YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 8

8
पेरणी करणार्‍याचा दाखला
1यानंतर येशूंनी एका शहरातून दुसर्‍या शहरात आणि एका गावातून दुसर्‍या गावात असा प्रवास करीत परमेश्वराच्या राज्याच्या शुभवार्तेची घोषणा केली. त्यांचे बारा शिष्य त्यांच्याबरोबर होते, 2काही स्त्रियांमधून त्यांनी दुरात्मे काढले, काहींना रोगमुक्त केले होते, मरीया मग्दालिया जिच्यामधून त्यांनी सात भुते काढली होती; 3हेरोदाचा घरगुती कारभारी खुजा, त्याची पत्नी योहान्ना, सुसान्ना व इतर अनेक स्त्रिया, आपल्या स्वतःच्या मिळकतीतून मदत करीत असत.
4लोकांची मोठी गर्दी होत होती आणि वेगवेगळ्या गावांमधून लोक येशूंकडे येत होते, त्यावेळेस त्यांनी हा दाखला सांगितलाः 5“एक शेतकरी बी पेरण्याकरीता निघाला. तो बी पेरीत असताना, काही वाटेवर पडले; व तुडविले गेले व पक्ष्यांनी खाऊन टाकले. 6काही बी खडकाळ जमिनीवर पडले, हे बी वर आले, परंतु ओलाव्याच्या अभावी ती रोपे करपून गेली. 7काही काटेरी झुडूपांमध्ये पडले, ते उगवले आणि त्याबरोबर वाढले आणि त्याची वाढ खुंटवली. 8काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले आणि जेवढे पेरले होते, त्यापेक्षा शंभरपट पीक आले.”
हे सांगत असताना ते म्हणाले, “ज्याला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.”
9त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “या दाखल्याचा अर्थ काय आहे?” 10तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिलेले आहे, परंतु दुसर्‍यांना दाखल्याद्वारेच सांगण्यात येईल,” ते यासाठी की,
“ ‘ते पाहत असले तरी त्यांना दिसू नये,
कानांनी ऐकत असले, तरी त्यांना समजू नये.’#8:10 यश 6:9
11“या दाखल्याचा अर्थ असा आहे: बी हे परमेश्वराचे वचन आहे. 12पायवाटेवर पडलेले ते, जे वचन ऐकतात, पण सैतान येतो आणि पेरलेले वचन हृदयातून हिरावून नेतो आणि त्यामुळे त्यांना विश्वास ठेवण्याची व तारणाची संधी मिळत नाही. 13खडकाळ जमिनीसारखे असलेले ते हे जे आनंदाने वचन स्वीकारतात पण त्यांना मूळ नसल्यामुळे ते किंचितकाळ विश्वास ठेवतात, परंतु परीक्षा आली म्हणजे ते पडतात. 14काटेरी झाडांमध्ये काही बी पडले, ते आहेत की जे ऐकतात, परंतु जीवन जगत असताना, जीवनातील काळजी, पैसा, सुखविलास, यामुळे त्यांची वाढ खुंटते व ते परिपक्व होत नाहीत; 15काही बी उत्तम जमिनीत पडते ते प्रामाणिक व चांगल्या अंतःकरणाच्या लोकांचे प्रतीक आहे, जे परमेश्वराचे वचन ऐकतात व धरून राहतात आणि धीराने पीक देतात.
दिवठणीवर ठेवलेला दिवा
16“कोणी दिवा लावून मातीच्या भांड्याखाली मापाखाली किंवा खाटेखाली ठेवीत नाही! जे आत येणारे आहेत त्यांना दिव्याचा प्रकाश मिळावा म्हणून दिवठणीवर ठेवतात. 17कारण जे प्रकट होणार नाही असे काही लपलेले नाही किंवा जे उघडकीस येणार नाही व कळणार नाही असे काही गुप्त नाही. 18यास्तव तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या. ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल; ज्यांच्याजवळ नाही, जे त्यांच्याजवळ आहे असे त्यांना वाटते ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.”
