१ इतिहास 14:8-17
१ इतिहास 14:8-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता सर्व इस्राएलावर राजा होण्यासाठी दावीदाला अभिषेक केला आहे हे पलिष्ट्यांना जेव्हा कळाले तेव्हा ते दावीदाचा शोध करायला निघाले. पण दावीदाला ही बातमी कळाली तेव्हा तो त्यांच्याशी लढायला निघाला. आणि पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर छापे मारून त्यांना लुटले. मग दावीदाने देवाला विचारले. तो म्हणाला, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु काय? मला तू त्यांच्यावर जय देशील काय?” परमेश्वराने त्यास सांगितले “हल्ला कर, मी त्यांना तुझ्या हाती नक्कीच देईन.” मग दावीद आणि त्याची माणसे बालपरासीम येथपर्यंत जाऊन पोचली आणि तेथे त्यांने त्यांचा पराभव केला. तो म्हणाला, “देव पुराच्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या हाताने माझ्या शत्रूवर तुटून पडला आहे.” त्याठिकाणाचे नाव बाल-परासीम असे पडले आहे. पलिष्ट्यांनी आपले देव तिथेच टाकले. आणि दावीदाने त्या मूर्ती जाळून टाकण्याची आज्ञा दिली. रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. दावीदाने पुन्हा देवाला मदतीसाठी विचारले. देव त्यास म्हणाला “तू त्यांच्यावर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन जाऊ नकोस तर वळसा घेऊन तुतीच्या झाडांसमोर त्याच्यावर चालून जा. तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून तुला सैन्य चाल करून जाण्याचा आवाज ऐकशील तेव्हा लढाईला पुढे निघून जा. कारण देव पलिष्ट्यांवर हल्ला करायला पुढे निघाला आहे.” दावीदाने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाने आपल्या लोकांसह पलिष्ट्यांचा पाडाव केला. गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्ट्यांच्या सैन्याला झोडपून काढले. त्यामुळे दावीदाची कीर्ती सर्व देशात पसरली. परमेश्वराने सर्व राष्ट्रात त्याची दहशत निर्माण केली.
१ इतिहास 14:8-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो त्यांना भेटण्यास गेला. इकडे पलिष्टी लोकांनी येऊन रेफाईमच्या खोर्याला लुटले. तेव्हा दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, मी त्यांना तुझ्या हातात देईन.” म्हणून दावीद व त्याचे सैन्य बआल-पेरासीम येथे गेले आणि तिथे त्याने त्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे परमेश्वराने माझ्याद्वारे शत्रूंचा नाश केला आहे.” म्हणून त्या ठिकाणाला बआल-पेरासीम, हे नाव पडले. पलिष्टी लोकांनी त्यांची दैवते टाकून दिली व दावीदाने ती अग्नीत जाळून टाकण्याची आज्ञा केली. पुन्हा एकदा पलिष्टी लोकांनी खोर्यात हल्ला केला. तेव्हा दावीदाने पुन्हा परमेश्वराला विचारले, आणि परमेश्वराने त्याला उत्तर दिले, “थेट त्यांच्यामागे जाऊ नकोस, पण त्यांच्या बाजूने वळसा देऊन, तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर. तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सैन्य चालत येण्याचा आवाज येताच, युद्धास पुढे निघा, त्यावरून पलिष्टी सैन्याचा नाश करण्यासाठी परमेश्वर तुमच्यापुढे गेले आहेत असे समज.” तेव्हा दावीदाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्टी सैन्यांना ठार केले. दावीदाची किर्ती संपूर्ण प्रदेशात पसरत गेली. सर्व राष्ट्रांना त्याचे भय वाटावे असे याहवेहने केले.
१ इतिहास 14:8-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले आहे हे ऐकून सर्व पलिष्टी त्याच्या शोधास निघाले; हे ऐकून त्यांच्याशी सामना करायला दावीद निघाला. पलिष्ट्यांनी येऊन रेफाईम खोर्यावर घाला घातला. दाविदाने देवाला प्रश्न केला की, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू काय? तू त्यांना माझ्या हाती देशील काय?” परमेश्वराने दाविदाला म्हटले, “चढाई कर, मी त्यांना तुझ्या हाती देईन.” ते बाल-परासीम येथे आले; तेथे दाविदाने त्यांचा संहार केला; तो म्हणाला, “देव पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर माझ्या हस्ते तुटून पडला;” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम (तुटून पडण्याचे ठिकाण) असे पडले. तेथे पलिष्टी आपली दैवते टाकून गेले; तेव्हा दाविदाच्या आज्ञेने ती जाळून टाकली. मग पुन्हा पलिष्ट्यांनी त्या खोर्यावर हल्ला केला. दाविदाने देवाला पुन्हा प्रश्न केला असता देवाने त्याला सांगितले की, “त्यांच्या वाटेस जाऊ नकोस, तर वळसा घेऊन तुतीच्या झाडासमोर त्यांच्यावर छापा घाल. तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सेना कूच करीत आहे असा आवाज तुझ्या कानी पडताच युद्धासाठी पुढे चालू लाग, कारण पलिष्ट्यांच्या सेनेचा संहार करण्यासाठी देव तुझ्या अग्रभागी गेला आहे असे समज.” देवाच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गिबोना-पासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांच्या सैन्याला मार देत गेला. दाविदाची कीर्ती देशोदेशी पसरली; परमेश्वराने सर्व राष्ट्रांवर त्याचा धाक बसवला.