YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 11

11
शलमोनाने परमेश्वराशी केलेली फितुरी व त्याचे वैरी
1शलमोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मवाबी, अम्मोनी, अदोमी, सीदोनी व हित्ती राष्ट्रांतल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला; व त्यांतल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले.
2ह्या राष्ट्रांविषयी परमेश्वराने इस्राएल लोकांना सांगितले होते की, “तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवांकडे वळवतील.”
3त्याच्या सातशे राण्या व तीनशे उपपत्न्या होत्या; त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकवले.
4शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले; त्याचा बाप दावीद ह्याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे.
5सीदोन्यांची देवी अष्टोरेथ आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम ह्यांच्या नादी शलमोन लागला.
6परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते शलमोनाने केले; त्याचा बाप दावीद ह्याच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही.
7तेव्हा शलमोनाने यरुशलेमेच्या समोरील पहाडावर मवाबाचे अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मोलख ह्यांच्यासाठी एकेक उंच स्थान बांधले.
8ज्या विदेशी स्त्रिया आपापल्या दैवतांना धूप दाखवत व यज्ञ करीत, त्या सर्वांसाठी त्याने अशीच व्यवस्था केली.
9शलमोनाचे मन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडून फिरले म्हणून परमेश्वर त्याच्यावर कोपला; त्याला त्याचे दोनदा दर्शन झाले होते.
10त्याला ह्या बाबतीत अशी आज्ञा केली होती की अन्य देवांच्या नादी लागू नको; पण परमेश्वराने केलेली ही आज्ञा त्याने पाळली नाही
11ह्यास्तव परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “माझा करार व मी तुला लावून दिलेले नियम न पाळता हे असे आचरण तू केलेस त्या अर्थी मी तुझे राज्य तुझ्यापासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकाला देईन.
12पण तुझा पिता दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ तुझ्या हयातीत मी असे करणार नाही; तर तुझ्या पुत्राच्या हातून राज्य तोडून घेईन.
13तरी मी सगळेच राज्य तोडून घेणार नाही; माझा सेवक दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ व मी निवडलेल्या यरुशलेमेप्रीत्यर्थ तुझ्या पुत्राच्या हाती मी एक वंश राहू देईन.”
14परमेश्वराने अदोमी राजवंशातील अदोमी हदाद हा शत्रू शलमोनावर उठवला.
15दावीद अदोमात होता आणि यवाब सेनापती मृतांना मूठमाती देण्यासाठी तेथे गेला असताना त्याने अदोमातील एकूणएक पुरुषास मारून टाकले.
16(यवाब सर्व इस्राएल लोकांसह अदोमात सहा महिने राहिला तेवढ्या अवधीत त्याने अदोमातल्या सर्व पुरुषांची कत्तल उडवली.)
17तेव्हा हदाद लहान मुलगा होता. तो आपल्या बापाच्या काही अदोमी सेवकांबरोबर मिसर देशास जाण्याच्या इराद्याने पळाला.
18ते मिद्यानातून जाऊन पारानास आले आणि पारानातून काही लोक बरोबर घेऊन मिसर देशाला फारो राजाकडे गेले; फारोने त्यांना राहायला घर दिले, त्यांच्या खाण्यापिण्याची तरतूद केली व त्यांना काही जमीनही दिली.
19हदादाने फारोची चांगली मर्जी संपादली म्हणून फारोने त्याला आपली मेहुणी, आपली राणी तहपनेस हिची बहीण दिली.
20तहपनेस राणीच्या बहिणीच्या पोटी त्याला गनुबथ नावाचा पुत्र झाला; तहपनेस हिने फारोच्या वाड्यात त्या मुलाच्या थानमोडीचा समारंभ केला; तेव्हापासून गनुबथ फारोच्या वाड्यात त्याच्या पुत्रांबरोबर राहिला.
21दावीद आपल्या वडिलांना जाऊन मिळाला आणि यवाब सेनापतीही मृत्यू पावला हे हदादास मिसर देशात कळले तेव्हा तो फारोला म्हणाला, “मला स्वदेशी जायचे आहे. माझी रवानगी करा.”
22फारो त्याला म्हणाला, “तू माझ्याजवळ असता तुला काय उणे आहे? तू स्वदेशी का जाऊ पाहतोस?” तो फारोला म्हणाला, “काही नाही; पण माझी रवानगी कराच.”
