले आहे, तसेच तुझी व तुझ्या राज्याची स्थापना मी करेन व इस्राएल तुझ्या हाती देईन. असे करून मी दावीदाच्या वंशजांना नम्र बनवीन, पण सर्वकाळासाठी नव्हे.’ ” शलोमोनने यरोबोअमला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण यरोबोअम इजिप्त देशाचा राजा शिशाककडे पळून गेला आणि शलोमोनचा मृत्यू होईपर्यंत तिथेच राहिला. शलोमोनच्या राज्यकाळातील इतर घटना; त्याची कृत्ये व त्याने दाखविलेले ज्ञान हे शलोमोनच्या पुस्तकात लिहिलेले नाहीत का? शलोमोनने यरुशलेमात संपूर्ण इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले. नंतर शलोमोन त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला व त्याला त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरले आणि रेहोबोअम राजा म्हणून त्याचा वारस झाला.
१ राजे 11:26-43 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याशिवाय सरेदा येथला एफ्राइमी नबाट ह्याचा पुत्र यराबाम हा शलमोनाचा सेवक होता, त्याची आई विधवा होती, तिचे नाव सरूवा; त्यानेही राजावर हात उचलला. त्याने हात उचलायचे कारण एवढेच की शलमोन मिल्लो नगर बांधून आपला पिता दावीद ह्याच्या नगराची मोडतोड दुरुस्त करीत होता; त्या वेळी यराबाम हा मोठा शूर वीर होता. तो तरुण पुरुष उद्योगी आहे हे शलमोनाच्या लक्षात आले तेव्हा त्याने त्याला योसेफाच्या घराण्यातील लोकांच्या कामावर नेमले. त्या काळात यराबाम यरुशलेम सोडून बाहेर चालला असता त्याला वाटेत शिलोचा अहीया नामक संदेष्टा भेटला; त्याने नवे वस्त्र धारण केले होते, व त्या वेळी त्या मैदानात ते दोघेच होते. अहीयाने आपल्या अंगावरचे नवे वस्त्र काढून त्याचे बारा तुकडे केले. तो यराबामाला म्हणाला, “ह्यांतले दहा तुकडे तू घे, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे असे म्हणणे आहे की मी शलमोनाच्या हातून राज्य तोडून घेऊन दहा वंश तुझ्या हाती देईन; (तरी माझा सेवक दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून मी निवडलेल्या यरुशलेम नगराप्रीत्यर्थ त्याच्याकडे मी एक वंश राहू देईन); ह्याचे कारण हेच की ते माझा त्याग करून सीदोन्यांची देवी अष्टोरेथ, मवाबाचा देव कमोश आणि अम्मोन्यांचा देव मिलकोम ह्यांच्या भजनी लागले आहेत; ते माझ्या मार्गाने चालत नाहीत, जे माझ्या दृष्टीने योग्य ते करीत नाहीत आणि शलमोनाचा बाप दावीद माझे नियम व निर्णय पाळी तसे पाळत नाहीत. तथापि मी त्याच्या हातून सर्वच राज्य हिसकावून घेणार नाही; तर माझा सेवक दावीद माझ्या आज्ञा व नियम पाळत असे म्हणून मी त्याला निवडले होते त्याच्याप्रीत्यर्थ मी शलमोनाला त्याच्या हयातीत राजपदावर ठेवीन. पण त्याच्या पुत्राच्या हातून राज्य घेऊन तुला देईन, दहा वंशांवरले राज्य तुला देईन; आणि त्याच्या पुत्राकडे मी एक वंश राहू देईन, म्हणजे माझ्या नामाची स्थापना व्हावी म्हणून मी यरुशलेम नगर निवडले आहे त्यात माझा सेवक दावीद ह्याची ज्योती माझ्यासमोर निरंतर जळत राहील. मी तुला हाती धरीन आणि तू आपल्या मनोरथाप्रमाणे इस्राएलांवर राज्य करशील. तू माझा सेवक दावीद ह्याच्याप्रमाणे माझ्या सर्व आज्ञा मानशील, माझ्या मार्गाने चालशील, माझ्या दृष्टीने जे योग्य तेच करशील आणि माझे नियम व आज्ञा पाळत जाशील तर मी तुझ्याबरोबर राहीन आणि जसे मी दाविदाचे घराणे कायम स्थापले तसे तुझेही कायम स्थापीन आणि इस्राएल लोकांना तुझ्या हवाली करीन. शलमोनाच्या वर्तनास्तव मी दाविदाच्या संततीला दु:ख भोगायला लावीन, पण ते सर्वकाळ नाही.” शलमोन यराबामास जिवे मारू पाहत होता; पण यराबाम मिसर देशाचा राजा शिशक ह्याच्याकडे मिसर देशाला पळून गेला आणि शलमोनाच्या मृत्यूपर्यंत तेथेच राहिला. शलमोनाचा इतर सर्व इतिहास, त्याची सर्व कृत्ये व त्याचे शहाणपण ह्यांचे वर्णन शलमोनाच्या बखरीत केले आहे, नाही काय? शलमोनाने यरुशलेमेत सर्व इस्राएलांवर एकंदर चाळीस वर्षे राज्य केले. शलमोन आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याचा बाप दावीद ह्याच्या नगरात त्याला मूठमाती देण्यात आली; आणि त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा झाला.