१ इतिहास 28:9-20
१ इतिहास 28:9-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे शलमोना, माझ्या पुत्रा, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. पूर्ण अंतःकरणाने व मनोभावाने त्याची सेवा कर. तू हे कर कारण परमेश्वर सर्वाची अंत:करणे पारखतो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराच्या सर्व कल्पना त्यास कळतात. जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल, पण जर तू त्यास सोडशील, तर तो तुझा कायमचा त्याग करील. परमेश्वराने त्याचे पवित्रस्थानासाठी मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे हे लक्षात ठेव. बलवान हो आणि हे कर.” दावीदाने आपला पुत्र शलमोन याला मंदिराचे व्दारमंडप, त्याची घरे, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचा आराखडा दिला. त्यास दैवी आत्म्याच्या प्रेरणेने जे काही प्राप्त झाले त्याचा आराखडा म्हणजे परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणाचा आणि चोहोकडच्या खोल्यांचा आणि देवाच्या मंदिराच्या भांडारांचा व पवित्र वस्तूंच्या भांडारांचा. याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती व परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेच्या सर्व कामाची आणि परमेश्वराच्या मंदिरातील सर्व उपयोगात येणारी उपकरणे याबद्दलची जबाबदारी त्यांना नेमून दिली. सोन्याच्या पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या सर्व पात्रांसाठी सोन्याचे वजन दिले. रुप्याच्या सर्व पात्रांसाठी सर्व प्रकारच्या सेवेच्या पात्रांसाठी रुप्याचे वजन दिले. सोन्याच्या दिपस्तंभासाठी व त्याच्या दिव्यासाठी, एकेक दिपस्तंभ व त्याच्या दिव्यासाठी सोन्याचे वजन दिले आणि रुप्याच्या दिपस्तंभासाठी एकेका दिपस्तंभाच्या कामाप्रमाणे एकेका दिपस्तंभासाठी व तिच्या दिव्यासाठी रुप्याचे वजन दिले. आणि समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी एकेका मेजासाठी सोन्याचे आणि रुप्याच्या मेजासाठी रुप्याचे वजन दिले. शुद्ध सोन्याचे काटे, प्याले, वाट्या व प्रत्येक सुरईसाठी सोने आणि रुप्याच्या वाट्यासाठी लागणारे रुपे, एकेका वाटीसाठी लागणारे रुपे यांचे वजन दिले. धूपवेदीसाठी शुध्द केलेल्या सोन्याचे आणि जे करुब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकीत होते त्यांच्या रथाच्या नमुन्याप्रमाणे सोन्याचे वजन दिले. दावीद म्हणाला, “हे सर्व कार्य मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्या सर्व रुपरेषा त्याने मला समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी लिहून ठेवल्या आहेत.” दावीद शलमोनाला पुढे म्हणाला “बलवान हो आणि धैर्य धर. काम कर. कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्यासोबत आहे, तेव्हा घाबरु नको. परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही.
१ इतिहास 28:9-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील. म्हणून आता तू लक्ष दे, याहवेहने त्यांचे पवित्र मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे. शक्तिशाली हो आणि ते कार्य पूर्ण कर.” नंतर दावीदाने मंदिराची नियोजित जागा, तेथील भवने, भांडारगृहे, वरच्या खोल्या, आतील खोल्या, तसेच प्रायश्चिताची जागा यांचा नकाशा शलोमोनाला दिला. पवित्र आत्म्याने ज्या योजना त्याच्या मनात घातल्या होत्या त्या याहवेहच्या मंदिराच्या अंगणाचा, सभोवतालच्या खोल्यांचा, परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यांचा व समर्पित वस्तूंच्या कोठारांचाही नकाशा त्याला दिला. याजक व लेवी यांच्या विभागांच्या कामकाजाच्या सूचनाही राजाने शलोमोनाला दिल्या, त्याचप्रमाणे याहवेहच्या मंदिरातील भक्ती व सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा तपशीलही त्याने त्याला दिला. त्याने वजन करून निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या सोन्याच्या पात्रांसाठी लागणारे पुरेसे सोने व निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या चांदीच्या पात्रांसाठी लागणारी पुरेशी चांदी दिली. दिव्यांना व दिवठणींना लागणारे ठराविक वजनाचे सोनेही त्याने दिले. त्याने चांदीच्या बैठकींसाठी व दिव्यांसाठी प्रत्येकाच्या कामाप्रमाणे पुरेल एवढी चांदी दिली. त्याने समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी व इतर सोन्याच्या मेजांसाठी सोने तोलून दिले. त्याने चांदीच्या मेजांसाठीसुध्दा चांदी तोलून दिली. शुद्ध सोन्याचे काटेरी चमचे, शिंपडण्यासाठी लागणारे कटोरे आणि प्याले; सोन्याच्या प्रत्येक ताटासाठी सोने, त्याप्रमाणेच चांदीच्या प्रत्येक ताटासाठी चांदी तोलून दिली; आणि त्याने धूपवेदीसाठी लागणारे शुद्ध सोने तोलून दिले. तसेच रथाचा नकाशा म्हणजे याहवेहच्या कराराच्या कोशावर आपले पंख पसरून त्याचे संरक्षण करणार्या करुबांचा नकाशा त्याने त्याला दिला. दावीद म्हणाला, “हा सगळा तपशील खुद्द याहवेहच्या सूचनांचा परिणाम आहे. आणि त्यांनीच मला या नकाशाचा सर्व तपशील समजण्याचे ज्ञान दिले.” दावीद त्याचा पुत्र शलोमोनला हे देखील म्हणाला, “हिंमत बांध, धैर्य धर आणि कामास लाग, भिऊ नकोस किंवा खचू नकोस, कारण याहवेह परमेश्वर, माझे परमेश्वर तुझ्याबरोबर आहेत. याहवेहच्या मंदिराचे प्रत्येक कार्य योग्यप्रकारे सिद्धीस जाईपर्यंत ते तुझा त्याग करणार नाहीत किंवा तुला अपयश देणार नाहीत.
१ इतिहास 28:9-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील. सांभाळ, पवित्रस्थानाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे म्हणून परमेश्वराने तुला निवडले आहे; हिंमत धरून हे कार्य कर.” मग दाविदाने आपला पुत्र शलमोन ह्याला मंदिराची ओसरी, कोठड्या, भांडारगृहे व त्यांवरील कोठड्या व दयासनाचे स्थान ह्यांचा नमुना दिला; त्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराची अंगणे, चोहोबाजूंच्या कोठड्या, देवमंदिराची भांडारे व समर्पित केलेल्या वस्तूंची भांडारे ह्यांचे जे नमुने दैवी आत्म्याच्या प्रेरणेने त्याला मिळाले होते ते सर्व त्याने त्याला दिले. त्याप्रमाणेच याजक व लेवी ह्यांच्या कार्यक्रमाचा, परमेश्वराच्या मंदिरातील सेवेसंबंधाच्या सर्व कामाचा आणि सेवेसंबंधाच्या सर्व पात्रांचा बेत त्याने त्याला सांगून दिला; सर्व प्रकारची सेवा करण्यासाठी सोन्याची पात्रे करण्यास सोने आणि सर्व प्रकारच्या सेवेसाठी लागणार्या चांदीच्या पात्रांसाठी चांदी त्याने तोलून दिली; सोन्याच्या दीपमाळा व त्यांची सोन्याची चाडी; प्रत्येक दीपमाळ व तिची चाडी ह्यांसाठी प्रत्येकाच्या कामाप्रमाणे चांदी तोलून दिली. समर्पित भाकरीच्या प्रत्येक मेजासाठी सोने तोलून दिले, चांदीच्या मेजासाठी चांदी तोलून दिली. शुद्ध सोन्याचे काटे, कटोरे व प्याले व सोन्याच्या प्रत्येक सुरईसाठी सोने, त्याप्रमाणेच चांदीच्या प्रत्येक सुरईसाठी चांदी तोलून दिली. धूपवेदीसाठी गाळलेले सोने तोलून दिले, आणि करूब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकत, त्यांच्या रथाच्या नमुन्यासाठी सोने त्याने दिले. “परमेश्वराकडून जे काही ह्या नमुन्याप्रमाणे मला कळले ते मी सर्व समजून घेऊन लिहून दिले आहे.” [असे दाविदाने म्हटले.] मग दावीद आपला पुत्र शलमोन ह्याला म्हणाला, “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर; भिऊ नकोस, खचू नकोस, कारण परमेश्वर देव, माझा देव तुझ्याबरोबर आहे; परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतरणार नाही, तुला सोडणार नाही.