23देवाने शलमोनावर दुसरा एक शत्रू उठवला, त्याचे नाव एल्यादाचा पुत्र रजोन; तो आपला धनी सोबाचा राजा हददेजर ह्याच्यापासून पळून गेला होता.
24दाविदाने सोबा येथील रहिवाशांचा संहार केला तेव्हा रजोन आपल्याजवळ काही लोक जमवून त्यांचा सेनापती झाला; ते दिमिष्क येथे राहिले आणि तेथे त्यांनी राज्य स्थापले.
25हदादानेच केवळ इस्राएलास उपद्रव दिला नाही तर रजोनानेही शलमोनाच्या सगळ्या हयातीत इस्राएलाशी वैर केले; आणि त्याने इस्राएलाचा तिटकारा केला व अरामावर राज्य केले.
26ह्याशिवाय सरेदा येथला एफ्राइमी नबाट ह्याचा पुत्र यराबाम हा शलमोनाचा सेवक होता, त्याची आई विधवा होती, तिचे नाव सरूवा; त्यानेही राजावर हात उचलला.
27त्याने हात उचलायचे कारण एवढेच की शलमोन मिल्लो नगर बांधून आपला पिता दावीद ह्याच्या नगराची मोडतोड दुरुस्त करीत होता;
28त्या वेळी यराबाम हा मोठा शूर वीर होता. तो तरुण पुरुष उद्योगी आहे हे शलमोनाच्या लक्षात आले तेव्हा त्याने त्याला योसेफाच्या घराण्यातील लोकांच्या कामावर नेमले.
29त्या काळात यराबाम यरुशलेम सोडून बाहेर चालला असता त्याला वाटेत शिलोचा अहीया नामक संदेष्टा भेटला; त्याने नवे वस्त्र धारण केले होते, व त्या वेळी त्या मैदानात ते दोघेच होते.
30अहीयाने आपल्या अंगावरचे नवे वस्त्र काढून त्याचे बारा तुकडे केले.
31तो यराबामाला म्हणाला, “ह्यांतले दहा तुकडे तू घे, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे असे म्हणणे आहे की मी शलमोनाच्या हातून राज्य तोडून घेऊन दहा वंश तुझ्या हाती देईन;
32(तरी माझा सेवक दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून मी निवडलेल्या यरुशलेम नगराप्रीत्यर्थ त्याच्याकडे मी एक वंश राहू देईन);
33ह्याचे कारण हेच की ते माझा त्याग करून सीदोन्यांची देवी अष्टोरेथ, मवाबाचा देव कमोश आणि अम्मोन्यांचा देव मिलकोम ह्यांच्या भजनी लागले आहेत; ते माझ्या मार्गाने चालत नाहीत, जे माझ्या दृष्टीने योग्य ते करीत नाहीत आणि शलमोनाचा बाप दावीद माझे नियम व निर्णय पाळी तसे पाळत नाहीत.
34तथापि मी त्याच्या हातून सर्वच राज्य हिसकावून घेणार नाही; तर माझा सेवक दावीद माझ्या आज्ञा व नियम पाळत असे म्हणून मी त्याला निवडले होते त्याच्याप्रीत्यर्थ मी शलमोनाला त्याच्या हयातीत राजपदावर ठेवीन.
35पण त्याच्या पुत्राच्या हातून राज्य घेऊन तुला देईन, दहा वंशांवरले राज्य तुला देईन;
36आणि त्याच्या पुत्राकडे मी एक वंश राहू देईन, म्हणजे माझ्या नामाची स्थापना व्हावी म्हणून मी यरुशलेम नगर निवडले आहे त्यात माझा सेवक दावीद ह्याची ज्योती माझ्यासमोर निरंतर जळत राहील.
37मी तुला हाती धरीन आणि तू आपल्या मनोरथाप्रमाणे इस्राएलांवर राज्य करशील.
38तू माझा सेवक दावीद ह्याच्याप्रमाणे माझ्या सर्व आज्ञा मानशील, माझ्या मार्गाने चालशील, माझ्या दृष्टीने जे योग्य तेच करशील आणि माझे नियम व आज्ञा पाळत जाशील तर मी तुझ्याबरोबर राहीन आणि जसे मी दाविदाचे घराणे कायम स्थापले तसे तुझेही कायम स्थापीन आणि इस्राएल लोकांना तुझ्या हवाली करीन.
39शलमोनाच्या वर्तनास्तव मी दाविदाच्या संततीला दु:ख भोगायला लावीन, पण ते सर्वकाळ नाही.”
40शलमोन यराबामास जिवे मारू पाहत होता; पण यराबाम मिसर देशाचा राजा शिशक ह्याच्याकडे मिसर देशाला पळून गेला आणि शलमोनाच्या मृत्यूपर्यंत तेथेच राहिला.
शलमोनाचा मृत्यू
(२ इति. 9:29-31)
41शलमोनाचा इतर सर्व इतिहास, त्याची सर्व कृत्ये व त्याचे शहाणपण ह्यांचे वर्णन शलमोनाच्या बखरीत केले आहे, नाही काय?
42शलमोनाने यरुशलेमेत सर्व इस्राएलांवर एकंदर चाळीस वर्षे राज्य केले.
43शलमोन आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याचा बाप दावीद ह्याच्या नगरात त्याला मूठमाती देण्यात आली; आणि त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा झाला.

सध्या निवडलेले:

१ राजे 11: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन