1 योहान 4:1-6
1 योहान 4:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत. अशाप्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखा “येशू ख्रिस्त देह धारण करून आला.” हे जो प्रत्येक आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे. आणि जो प्रत्येक आत्मा येशूला कबूल करत नाही, तो देवापासून नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे; तो येणार हे तुम्ही ऐकले आहे. तो जगात आताही आहे. माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे. ते आत्मे जगाचे आहेत म्हणून ते जगाच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते. पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.
1 योहान 4:1-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रिय मित्रांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका परंतु ते आत्मे परमेश्वराकडून आलेले आहेत का याची परीक्षा करा कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगामध्ये निघालेले आहेत. याप्रकारे तुम्ही परमेश्वराचा आत्मा ओळखू शकता: जो प्रत्येक आत्मा, येशू ख्रिस्त देह धारण करून आले होते हे स्वीकारतो, तो परमेश्वरापासून आहे. परंतु प्रत्येक आत्मा जो येशूंचा अंगीकार करीत नाही तो परमेश्वरापासून नाही. हा तर ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे, ज्याच्या येण्याबद्दल तुम्ही ऐकले आहे आणि तो आधीच जगामध्ये आलेला आहे. प्रिय लेकरांनो, तुम्ही परमेश्वराचे आहात आणि जे ख्रिस्ताचे विरोधक आहेत, त्यांच्याशी झगडून तुम्ही जय मिळविला आहे, कारण जगात जो आहे, त्याच्यापेक्षा तुम्हामध्ये जे आहेत, ते श्रेष्ठ आहेत. हे लोक या जगाचे आहेत आणि म्हणून साहजिकच या जगाच्या गोष्टींबद्दल त्यांना आस्था वाटते आणि जगही त्यांच्याकडे लक्ष देते. आम्ही परमेश्वरापासून आहोत आणि जे परमेश्वराला ओळखतात ते आमचे ऐकतात; परंतु जे कोणी परमेश्वरापासून नाहीत ते आमचे ऐकत नाहीत. यामुळेच आम्ही समजतो की सत्याचा आत्मा कोणता आणि फसवणुकीचा आत्मा कोणता आहे.
1 योहान 4:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत. देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा : देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो तो देवापासून आहे; आणि जो जो आत्मा देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला कबूल करत नाही, तो तो देवापासून नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे; तो येणार हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे; कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते, आणि जग त्यांचे ऐकून घेते. आपण देवाचे आहोत; जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो; जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. ह्यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.
1 योहान 4:1-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रियजनहो, “मला पवित्र आत्मा मिळाला आहे”, असे म्हणणाऱ्या सर्व माणसांवर विश्वास ठेऊ नका, तर त्यांना मिळालेला आत्मा देवाकडून मिळालेला आहे किंवा नाही ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात वावरत आहेत. देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा: जो आत्मा कबूल करतो की, येशू ख्रिस्त मानव म्हणून आला तो देवाकडचा आहे. जो आत्मा येशू मानव म्हणून आला हे कबूल करत नाही, तो देवाकडचा नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे. तो येणार आहे, हे तुम्ही ऐकले आहे आणि तो आत्ता जगात आलाच आहे. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि खोट्या संदेष्ट्यांवर तुम्ही जय मिळवला आहे. कारण तुमच्यामध्ये जो आत्मा आहे, तो जो जगात आहे, त्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे. ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते. परंतु आपण देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. ह्यावरून सत्याचा आत्मा कोणता व असत्याचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.