येशूंची आई आणि भाऊ
19एकदा येशूंची आई आणि भाऊ त्यांना भेटावयास आले, पण गर्दीमुळे त्यांच्याजवळ त्यांना जाता येईना. 20कोणी त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर थांबले आहेत व आपल्याला भेटू इच्छित आहेत.”
21तेव्हा ते म्हणाले, “जो कोणी परमेश्वराचे वचन ऐकतो व त्यानुसार आचरण करतो, तोच माझा भाऊ व बहीण आणि माझी आई.”
येशू वादळ शांत करतात
22एके दिवशी येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ,” ते व त्यांचे शिष्य होडीत बसून निघाले, 23ते जात असताना येशू झोपी गेले आणि सरोवरात भयंकर वादळ आले व होडी बुडू लागली आणि ते मोठ्या संकटात सापडले.
24तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत.”
ते उठले आणि त्यांनी वार्‍याला व लाटांना धमकाविले व वादळ थांबले आणि सर्वकाही शांत झाले. 25नंतर येशूंनी शिष्यांना विचारले, “तुमचा विश्वास कोठे आहे?”
भीती आणि विस्मयाने ते एकमेकांना म्हणू लागले, “हे कोण आहेत? ते वारा आणि लाटा यांना देखील आज्ञा करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.”
गरसेकरांच्या देशातील दुरात्माग्रस्त बरा होतो
26मग ते गालील सरोवरातून प्रवास करीत पलीकडे असलेल्या गरसेकरांच्या प्रांतात#8:26 काही मूळप्रतींमध्ये गदरेनेस, काही प्रतींमध्ये गरसेकर, वचन 37 मध्ये आले. 27येशू होडीतून किनार्‍यावर उतरले, त्यावेळी त्यांची भेट दुरात्म्याने पछाडलेल्या एक मनुष्याशी झाली. बर्‍याच काळापर्यंत हा माणूस बेघर आणि वस्त्रहीन अवस्थेत असून कबरस्तानात राहत होता. 28येशूंना पाहिल्याबरोबर तो त्यांच्या पाया पडून ओरडून म्हणाला, “हे येशू परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुम्हाला माझ्याशी काय काम आहे, मी तुमच्याजवळ विनंती करतो की, कृपा करून मला छळू नका.” 29कारण येशूंनी त्या दुरात्म्याला त्यातून बाहेर पडण्याची आज्ञा केली होती. तरी पुष्कळदा तो त्याच्यावर प्रबळ होत असे आणि जरी त्याचे हातपाय साखळयांनी बांधले आणि पहारा ठेवला, तरी साखळया तोडून त्याला एकांत ठिकाणाकडे घेऊन जात असे.
30येशूंनी त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?”
“माझे नाव सैन्य आहे,” त्याने उत्तर दिले. कारण त्याच्यामध्ये पुष्कळ दुरात्मे वास करीत होते. 31ते दुरात्मे येशूंना पुन्हा आणि पुन्हा विनंती करू लागले, “आम्हाला अगाध कूपात जाण्याची आज्ञा करू नका.”
32जवळच डोंगराच्या कडेला डुकरांचा एक कळप चरत होता. तेव्हा दुरात्म्यांनी, “आम्हाला डुकरांमध्ये जाऊ द्या,” अशी येशूंना विनंती केली आणि येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली. 33दुरात्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि डुकरांमध्ये शिरले. त्याक्षणीच तो सर्व कळपच्या कळप डोंगराच्या कडेने धावत सुटला आणि सरोवरात बुडाला.
34डुकरांचे कळप राखणार्‍यांनी काय घडले ते पाहिले आणि त्यांनी धावत जाऊन ही बातमी जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात सांगितली. 35तेव्हा खरे काय झाले आहे, हे पाहण्यासाठी लोक तेथे जमले, जेव्हा ते येशूंकडे आले, तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला पाहिले ज्याच्यामधून भुते निघून गेली होती, तो येशूंच्या चरणाशी बसलेला, कपडे घातलेला आणि भानावर आलेला आहे; हे पाहून ते अतिशय भयभीत झाले. 36प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी भूताने पछाडलेल्या माणसाचे काय झाले व तो कसा बरा झाला ते सर्वांना सांगितले. 37तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतातील सर्व लोकांनी, “आमच्या भागातून निघून जावे,” अशी त्यांना विनंती केली कारण ते फार भयभीत झाले होते. तेव्हा येशू होडीत बसून माघारे जाण्यास निघाले.
38ज्या मनुष्यातून दुरात्मे निघाले होते, त्याने येशूंबरोबर जाण्यासाठी विनंती केली, परंतु येशूंनी त्याला असे सांगून पाठवून दिले, 39“परत घरी जा आणि परमेश्वराने तुझ्यासाठी किती मोठी गोष्ट केली आहे ते सांग.” तेव्हा तो मनुष्य निघून गेला आणि येशूंनी त्याच्यासाठी किती मोठी गोष्ट केली हे त्याने शहरात सर्व भागात जाऊन सांगितले.
याईराच्या मुलीला जिवंत करणे व रक्तस्त्रावी स्त्रीला बरे करणे
40जेव्हा येशू परतल्यावर, लोकांनी त्यांचे स्वागत केले, कारण ते त्यांची वाटच पाहत होते. 41इतक्यात याईर नावाचा एक सभागृहाचा पुढारी आला, त्याने येशूंच्या पाया पडून, त्यांनी आपल्या घरी यावे अशी आग्रहपूर्वक विनंती केली. 42कारण त्याची बारा वर्षाची एकुलती एक मुलगी मरणाच्या पंथाला लागली होती.
येशू वाटेवर असताना, लोकांच्या गर्दीने त्यांना जणू काय चेंगरून टाकले. 43आणि तेथे अशी एक स्त्री होती जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती,#8:43 पुष्कळ प्रतींमध्ये वर्षे तिने होते नव्हते ते वैद्यावर खर्च केले होते परंतु कोणीही तिला बरे करू शकले नव्हते. 44ती येशूंच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला शिवली आणि तत्क्षणी तिचा रक्तस्राव थांबला.
45तेव्हा येशूंनी विचारले, “मला कोणी स्पर्श केला?”
जेव्हा प्रत्येकाने ते नाकारले, पेत्र म्हणाला, “गुरुजी, लोक तुमच्याभोवती गर्दी करून तुमच्याकडे रेटले जात आहेत.”
46परंतु येशू म्हणाले, “कोणीतरी मला स्पर्श केला आहे. मला माहीत आहे माझ्यामधून शक्ती बाहेर पडली आहे.”
47मग आपण गुप्त राहिलो नाही, असे पाहून ती स्त्री थरथर कापत पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणास्तव येशूंना स्पर्श केला व कसे तत्काळ बरे झालो, हे तिने सर्व लोकांसमक्ष सांगितले. 48येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा.”
49येशू अजून बोलतच होते तोच सभागृहाचा अधिकारी याईर याच्या घराकडुन एक सेवक आला आणि म्हणाला, “तुमची कन्या मरण पावली आहे. आता गुरुजींना आणखी त्रास देऊ नको.”
50हे ऐकताच, येशू याईराला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव आणि ती बरी होईल.”
51याईराच्या घरी पोहोचल्यावर, येशूंनी पेत्र, याकोब, योहान आणि त्या छोट्या मुलीचे आईवडील यांच्याशिवाय इतर कोणालाही आत येऊ दिले नाही. 52ते घर शोक करणार्‍या लोकांनी भरून गेले होते. पण येशू त्यांना म्हणाले, “रडणे थांबवा. ही मुलगी मरण पावलेली नाही, झोपलेली आहे.”
53तेव्हा ते त्यांना हसले, कारण ती मेली होती, हे त्या सर्वांना माहीत होते. 54मग येशूंनी तिचा हात धरून तिला म्हटले, “माझ्या मुली ऊठ!” 55त्यावेळी तिचा प्राण परत आला आणि ती तत्काळ उठून उभी राहिली. तेव्हा येशू म्हणाले, “तिला काहीतरी खावयास द्या.” 56तिचे आईवडील विस्मित झाले, परंतु येशूंनी त्यांना निक्षून सांगितले, “जे घडले, ते कोणालाही सांगू नका.”

सध्या निवडलेले:

लूक 8: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन